आकाशात चमकणारी विज कशी तयार होते ? कशी पडते ? वीज का आहे महत्वाची ? भीती नव्हे काळजी घेणे, सर्व प्रक्रिया समजून घेऊया….
पावसाळ्याची सुरुवात ही नेहमीच वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह असते. ही प्रक्रिया वातावरणातील बदलांमुळे होत असल्याने ती अपरिहार्यच आहे. कारण ही प्रक्रिया झाली नाही तर कदाचित पाऊसही पडणार नाही. शिवाय प्राणघातक असली तरी आकाशात चमकणारी वीज ही अनेक बाबतीत हिताचीही असते. विजा कडाडणे आपण थांबवू शकत नाही. पण विजा कोसळून होणारी प्राणहानी मात्र योग्य ती खबरदारी बाळगल्यास आपण आवश्य थांबवू शकतो. How is lightning formed in the sky? How does it fall? Why is lightning important? Let’s understand all the processes, not fear but care….
विजेला समजून घेऊया….
वीज पडू नये असे आपल्याला म्हणताच येणार नाही. अशा परिस्थितीत आपल्या हातात फक्त एकच गोष्ट असते, ती प्रक्रिया समजून घेणे आणि काही गोष्टींची काळजी घेणे. कारण भीती आणि अज्ञान या दोन गोष्टी कोणत्याही आपत्तीपासून होणारे नुकसान ठरवतात. अज्ञानामुळे आपत्तीविषयी भीती निर्माण होते आणि भीतीमुळे जास्त नुकसान घडते.
वीज आहे महत्वाची….
आकाशातील वीज ही एक प्रकारची नैसर्गिक आपत्ती आहे. पृथ्वीचा पृष्ठभाग हा ऋण भारीत असतो आणि वातावरण धन भारीत असते. पृष्ठभागावरून वातावरणात सतत इलेक्ट्रॉन जात असतात. जर विजा पडल्या नाही तर पृथ्वी आणि वातावरणाचा विद्युत समतोल पाच मिनिटात संपून जाईल. तसेच विजांमुळे नायट्रस ऑक्साईड तयार होते, जे पिकांसाठी खताचे काम करते.
आकाशात वीज कशी तयार होते ?
आकाशातील वीज ही आपल्या घरातील विद्युत प्रवाहासारखी आहे, त्याची तीव्रता त्यापेक्षा कित्येक पटीने जास्त असते. (उदा. 100 मिलियन ते एक बिलियन) बरेचदा आपण एखाद्या प्लास्टिक खुर्चीवर बसल्यानंतर आपल्याला शॉक लागतो. कारण घर्षणामुळे विद्युत भार तयार होतो आणि आपण जेव्हा बसतो तेव्हा अर्थिंगमुळे तो भार जमिनीत जातो. असेच काही आकाशात घडते.
हवा जेव्हा गरम तापलेल्या जमिनीवरून जाते तेव्हा ती गरम होते आणि हलकी झाल्यामुळे वर जाते. ही हवा थंड झाल्यावर पावसाचे थेंब तयार होतात, आणखी थंड झाल्यावर त्याचे हिमकण तयार होतात. थंड हवा वजनदार असल्यामुळे खालच्या दिशेने वाहू लागते. वरती जाणारा वारा आणि खाली येणारा वारा यामुळे पाण्याचे थेंब आणि हिमकण यात घर्षण होते. घर्षणामुळे विद्युत भार तयार होतात. ऋण भार हिमकणासोबत खाली येतो आणि धन भार आभाळाच्या वरील भागात जमा होतात. जमिनीवर आभाळाच्या खाली विरुद्ध भार म्हणजे धन भार तयार होतो. हवा ही विद्युत रोधक असते, पण जेव्हा भार वाढत जातो तेव्हा हवेचे आयोनायझेशन होऊन ती विद्युत वाहक होते. दोन्ही भार एकमेकाकडे आकर्षित होतात आणि सर्वात जवळचा चांगला वाहक पाहून त्याठिकाणी वीज पडते. वीज कुठे पडणार हे जमिनीपासून काही फुटाच्या अंतरावर ठरते.
वीज कशी पडते ?
सर्वच विजा जमिनीवर पडत नाहीत. 95 टक्के विजा आकाशातच असतात, फक्त 5 टक्के विजा जमिनीपर्यंत पोहोचतात. विजा एकाच ढगामध्ये, दोन ढगामध्ये किंवा ढग आणि जमिनीमध्ये पडतात. जमीन आणि ढगामधील वीज सर्वात धोकादायक असते. पृथ्वीवर दर सेकंदाला ४० विजा चमकतात. विजेमुळे निर्माण होणारे तापमान हे सूर्याच्या तापमानापेक्षा जास्त असते. येवढ्या मोठ्या तापमानामुळे हवा प्रचंड दबावाखाली प्रसरण पावते आणि मोठा आवाज होतो. वीज तीन प्रकारे आघात करू शकते. ती सरळ अंगावर पडू शकते अथवा ती बाजूच्या वस्तूवर पडल्यानंतर तिचा झोत अंगावर येवू शकतो किंवा ती लांब कुठे तरी पडल्यानंतर जमिनीखाली असलेल्या तारा, पाईपद्वारे तिचा धक्का बसू शकतो.
वीज कोसळणेः काही आकडेवारी
विजा पावसाळ्यापूर्वी जास्त पडतात म्हणजे एप्रिल ते जूनच्या काळात. तसेच विजा पडण्याचे प्रमाण दुपारनंतर जास्त असते. वीज पडून मरण्याचे प्रमाण हे स्त्रियांपेक्षा पुरुषामध्ये जास्त आहे. २००३ ते २०१३ मध्ये भारतात विजेमुळे मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये 71.48 टक्के पुरुष तर 28.51 टक्के स्त्रिया होत्या. आंतरराष्ट्रीयस्तरावर पण अशाच प्रकारचे प्रमाण दिसून येते. भारतात सर्वात जास्त मृत्यूचे प्रमाण मध्यप्रदेशामध्ये आहे. महाराष्ट्र हा दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि सर्वात कमी प्रमाण चंडीगढ आणि लक्षद्वीपमध्ये आहे. मराठवाड्यात 2004 ते 2011 मध्ये वीज पडून मृत्यू पावलेल्या लोकांमध्ये साधारणतः 40 टक्के लोक जालना आणि लातूर जिल्ह्यातील होते.
जागतिक स्तरावर वीज प्रभावित व्यक्ती मृत्यूमुखी पडण्याचे प्रमाण फक्त 10 ते 30% आहे. उर्वरित वाचलेल्या लोकांवर दीर्घकालीन परिणाम झाले आहेत, त्यामुळे वीज प्रभावित व्यक्तीस त्वरित इलाज केल्यास त्याचे प्राण वाचवता येतात. विजेचा आघात झालेल्या ठिकाणाचा अभ्यास केला असता असे लक्षात येते कि सर्वात जास्त प्रमाण हे खुल्या मैदानात (27%) नंतर झाडाखाली (16%) व पाण्याजवळ (13% ) आहे. साधारणत: 56% वेळेस व्यक्ती एखाद्या उंच ठिकाणी (डोंगर) किंवा एखाद्या उंच वस्तूजवळ असताना दुर्घटना घडल्या आहेत.
वीज पडणे या पूर्णतः नैसर्गिक प्रक्रियेविषयी अनेक गैरसमज आहेत- त्यातील काही
म्हणजे वीज पडणे हा एक दैवी प्रकोप आहे असे मानले जाते. वस्तूतः वीज पडणे ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. पायाळू माणसावर जास्त विजा पडतात- हा समजही चूक आहे. पायाळू व्यक्तीसंदर्भात चुकीच्या समजामुळे पायाळू माणसांना घालण्यात येणाऱ्या धातूच्या कड्यामुळे त्यांच्यावर वीज पडते. विजा चमकत असताना सोबत कुठलीही धातूची वस्तू बाळगू नये.
आपण गर्जनाकारी ढगाखाली असल्यास आपल्या अंगावर वीज पडते- हा समज चुकीचा असून बऱ्याचदा ढगाच्या वरील भागातून वीज पडते आणि ती ढगापासून बऱ्याच (३०-४० किमी अंतरापेक्षा जास्त) अंतरावर पडते. त्यामुळे जरी वादळ आपल्यापासून लांब अंतरावर असेल आणि आपल्यावरील आकाश निळे असेल तरीही सावधगिरी बाळगावी. वीज एका ठिकाणी फक्त एकाच वेळेस पडते- हाही एक गैरसमज असून वीज अनेक ठिकाणी अनेक वेळेस पडू शकते.
वीज कोसळल्याने प्रभावित व्यक्ती त्वरित मरण पावतो- हा समज चुकीचा असून वीज प्रभावित व्यक्तींचे मृत्यूचे प्रमाण हे फक्त 10 ते 30% आहे. वीज प्रभावित व्यक्तीस त्वरित प्रथमोपचार दिल्यास आपण त्याचे प्राण वाचवू शकतो. वीज प्रभावित व्यक्तीच्या अंगात विद्युत भार (करंट) असतो व त्यास स्पर्श करणे धोकादायक असते. हा एक चुकीचा समज असून वीज प्रभावित व्यक्तीस स्पर्श करणे धोकादायक नसते.
दुचाकी वाहनावर वीज पडत नाही कारण त्याचे चाक रबराचे असते- हा सुद्धा गैरसमज असून दुचाकी वाहन चालवत असताना वीज पडून मृत्यू पावण्याच्या बऱ्याच घटना घडल्या आहेत.
आकाशात विजा चमकत असताना घ्यावयाची खबरदारी
– शेतात काम करीत असताना शेताजवळील घराचा त्वरित आसरा घ्यावा.
– शेतातील सुरक्षित ठिकाणाचा आसरा घेतल्यानंतर पायाखाली कोरडे लाकूड, प्लास्टिक, गोणपाट, कोरडा पालापाचोळा ठेवा. दोन्ही पाय एकत्र करून गुडघ्यावर दोन्ही हात ठेवून तळपायावर बसा.
– पायाव्यतिरिक्त शरीराचा कुठलाही भाग जमिनीला स्पर्श होणार नाही याची काळजी घ्यावी.
– ओल्या शेतात अथवा तलावात काम करणाऱ्या व्यक्तींनी तत्काळ कोरड्या व सुरक्षित ठिकाणी जावे.
– पोहणारे, मच्छिमारी करणारे यांनी त्वरित पाण्यातून बाहेर यावे.
– झाडापासून झाडाच्या उंचीपेक्षा दुप्पट अंतरावर उभे रहावे.
– एखादे उंच झाड (जसे शेतातील बैठकीचे झाड) सुरक्षित ठेवायचे असल्यास, वृक्षाच्या उंच फांदीवर तांब्याची एक तार बांधून तिचे दुसरे टोक जमिनीत खोलवर गाडून ठेवावे.
– पक्के घर हे सर्वात सुरक्षित ठिकाण आहे. शक्य असल्यास आपल्या घरावर वीज वाहक यंत्रणा बसवावी.
– आपले घर, शेत इत्यादींच्या जवळपास कमी उंचीची झाडे लावावीत.
– जंगलात असाल तर कमी उंचीच्या व दाट झाडांचा आसरा घ्यावा.
– वृक्ष, दलदलीचे ठिकाण तथा पाण्याचे स्त्रोत यापासून शक्यतो दूर रहा.
– मोकळ्या आकाशाखाली असण्यापेक्षा एखाद्या छोट्या (कमी उंचीच्या) झाडाखाली आसरा घ्यावा.
– असे शक्य नसल्यास जमिनीपासून खालील खोलगट ठिकाणी आधी सांगितलेल्या (क्र.१) पद्धतींनी गुडघ्यात वाकून बसा. जर आधीच खोलगट भागात असाल तर वरती येवू नका.
– चारचाकी वाहनातून प्रवास करीत असल्यास वाहनातच रहावे.
आकाशात विजा चमकत असताना खालील गोष्टी टाळा
– खुल्या मैदानात उभे राहू नका. विजा सर्वात जास्त खुल्या मैदानात पडतात.
– झाडाखाली उभे राहू नका. उंच ठिकाणी, झाडावर चढू नका.
– विजेचा खांब, टेलिफोनचा खांब, टॉवर इत्यादीजवळ उभे राहू नका.
– गाव, शेत, आवार, बाग आणि घर यांच्याभोवती तारेचे कुंपण घालू नका, कारण ते विजेला आकर्षित करते.
– दोन चाकी वाहन, सायकल, ट्रॅक्टर, नौका यावर असाल तर तत्काळ उतरून सुरक्षित ठिकाणी जा. अशावेळी वाहनातून प्रवास करू नका.
– वाहनाच्या बाहेर थांबणे फारच आवश्यक असल्यास धातूचे कोणतेही उपकरण बाळगू नका.
– एकाच वेळी जास्त व्यक्तींनी एकत्र राहू नका. दोन व्यक्तीमध्ये किमान १५ फूट अंतर राहील याची काळजी घ्या.
– धातूची दांडी असलेल्या छत्रीचा वापर करू नका.
– पाण्याचा नळ, फ्रीज, टेलिफोन यांना स्पर्श करू नका, शिवाय त्यापासून दूर रहा.
– विजेवर चालणारे यंत्र तसेच धातूपासून बनलेल्या वस्तू जसे कृषी यंत्र इत्यादीपासून दूर रहा.
प्लग जोडलेली विद्युत उपकरणे हाताळू नका. दूरध्वनीचा वापर करू नका. मोबाईलचा वापर टाळा.
आकाशात विजा चमकत असताना जीव वाचवणारा नियम
विजेचा प्रकाश आणि आवाज यात 30 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी अंतर असेल तर तुम्हाला विजेपासून धोका आहे. अशावेळी तुमच्यावर वीज पडण्याची शक्यता 80% आहे. वीज तुमच्या आसपासच्या पाच किमी अंतरावर पडत आहे, अशा वेळेस सुरक्षित जागेचा आसरा घ्या. शेवटचा गडगडाट ऐकल्यानंतर कमीत कमी 30 मिनिटांनी घराच्या बाहेर पडावे.