सोयाबीन पिकांवर किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कृषी संदेश |Agricultural message to prevent pest infestation on soybean crops

सोयाबीन पिकांवर किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कृषी संदेश |Agricultural message to prevent pest infestation on soybean crops

नांदेड (जिमाका), दि. 30 :- राज्यात सोयाबीन पिकाची मोठ्या प्रमाणावर लागवड होते. मागील वर्षी सोयाबीन पिकावर चक्री भुंगा किडीचा प्रादुर्भाव आढळून आला असून यावर्षी या किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. चक्री भुंगा ही कीड पीकवाढीच्या सुरुवातीच्या अवस्थेत देठ, फांदी व मुख्य खोडावर दोन समांतर खाचा करुन त्यामध्ये अंडी घालते. यामुळे झाडाचा अन्न पुरवठा बंद होऊन वरील भाग वाळून जातो. अळी देठ, फांदी व खोड पोखरुन जमिनीपर्यंत पोहोचते व पुर्ण झाड वाळून जाते. वेळेवर उपाययोजना न केल्यास मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते. सोयाबीनवरील चक्रीभुंग्याचा प्रादुर्भाव आढळल्यास शेतकऱ्यांनी पुढीलप्रमाणे उपाययोजना कराव्यात.

चक्रीभुंग्याच्या प्रादुर्भावामुळे किडग्रस्त पाने फांद्या वाळतात. अशी कीडग्रस्त झाडे, पाने, फांद्या यांचा आतील किडीसह नायनाट करावा.यापद्धतीचा 15 दिवसातून जर दोनदा अवलंब केला तर चक्रीभुंगा या किडीमुळे होणाऱ्या नुकसानीचे प्रमाण कमी होते. चक्री भुंग्याच्या किडीने अंडी घालू नये यासाठी सुरुवातीलाच 5 टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी. पीक पेरणीच्या 30-35 दिवसांनतर प्रादुर्भाव दिसताच इथियॉन 50 टक्के, 30 मिली प्रति 10 लिटर अथवा थायक्लोप्रीड 21.7 एस. सी. 15 मिली प्रति 10 लिटर अथवा क्लोरांट्रॅनिलीप्रोल 18.5 एस. सी. 3 मिली प्रति 10 लिटर अथवा थायमेथोक्झाम 12.6 टक्के अधिक लॅम्ब्डा सायहॅलोथ्रीन 9.5 टक्के झेड. सी 2.5 ग्रॅ. प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

<

Related posts

Leave a Comment