अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया नोंदणी सुरू, तीन जूनला पहिल्या फेरीचे अंतिम गुणवत्ता यादी |Online admission process registration for class 11 begins, final merit list of first round on June 3
पुणे : राज्यात पहिल्यांदाच इयत्ता अकरावीची प्रवेश प्रक्रिया केंद्रीय ऑनलाइन पद्धतीने राबवण्यात येणार आहे. त्यासाठी राज्यभरातील नऊ हजार २९४ कनिष्ठ महाविद्यालयांनी नोंदणी केली आहे. विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशासाठी बुधवारपासून (ता. २१) ऑनलाइन नोंदणी करता येणार आहे. पहिल्या फेरीतील अंतिम गुणवत्ता यादी तीन जूनला जाहीर होणार आहे. तर या फेरीतील विद्यार्थ्यांना ६ ते १२ जून या कालावधीत प्रवेश घेता येणार आहे.
गेल्यावर्षी पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर, अमरावती या पाच विभागांत अकरावीची केंद्रीय ऑनलाइन पद्धतीने, तर उर्वरित राज्यात महाविद्यालय स्तरावर राबवण्यात येत होती. शिक्षण विभागाने शैक्षणिक वर्ष २०२५-२६पासून संपूर्ण राज्यात अकरावीची प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबवण्यात येत आहे. अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेसाठी https://mahafyjcadmissions.in/ या स्वतंत्र संकेतस्थळाची निर्मिती करण्यात आली आहे. कनिष्ठ महाविद्यालयांना नोंदणीसाठी १५मेपर्यंतची मुदत दिली आली होती. तर विद्यार्थ्यांची नोंदणी १९ मेपासून सुरू करणार असल्याचे जाहीर केले होते. प्रत्यक्षात, पहिली फेरी यापूर्वी जाहीर केलेल्या नियोजित कालावधीपासून दोन दिवस उशिराने सुरू होत आहे.
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाने जाहीर केलेल्या सुधारित वेळापत्रकानुसार,
अकरावी प्रवेशाची पहिली फेरी २१ मेपासून सुरू होणार आहे. त्यात २१ ते २९ मे कालावधीत विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज भरावा लागेल. कनिष्ठ महाविद्यालयांचे किमान एक ते कमाल दहा प्राधान्यक्रम विद्यार्थ्यांना नोंदवता येतील. पहिल्या फेरीची तात्पुरती गुणवत्ता यादी ३० मे रोजी जाहीर होईल. या यादीवर एक जूनपर्यंत हरकती-सूचना नोंदवता येतील. त्यानंतर अंतिम गुणवत्ता यादी 3 जूनला जाहीर होऊन ६ ते १२ जून या कालावधीत पहिल्या फेरीत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना कनिष्ठ महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्चित करता येणार आहे.
अर्ज भरण्याचा करा सराव
विद्यार्थ्यांना दोन दिवस अर्ज भरण्याचा सराव करता येणार आहे. त्यानुसार सोमवारी ( ता.१९) आणि मंगळवारी (ता. २०) विद्यार्थी ऑनलाइन अर्ज भरणे, प्राधान्यक्रम नोंदवण्याचा सराव करता येणार आहे. त्यानंतर २१ मेपासून नव्याने अर्ज भरावा लागणार आहे, अशी माहिती माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी दिली.
राखीव कोट्यातील प्रवेश ३ जूनपासून
पहिल्या फेरीसाठी अर्ज भरतानाच विद्यार्थ्यांना अंतर्गत, व्यवस्थापन, अल्पसंख्यांक कोट्यातील राखीव जागांसाठीही अर्ज करता येईल. राखीव जागांवरील प्रवेश ३ जूनपासून देता येतील.
प्रवेश शुल्क ‘ऑनलाइन’द्वारेच
कनिष्ठ महाविद्यालयांना विद्यार्थ्यांकडून अकरावीच्या प्रवेश शुल्काची रक्कम ऑनलाइन पद्धतीनेच घ्यावी लागणार आहे.
अकरावी प्रवेशाची क्षमता
- विभाग : एकूण क्षमता : कला : वाणिज्य : विज्ञान
- अमरावती : १,८६,४७५ : ८०,७४० : २४,३४० : ८१,३९५
- छत्रपती संभाजीनगर : २,६६,७५० : १,११,१६५ : ४२,६१५ : १,१२,६७०
- कोल्हापूर : १,९३,२७८ : ६४,५७२ : ४८,४६६ : ८०,२४०
- लातूर : १,३७,५५० : ५२,८६० : २१,२६० : ६३,४३०
- मुंबई : ४,६१,६४० : २२,९५५ : २,७२,९३० : १,६०,७१५
- नागपूर : २,१४,३९५ : ७६,३९५ : ३८,८३० : ९९,८७०
- नाशिक : २,०७,३२० : ८३,००० : ३७,०२० : ८६,७३०
- पुणे : ३,७५,८४६ : १,०३,७०५ : १,०१,९७१ : १,७०,१७०
राज्यातील एकूण आकडेवारी
– एकूण प्रवेश क्षमताः २०,४३,२५४
– विज्ञानः ८,५२,२०६
– वाणिज्यः ५,४०,३१२
– कला: ६,५०,६८२