साधारणतः पंधरा वर्षांपूर्वीचे हे छायाचित्र आहे. एसटी बसमधून खाली उतरणारे सांगोला विधानसभा मतदारसंघाचे शेतकरी कामगार पक्षाचे तत्कालीन आमदार गणपतराव देशमुख तथा आबासाहेब आहेत. शुक्रवार, दि. ३० जुलै रोजी रात्री त्यांचे निधन झाले आणि त्यांचा सातारा येथील बस प्रवासाचा प्रसंग आठवला.
आमदार कसा असावा, याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे आबासाहेब होते. आताच्या राजकीय बजबजपुरीत आबासाहेब बसने प्रवास करत होते, हे सांगून कदाचित कोणाचा विश्वास बसणार नाही. काल, परवा सरपंच झालेल्या पोराच्या दारात काही दिवसात बोलेरो अथवा स्कॉर्पिओ येते. नगरसेवक, सभापती अथवा जिल्हा परिषद सदस्य झाला की दारात इनोव्हा येते. आमदार झाले की दारात महिनाभरात फॉरच्युनर येते. सत्ता अथवा पद गेल्यानंतरही तोच रुबाब कायम रहावा, म्हणून त्यांची धडपड सुरू असते.
आबासाहेब, मात्र त्याला अपवाद राहिले..!
आबासाहेबांची आमदार म्हणून बहूतेक आठवी अथवा नववी टर्म असावी. तरीही ते बसने फिरत होते. त्यांना पाहिले नसलेल्या कोणा व्यक्तीला जर त्यांनी ‘मी आमदार आहे,’ असे सांगितले असते तर ऐकणाराने विश्वासही ठेवला नसता. तसा प्रसंग सातारा बसस्थानकात घडला होता.
आबासाहेब साताऱ्याहून मुंबईला निघाले होते. रात्रीची वेळ होती. सातारा-मुंबई गाडीला गर्दी होती. अशा गर्दीतून ही त्यांनी वाट काढत स्वतःसाठी कशीबशी पाठीमागील सीटवर जागा मिळविली. वाहक एसटी बसमध्ये चढला आणि तिकीट काढत शेवटच्या बाकावर आला. वाहकाने तिकीट विचारताच आबासाहेबांनी ‘मला मोफत प्रवास आहे, मी आमदार आहे..!,’ असे सांगितले. आबासाहेबांचा मोठेपणा येथेही दिसला होता, कारण त्यांनी ‘मी आमदार आहे,’ ही ओळख अगदी शेवटी सांगितली.
इतक्या वयोवृद्ध आमदारांचा एसटी बसने प्रवास म्हणजे वाहक आणि प्रवाशांना आश्चर्याचा धक्का होता. अनेकांचा यावर विश्वासच बसला नाही. बस अगदी वेळेत मुंबईच्या दिशेने रवाना करणे आवश्यक होते, त्यामुळे वाहक खाली उतरले आणि त्यांनी सातारा आगारप्रमुखांना बसमध्ये घडलेला प्रसंग सांगितला.
बसला उशीर होत असल्याने प्रवाशांची चुळबूळ सुरू झाली होती. कोणीतरी आमदार बसने प्रवास करत आहेत, अशी माहिती वाहकाने दिल्याने आगारप्रमुख धावतच बसमध्ये आले तर त्यांना शेवटच्या बाकावर बसलेले आबासाहेब दिसले. आगारप्रमुख सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील होते. त्यामुळे त्यांनी आबासाहेबांना ओळखले. आबासाहेबांनी मनात आणले असते तर बसमध्ये आमदारांसाठी राखीव असणाऱ्या जागेवर बसलेल्या प्रवाशाला उठवून त्यांच्या आरक्षित जागेवर जाऊन बसले असते. मात्र, त्यांनी तसे केले नव्हते. त्यांनी येथे ही जनहित पाहिले होते.
आगारप्रमुखांनी आबासाहेबांना आदराने खाली उतरवले. त्यांच्या दालनात नेले. त्यांचा सत्कार केला. आबासाहेब ही भारावून गेले. दरम्यान, ते ज्या बसमधून उतरले होते ती वेळेच्या कारणाने पुढे निघून गेली होती. यानंतर आबासाहेब पुन्हा दुसऱ्या बसमध्ये बसले आणि मुंबईकडे रवाना झाले.
असे हे आबासाहेब..!
शेतकरी कामगार पक्ष दि. ३ ऑगस्ट २०२१ रोजी ७४ वर्ष पूर्ण करून ७५ व्या वर्षात पदार्पण करत असतानाच आबासाहेब शुक्रवारी आपल्यातून निघून गेले. ‘एकच पक्ष, एकच आमदार आणि एकच उमेदवार’ असे दुर्मिळ उदाहरण फक्त सांगोला विधानसभा मतदारसंघातच होते.
आमदार असून ही आबासाहेबांनी आपले पाय जमिनीवर ठेवूनच काम केले. डोक्यात मंत्री, आमदारकीची हवा जाऊ दिली नाही. मातीशी आणि सर्वसामान्य, वंचित घटकांशी असणारी नाळ शेवटच्या श्वासापर्यंत तोडली नाही. २००२ मध्ये मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर सरकारी गाडी जिल्हाधिकाऱ्यांकडे जमा करून रेल्वेने मुंबईला जाणारे आबासाहेबच होते. मंत्री असताना त्यांच्याकडे जी वर्तमानपत्रे येत होती ती काही दिवसांनी रद्दी म्हणून विकल्यानंतर त्याचे पैसे सरकारी तिजोरीत जमा करणारे महाराष्ट्रात किती मंत्री, आमदार असतील हा संशोधनाचा भाग आहे. मात्र, असे करणाऱ्या यादीत पाहिले आणि एकमेव नाव त्यांचेच आहे. सांगोला तालुक्यात पाणलोटच्या माध्यमातून हरितक्रांतीचे बीज त्यांनीच रोवले. सहकारातील त्यांची कामगिरी उल्लेखनीय आहे.
आणीबाणीच्या काळात तुरुंगवासही भोगला. ‘गड्या… आपली एसटीच बर..!’ हे सूत्र त्यांनी कायम ठेवले. विधानसभा अधिवेशनात येताना सांगोला ते मुंबई हा प्रवास त्यांनी बसनेच केला. कधी-कधी तर ते बसनेच नागपूर हिवाळी अधिवेशनाला जायचे. कामाचा माणूस म्हणून त्यांची ख्याती होती. आयुष्यभर साधेपणा जपलेल्या आबासाहेबांनी मंत्री अथवा आमदारकीचा कधी अहंकार बाळगला नाही. आपली निष्ठा आयुष्यभर शेकाप पक्षाशी कायम ठेवली. शेकापची उतरण होत असताना ही ते प्रामाणिक राहिले. काही दशकांपूर्वी शेकाप फक्त मोर्चा अथवा आंदोलनापुरता मर्यादित होता. रायगड जिल्हा सोडला तर आता मोर्चा अथवा आंदोलनापुरते ही शेकापचे कुठे अस्तित्व उरलेले नाही. तरीही शेवटच्या श्वासापर्यंत शेकाप हेच माझे राजकीय कुटुंब, असे अभिमानाने सांगायचे.
आबासाहेबांचे सर्वाधिक काळ आमदार म्हणून राहिलेले रेकॉर्ड कोणी मोडेल की नाही हे माहीत नाही. मात्र, त्यांनी डीएमकेचे सर्वेसर्वा आणि तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री दिवंगत एम. करुणानिधी यांचे रेकॉर्ड ब्रेक केले. करुणानिधी दहा टर्म आणि आबासाहेब अकरा टर्म आमदार राहिले. याचा आवर्जून उल्लेख करावा लागतो. मोदी लाटेत ही आबासाहेबांनी आपला सांगोला विधानसभा मतदारसंघ शेकापचाच बालेकिल्ला आहे, हे दाखवून दिले. २०१९ ला मात्र त्यांनी राजकारणातून संन्यास घेण्याचा निर्णय घेतला आणि ‘मी आता सांगोला मतदारसंघातून लढणार नाही,’ असे सांगितले. पक्षातील अनेकांनी त्यांना विनंती केली, मात्र त्यांनी कोणाचे ऐकले नाही. त्याचा फटका शेकापला बसला.
आबासाहेब नावाचे एक पान सामाजिक, राजकीय आणि शेतमजूर, कष्टकरी चळवळीच्या इतिहासातून गळून पडले आहे. त्यांचे खूप काही किस्से आहेत. त्यांच्या राजकीय, सामाजिक सजगतेविषयी बोलावे तेवढे कमी आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात असे आबासाहेब मिळाले तर, महाराष्ट्राचा सुवर्णविकास व्हायला वेळ लागणार नाही.
आबासाहेबांची नाळ अगदी समाजातील शेवटच्या घटकापर्यंत होती. दुष्काळी भागाला पाणी मिळाले पाहिजे म्हणून यासाठी त्यांची तळमळ आयुष्यभर कायम राहिली. कृष्णा खोऱ्यातील पाणी टेंभू, म्हैसाळ योजनेच्या माध्यमातून दुष्काळी सांगोला तालुक्याला मिळालेच पाहिजे, यासाठी त्यांनी क्रांतीवीर नागनाथअण्णा नायकवडी यांच्यासोबत लढा दिला. आटपाडी येथे दरवर्षी पाणी परिषद घेऊन दुष्काळी भागातील पाणी लढ्याचे महत्व अधोरेखित केले. सांगोला विधानसभा मतदारसंघातील जनता त्यांची सदैव ऋणी राहणार आहे.
जाता – जाता..!
आबासाहेब, यांना सतत कधी भेटता आले नाही. मात्र, त्यांची आणि माझी पहिली भेट २००४ मध्ये नागपूर येथे अधिवेशनात झाली होती. विधिमंडळाच्या आवारात राजकीय शेकापचे कार्यालय होते. तिथे मी त्यांना दोनवेळा भेटून बोललो ही होतो. रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील अभिवादन सोहळ्यासाठी ते ९ मे रोजी आवर्जून सातारा येथे यायचे. येथेच त्यांच्याशी बोलणे व्हायचे. मध्यंतरी शेकापची माहिती हवी असताना फोनवर बोलणे झाले. यानंतर त्यांनी ‘कधी मुंबईला आलास तर शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यालयात येऊन जा,’ असे सांगितले होते. मुंबईत असताना एकदा त्यांच्या कार्यालयात गेलो, मात्र ते कार्यालयात नव्हते..!
आबासाहेब म्हणजे डोंगराएवढा मोठा माणूस..! आता तर त्यांना भेटणे आणि बोलणे कधीच शक्य नाही..! आबासाहेब… तुम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली..!
- राज्य हादरले, संरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण व हत्या महाराष्ट्रातील बिहार बीड; जिल्ह्यात गुन्हेगारी कोण पोसतय?राज्य हादरले, संरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण व हत्या महाराष्ट्रातील बिहार बीड; जिल्ह्यात गुन्हेगारी कोण…
- भाजपचे राहुल नार्वेकरच हेडमास्तर; दुसऱ्यांदा विधानसभेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड |BJP’s Rahul Narwekar to become Maharashtra assembly speaker once more, unopposedमुंबई । भाजपचे कुलाब्यातील आमदार राहुल नार्वेकर हे दुसऱ्यांदा विधानसभेच्या अध्यक्षपदी, हा विक्रम आतापर्यंत केवळ…
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे संवेदनशील प्रसंगावधान; कोपर्डी पीडितेच्या बहिणीच्या विवाह प्रसंगी हजेरी लावून शब्द पाळलामहाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अहमदनगर येथे एका लग्न समारंभाला हजेरी लावली, जिथे त्यांनी 2016…
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बद्दल तुम्हाला माहिती आहे का ? जीवन परिचय |Devendra Fadnavis Biographyदेवेंद्र गंगाधरराव फडणवीस हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक नाव आहे ज्यांनी आपल्या वडिलांकडून राजकारणाचा वारसा घेऊनही…