जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठी अजित पवार गुरुवारी सकाळी बीडमध्ये दाखल झाले आहेत. यावेळी परळी येथील राष्ट्रवादी कार्यालयात मंत्री धनंजय मुंडे यांनी अजित पवार यांचे स्वागत केले. यावेळी अजित पवार यांनी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना इशारा दिला की, बीड जिल्ह्यात गुन्हेगारी आणि खंडणी खपवून घेतली जाणार नाही. यानंतर अजित पवार डीपीडीसी बैठकीसाठी बीड जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले. Beed DPDC Meeting in Beed in the presence of Deputy Chief Minister Ajit Pawar
यावेळी परळीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात अजित पवार यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी मंत्री धनंजय मुंडे उपस्थित होते. यावेळी अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधताना बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी, खंडणीखोरी खपवून घेतली जाणार नाही, असा रोखठोक इशारा दिला. जे लोक चुकीचे काम करतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल. सातत्याने गुन्हे करणाऱ्यांना मकोका लावला जाईल. तसेच रिव्हॉल्व्हर दाखवून रील तयार करणाऱ्यांचे लायसन्स रद्द केले जाईल, असे अजित पवार यांनी सांगितले.
बीड जिल्ह्यात नियोजन समितीच्या बैठकीसाठी येत असताना पालकमंत्री अजित पवार यांनी जिल्ह्यातील राजकीय नियोजनाला सुरुवात केली आहे. बीड जिल्हा नियोजन समितीच्या विधीमंडळ सदस्यांमधून नामनिर्देशित करायच्या दोन सदस्यांमधून राष्ट्रवादीच्या कोट्यातून आमदार विजयसिंह पंडित तर भाजपच्या कोट्यातून आमदार नमिता मुंदडा (Namit Mundada) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा नियोजन सदस्य समितीमधून सुरेश धस (Suresh Dhas) आणि प्रकाश सोळंके यांना वगळण्यात आले आहे. हा सुरेश धस आणि प्रकाश सोळंके यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
अजित पवारांनी घेतला विकासकामांचा आढावा
दरम्यान, जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आमदारांनी मतदार संघनिहाय बैठकीत झालेल्या कामाची माहिती समिती समोर ठेवली. नमिता मुंदडा यांनी केज विधानसभा मतदारसंघातील विकासकामांचे यापूर्वी जे नियोजन झाले होते, त्यात कोणते काम होणे बाकी आहेत आणि नव्याने कोणते करावे, यासंदर्भातली माहिती अजित पवार यांना दिली. तर सुरेश धस यांनी आष्टी विधानसभा मतदारसंघातील विकासकामाच्या यापूर्वीच्या आराखड्याची माहिती देऊन कोणते काम होणे बाकी आहेत आणि यापुढे कोणते काम व्हावे, संदर्भात माहिती मांडली.
बीड जिल्हा नियोजन समिती तसेच जिल्ह्यातील सर्व शासकीय विभाग प्रमुखांची आज बैठक घेतली. यावेळी अधिकारी वर्गानं सादर केलेले विविध विषय समजून घेतले. जिल्हा पातळीवरील नागरी समस्या, सुरक्षा आणि इतर विविध मुद्द्यांवर संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना केल्या. प्रत्येकानं आपापल्या जबाबदाऱ्या नेटानं पार पाडाव्यात, असे अजित पवारांनी स्पष्ट केलं.