शिवराज्याभिषेक दिन- स्वराज्यचा राजदंड व राजमान्यता देणारा इतिहासातील क्रांतिकारी दिवस.

शिवराज्याभिषेक दिन- स्वराज्यचा राजदंड व राजमान्यता देणारा इतिहासातील क्रांतिकारी दिवस.

हिंदवी स्वराज्य संस्थापक कुळवाडीभूषण छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास केवळ महाराष्ट्रासाठीच नव्हे, तर सबंध देश आणि जगभरासाठी प्रेरणादायी स्वरूपाचा आहे. जागतिक पातळीवर शिवचरित्राचा अभ्यास होत आहे. जगातील असंख्य राष्ट्र शिवरायांच्या गोरिला या युद्धतंत्रांचा अभ्यास करीत आहेत. जगभरातील अनेक राष्ट्रामध्ये शाळा,महाविद्यालय, विद्यापीठांमध्ये शिवचरित्र हे अभ्यासक्रमासाठी शिकविले जात आहे. याचाच अर्थ छत्रपती शिवराय हे केवळ महाराष्ट्राचे राजे नाही, तर ते आंतरराष्ट्रीय महानायक म्हणून आज पुढे आले आहेत.

6 जून 1674 ला संपन्न झालेला शिवराज्याभिषेक सोहळा हा मध्ययुगीन भारताच्या इतिहासातील एक अतिशय क्रान्तिकारी घटना होती. अठरा पगड जातींच्या मावळ्यांना संघटित करून शिवरायांनी हे समताधिष्ठित स्वराज्य निर्माण केले. पराक्रमी सरदार शहाजीराजे भोसले, राष्ट्रमाता जिजाऊ यांचे उत्तम असे नियोजन, तुकोबारायांचे आशीर्वाद, शिवरायांचे कर्तृत्व आणि मावळयांनी दिलेली खंबीर साथ यामधून स्वराज्य उभे राहिले. म्हणून तर म्हटले जाते,” तुकोबारायांची उक्ती,शहाजीराजे आणि जिजाऊंची नीती, शिवबांची कृती म्हणजेच स्वराज्याची निर्मिती.” शिवरायांनी मोठया कष्टाने हे स्वराज्य उभे केले असले, तरी त्यांचा राज्याभिषेक झाल्याशिवाय त्यांना अधिकृत राजमान्यता मिळणार नव्हती. राज्याभिषेकाशिवाय राजदंडही मिळणार नाही.

इतर सत्ताधीशासोबत बरोबरीने व्यवहार करण्याची संधी ही केवळ राज्याभिषेकानंतरच मिळू शकते. कोणतेही राज्य कायदेशीर राज्यसंस्था, धर्मसिद्ध प्राणप्रतिष्ठा, स्वतंत्र आणि सार्वभौम राज्य म्हणून तेव्हाच मान्यता पावेल, जेव्हा त्या राजाचा अधिकृत राज्याभिषेक होईल. याशिवाय आदिलशहाच्या बंडखोर सरदाराने निर्माण केलेले राज्य असा अपप्रचार शिवरायांच्या स्वराज्याबद्दल विरोधक जाणीवपूर्वक करीत होते. हा विरोधकांचा अपप्रचार खोडून टाकायचा असेल, तर राज्याभिषेक करणे अत्यंत आवश्यक होते. याचा सारासार विचार करून छत्रपती शिवरायांनी राज्याभिषेक करण्याचा क्रांतिकारी निर्णय घेतला. तलवारीच्या टोकावर आणि मावळ्याच्या पोलादी मनगटाच्या जोरावर शिवछत्रपतींनी स्वराज्य निर्माण केले. राज्याभिषेकाचा प्रसंग आला, तेव्हा मात्र महाराष्ट्रातील स्वयंघोषित धर्माच्या ठेकेदारांनी शिवरायांच्या राज्याभिषेकाला कडाडून विरोध केला. शिवछत्रपतींच्या राज्याभिषेकाला विरोध करत असताना महाराष्ट्रातील तथाकथित वर्णवर्चस्ववादी, धर्ममार्तंडांनी शिवरायांचे क्षत्रियत्व नाकारले. त्यासाठी त्यांनी तीन कारणे दिली. परशुरामाने एकवीस वेळा पृथ्वी निःक्षत्रिय केली आहे. त्यामुळे आता पृथ्वीवर क्षत्रियच राहिला नाही. नंद कुळाच्या नाशानंतर क्षत्रियाचा समूळ नायनाट झाला. काहीजणांनी असाही जावाई शोध लावला , की शिवाजी महाराज क्षत्रिय असले, तरी त्यांची मुंज वेळेवर झाली नाही.त्यामुळे संस्काराचा लोप झाल्याने, ते आता क्षत्रिय राहिले नाहीत, तर शूद्र झाले.शूद्रांचा राज्याभिषेक करता येणार नाही,अशी भूमिका महाराष्ट्रातील तमाम वर्णवर्चस्ववादी मंडळींनी घेतली.

स्वतःच्या प्राणाची बाजी लावत,अनेक शत्रूंना आस्मान दाखवत, इतके देखणे स्वराज्य छत्रपतीनी उभे केले होते, पण राज्याभिषेकाच्यावेळी मात्र इथल्या धर्ममार्तंडांनी छत्रपतींना विरोध केला, हे आकलनाच्या पलीकडले आहे.
अनेक संकटावर यशस्वीपणे मात करणारे छत्रपती शिवाजी महाराज हार मानतील, तर ते राजे कसे? त्यांनी मोठ्या हिकमतीने आणि हुकमतीने आपला राज्याभिषेक रायगडावरती मोठ्या थाटामध्ये संपन्न केला. मूळ पैठणचे काशीनिवासी गागाभट यांना रायगडावरती आणून, त्यांच्या हस्ते राज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. 29 मे ते 06 जून 1674 च्या दरम्यान जवळपास सव्वा महिने राज्याभिषेकाचे विविध विधी आणि समारंभ संपन्न झाले. 6 जून 1674 ला मुख्य राज्याभिषेकाचा सोहळा रायगडावरती संपन्न झाला. या सोहळ्याला महाराष्ट्रासह देशभरातील अनेक राजे-महाराजे, जाहागिरदार, सरदार, तसेच जगभरातील अनेक राष्ट्रांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या प्रसंगी त्या वेळी रायगडावर इंग्रज प्रतिनिधी ऑकझनबर्ग आणि फ्रेंच प्रतिनिधी फ्रान्सिस जर्मिन हे आवर्जून उपस्थित होते. त्यांनी या नयनरम्य सोहळ्याचे वर्णन स्वतः लिहून ठेवले आहे. या राज्याभिषेक सोहळ्याला 75 हजार लोक उपस्थित असल्याची नोंद इतिहासामध्ये आहे. शिवरायांचा राज्याभिषेक झाला आणि महाराष्ट्रातील मराठे सामाजिक, धार्मिक, राजकीय आणि मानसिक गुलामगिरीतून मुक्त झाले. शिवछत्रपती अधिकृत राजे झाले. राजदंड त्यांच्या हातात आला. ब्राह्मणासहित सर्वानाच शासन करण्याचा अधिकार त्यांना प्राप्त झाला. इथूनच राजाने शिवशक सुरू केला. फारसी भाषेची मक्तेदारी मोडून मराठीला राजभाषेचा दर्जा देण्यात आला. राज्यव्यवहारकोश तयार करण्यात आला. स्वतंत्र अशी दंडनिती तयार करण्यात आली. शिवरायांनी स्वतःचे नाने पाडले.त्यावर श्री छत्रपती असे कोरले. शिवरायांच्या या राज्याभिषेक सोहळ्याचे वर्णन करतांना सभासद म्हणतात” एवढा मराठा छत्रपती झाला, ही गोष्ट काही सामान्य नव्हे.” धर्ममार्तंडाच्या विरोधाला दूर सारून छत्रपती शिवराय राजे झाले. म्हणूनच मध्ययुगीन भारताच्या इतिहासातील ही घटना क्रांतिकारी स्वरूपाची ठरली.

6 जून 1974 ला शिवरायांच्या तीनशेव्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून देशाच्या तत्कालीन प्रधानमंत्री स्वर्गीय इंदिराजी गांधी रायगडावर उपस्थित होत्या. त्या बोलताना म्हणाल्या,” छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक म्हणजे भारतामध्ये राष्ट्रवादाच्या उदयाची पहाट आहे.” न्यायमूर्ती रानडे म्हणतात,” शिवछत्रपतींच्या राज्याभिषेक म्हणजे स्वराज्याचा उदय आणि भारताच्या राष्ट्रीयत्वाचा प्रारंभ आहे.” शिवछत्रपतींच्या सुशासनाचा गौरव करताना लंडन गॅझेटमध्ये लिहिले गेले आहे ” शिवाजी महाराज वाज नॉट ओन्ली किंग ऑफ महाराष्ट्रा, बट ही वाज किंग ऑफ इंडिया.” या वर्षीचा
शिवराज्याभिषेक सोहळा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साध्या स्वरूपात, परंतु तेवढ्याच उत्साहात साजरा होतो आहे. यावर्षी महाविकास आघाडी सरकारने शिवराज्याभिषेक दिन ‘ शिवस्वराज्य दिन’ म्हणून साजरा करण्याचे निश्चित केले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व कार्यालयांमध्ये शिवस्वराज्य दिन मोठ्या हर्षोल्हासात साजरा होत आहे. या सोहळ्यामध्ये राष्ट्रगीत आणि महाराष्ट्र गीत सादर केले जाणार आहे. स्वराज्यध्वजासह, शिवशक, राजदंड, स्वराज्यगुढी उभारून त्यास अभिवादन करण्यात येणार आहे. या माध्यमातून शिवछत्रपतींच्या अविस्मरणीय कार्याला प्रणाम करण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचाराला आदर्श मानून काम करणाऱ्या महाविकास आघाडी सरकारचे, एक शिवप्रेमी म्हणून मी मनापासून अभिनंदन करतो. शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या तमाम शिवप्रेमी बहुजन बांधवांना हार्दिक शुभेच्छा!!

_—–____———-______—–___—-___—–____—–____—–

हे ही वाचा

<

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top
error: लेख Copy Peast करण्यापेक्षा Share करा. News Maharashtra Voice