Nanded district 8 Important information of the day in a single news.

Nanded district 8 Important information of the day in a single news.

नांदेड जिल्ह्यातील दिवसभरातील 8 म्हत्त्वाच्या घडामोडी एकाच बातमीत.

दहावीनंतर पुढे काय विषयावर मार्गदर्शन शिबीर संपन्न
नांदेड (जिमाका) दि. 23:- विद्यार्थ्यांना तंत्र शिक्षणाची आवड निर्माण व्हावी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना तंत्रशिक्षण अवगत व्हावे. त्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे जीवन सुखकर, सफल व्हावे आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची नांदेडला ये-जा पायपीट थांबावी यासाठी जिल्हा परिषद हायस्कूल मालेगाव येथे शासकीय तंत्रनिकेतनच्यावतीने दहावीनंतर पुढे काय या विषयावर मार्गदर्शन शिबीर नुकतेच संपन्न झाले.
या मार्गदर्शन शिबिरात शासकीय तंत्रनिकेतन पॉलिटेक्निक येथील विज्ञान विभागाचे नियंत्रक एस. आर. मुधोळकर, पदार्थ विज्ञान विभागाचे के. एस. कळसकर आणि इंग्रजी विषयाचे अधिव्याख्याता ए. एन. यादव यांनी मार्गदर्शन केले. यावेळी प्रशालेतील विद्यार्थ्यांचे तंत्रनिकेतनची नोंदणी करण्यात आली. हा कार्यक्रम प्रशालेतील इंग्रजी विषयाचे शिक्षक श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकारातून मार्गदर्शन शिबीर संपन्न झाले. यावेळी प्रशालेतील शिक्षक जे. एम. तुपसौंदर, विनायक जमदाडे यांची उपस्थिती होती. प्रशालेच्यावतीने शिवा कांबळे यांनी आभार मानले.

जिल्ह्यात गत 24 तासात सरासरी 29.2 मि.मी. पाऊस
नांदेड (जिमाका) दि. 23:- जिल्ह्यात शुक्रवार 23 जुलै 2021 रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या गत 24 तासात सरासरी 29.2 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यात एकुण 360.7 मिलीमीटर पाऊस झाला आहे.
जिल्ह्यात शुक्रवार 23 जूलै रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या गत 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये तालुकानिहाय पुढील प्रमाणे, कंसात एकूण पाऊस : नांदेड- 29.6 (361.7), बिलोली- 60.3 (437.4), मुखेड- 14.4 (318.6), कंधार-17.1 (324.6), लोहा-25.7 (362.3), हदगाव-15.9 (311.4), भोकर- 20.3 (370.), देगलूर-31 (330.7), किनवट- 21.9 (438), मुदखेड- 37.9 (397), हिमायतनगर-55.4 (373), माहूर- 3 (284), धर्माबाद- 87.7 (427.4), उमरी- 32.3 (398.7), अर्धापूर- 10.2 (378.9), नायगाव- 42.2 (352.5) मिलीमीटर आहे.

जिल्ह्यातील 63 केंद्रावर कोविड-19 चे लसीकरण
नांदेड (जिमाका) दि. 23 :- जिल्हा आरोग्य विभागातर्फे जिल्ह्यातील 63 लसीकरण केंद्रावर कोविड-19 चे लसीकरण व्हावे यादृष्टिने उपलब्ध लस सर्वत्र विभागून पाठविली आहे. यात 18 ते 44 वयोगटासह 45 वर्षावरील व्यक्तींना कोव्हॅक्सीन व कोविशील्ड लसीचा पहिला व दुसरा डोस उपलब्ध करुन दिला आहे. शनिवार 24 जुलै 2021 रोजी लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेली डोसची संख्या पुढीलप्रमाणे आहे.
मनपा क्षेत्रातील श्री गुरु गोविंद सिंघजी जिल्हा रुग्णालय, डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय, शहरी दवाखाना हैदरबाग, शिवाजीनगर,जंगमवाडी, दशमेश हॉस्पिटल, कौठा, श्रावस्तीनगर (विजयनगर), सिडको, रेल्वे हॉस्पिटल,पौर्णिमानगर, सांगवी, खडकपुरा, करबला, अरबगल्ली, तरोडा, विनायकनगर येथे एकूण 18 केंद्रावर कोविशील्ड लसीचे प्रत्येकी 100 डोस उपलब्ध आहेत. तर स्त्री रुग्णालय येथे कोविशील्ड लसीचे प्रत्येकी 50 डोस उपलब्ध आहेत. तर डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय, शहरी दवाखाना, दशमेश हॉस्पिटल, श्रावस्तीनगर (विजयनगर), सिडको, रेल्वे हॉस्पिटल, खडकपुरा, अरबगल्ली, या 8 केंद्रावर कोव्हॅक्सीन लसीचे प्रत्येकी 100 डोस उपलब्ध आहेत. तर शहरी दवाखाना हैदरबाग, सांगवी, विनायकनगर, करबला, पौर्णिमानगर या 5 केंद्रावर कोव्हॅक्सीन लसीचे प्रत्येकी 50 डोस उपलब्ध आहेत
शहरी भागात मोडणाऱ्या लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेले डोस पुढीलप्रमाणे आहेत. उपजिल्हा रुग्णालय हदगाव, गोकुंदा, मुखेड ग्रामीण रुग्णालय भोकर, धर्माबाद, हिमायतनगर, लोहा, माहूर, मुदखेड, बारड, नायगाव, उमरी या 12 केंद्रावर कोविशील्ड लसीचे प्रत्येकी 100 डोस तर उपजिल्हा रुग्णालय मुखेड ग्रामीण रुग्णालय भोकर, धर्माबाद, हिमायतनगर,मांडवी, माहूर,बारड, उमरी या 8 केंद्रावर कोव्हॅक्सीन लसीचे प्रत्येकी 100डोस उपलब्ध आहेत. उपजिल्हा रुग्णालय हदगाव, गोकुंदा, ग्रामीण रुग्णालय लोहा या 3 केंद्रावर कोव्हॅक्सीन लसीचे प्रत्येकी 50 डोस उपलब्ध करुन दिले आहेत.
जिल्ह्यात ग्रामीण भागातील 26 प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविशील्ड लसीचे प्रत्येकी 100 डोस तर 5 प्राथमिक आरोग्य केंद्रावर कोविशील्ड लसीचे प्रत्येकी 50 डोस उपलब्ध करुन दिले आहेत.
वरील सर्व लसीकरण केंद्रावर 18 ते 44 वयोगटासह 45 वर्षावरील लाभार्थ्यांना कोविड-19 लसीचा पहिला व दुसरा डोस दिला जाणार आहे. यासाठी ऑनलाईन किंवा लसीकरण केंद्रावर नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.
जिल्ह्यात 22 जुलैपर्यंत एकुण 7 लाख 65 हजार 644 लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. तर 23 जुलै पर्यंत कोविड-19 लसीचा साठा पुढीलप्रमाणे प्राप्त झालेला आहे. कोविशिल्डचे 5 लाख 98 हजार 30 डोस, कोव्हॅक्सीनचे 1 लाख 79 हजार 360 डोस याप्रमाणे एकुण 7 लाख 77हजार 390 डोस प्राप्त झाले आहेत.
केंद्र शासनाच्या सूचनेनुसार कोविशिल्ड लसीचा पहिला डोस ज्यांनी घेतला आहे त्यांच्या 12 ते 16 आठवडे म्हणजेच सुमारे 84 दिवसानंतर दुसरा डोस दिला जाईल. जिल्ह्यातील सर्व कार्यक्षेत्रामध्ये कोविशील्ड व कोव्हॅक्सीन लस 18 ते 44 वयोगटासाठी व 45 वर्षावरील वयोगटासाठी पहिला व दुसरा डोस उपलब्ध राहील. यासाठी ऑनलाईन व ऑनस्पॉट नोंदणीची सुविधा उपलब्ध राहिल. मनपा कार्यक्षेत्रातील लाभार्थ्यांना कोविशील्ड व कोव्हॅक्सीन लस घेण्यासाठी cowin.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य आहे. ऑनलाईन नोंदणी पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांचे संबंधित केंद्रावर लसीकरण करण्यात येईल. ऑनलाईन नोंदणीची वेळ सायंकाळी 6 पासून पुढे सुरु राहील. लसीचा उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभाग याचे नियोजन करेल. नागरिकांनी लसीच्या उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी केले.

कृषि यांत्रिकीकरण, सुक्ष्म सिंचन घटकांतर्गत
महाडीबीटी पोर्टलवर निवड झालेल्या लाभार्थ्यांना कागदपत्रे अपलोड करण्याचे आवाहन
नांदेड (जिमाका) दि. 23 :- कृषि यांत्रिकीकरण तसेच सुक्ष्म सिंचन घटकांतर्गत विविध योजनेतून महाडीबीटी पोर्टलवर नांदेड जिल्ह्यात 9 हजार 726 लाभार्थ्यांची निवड झाली आहे. या लाभार्थ्यांना लघुसंदेश पाठवण्यात आलेले आहेत. त्यापैकी आतापर्यंत 4 हजार 291 लाभार्थ्यांनी कागदपत्रे अपलोड केली असून उर्वरित लाभार्थ्यांनी कागदपत्रे अपलोड केली नाहीत. निवड झालेल्या लाभार्थ्यांनी यांत्रिकीकरण घटकासाठी आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी आर. बी. चलवदे यांनी केले आहे.अपलोड कराव्याच्या कागदपत्रात सातबारा उतारा, आठ-अ उतारा, निवड झालेल्या यंत्राचे कोटेशन, तपासणी अहवाल, अ.जाती / अ.जमाती प्रवर्गातून निवड झाल्यास वैध जातप्रमाणपत्र आदी कागदपत्रे तसेच सुक्ष्म सिंचन घटकासाठी आवश्यक कागदपत्रे सातबारा उतारा, आठ-अ उतारा, सिंचनाची स्रोत नोंद, अ.जाती / अ. जमाती प्रवर्गातून निवड झाल्यास वैध जात प्रमाणपत्र आदी कागदपत्रे अपलोड करावीत. ज्या लाभार्थ्यांनी कागदपत्रे अपलोड केली आहेत त्यांना कागदपत्रे तपासून पूर्व संमती देण्यात आली आहे. सुक्ष्म सिंचन या घटकांतर्गत ज्या लाभार्थ्यांना पूर्व समंती मिळूनही सुक्ष्म संच कार्यन्वित केले नाहीत अशा शेतकऱ्यांनी सुक्ष्म संच प्रक्षेत्रावर कार्यान्वित करुन देयके अपलोड करावीत. विहीत मुदतीत संच कार्यान्वीत करुन देयके अपलोड न केल्यास दिलेली पूर्व संमती रद्द करण्यात येणार आहे.मुदत देऊन विहित कालावधीत कागदपत्रे अपलोड न केल्यास असे अर्ज महाडीबीटी पोर्टल मधून अर्ज रद्द होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ज्या लाभार्थ्यांची लॉटरीद्वारे निवड झालेली आहे परंतु त्यांनी महाडीबीटी पोर्टलवर कागदपत्रे अपलोड केली नाहीत अशा सर्वांनी तात्काळ कागदपत्रे अपलोड करावीत. सद्यस्थितीत विभागाने Maha DBT Farmer या नावाचे मोबाईल ॲप तयार केले असून याद्वारे कागदपत्रे अपलोड करणे सुलभ झाले आहे. हे ॲप GooglePlay Store वर उपलब्ध आहे. याविषयी अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी केले आहे.

मागासवर्गीय विकास महामंडळाच्या विविध योजनांसाठी संपर्क साधण्याचे आवाहन
नांदेड (जिमाका) दि. 23 :- राज्यातील ओबीसी प्रवर्गातील लोकांच्या आर्थिक उन्नतीसाठी स्वयंरोजगाराला चालना देण्याच्या उद्देशाने शासनाने बहुजन कल्याण विभागांतर्गत इतर मागासवर्गीयांसाठी महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत कृषी संलग्न, लघुउद्योग, सेवा उद्योग इत्यादी नवीन व्यवसाय किंवा व्यवसाय वाढीसाठी वित्त पुरवठा योजना राबविण्यात येत आहेत. इ.मा.व. प्रवर्गातील इच्छुक व्यक्तींनी अधिक माहितीसाठी महामंडळाच्या कार्यालयाचा दूरध्वनी 02462-220865 या क्रमांकावर किंवा www.msobcfdc.org या वेबसाईटला भेट द्यावी, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ नांदेड यांनी केले आहे.

नांदेड जिल्ह्यात 5 व्यक्ती कोरोना बाधित तर 6 कोरोना बाधित झाले बरे
नांदेड (जिमाका) दि. 23 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 1 हजार 426 अहवालापैकी 5 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 4 तर अँटिजेन तपासणीद्वारे 1 अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 90 हजार 142 एवढी झाली असून यातील 87 हजार 432 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 54 रुग्ण उपचार घेत असून यात 4 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

आयटीआयमध्ये 4 हजार 156 जागेसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू ; ऑनलाईन अर्ज नोंदणी करण्याचे आवाहन
नांदेड (जिमाका) दि. 23 :- शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) मध्ये सन 2021-22 साठी प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. जिल्ह्यातील शासकीय आयटीआयत 2 हजार 616 तर खाजगी आयटीआयत 1 हजार 540 जागा अशा एकूण 4 हजार 156 जागेसाठी ही प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. जिल्ह्यातील युवक-युवतीनी या संधीचा लाभ घेऊन ऑनलाईन अर्ज नोंदणी करावी, असे आवाहन संस्थेचे प्राचार्य एम. एस. बिरादार यांनी केले आहे.
इतर अभ्यासक्रमाच्या तुलनेत आयटीआयच्या विविध ट्रेडला मागणी अधिक आहे. जिल्ह्यातील प्रवेशासाठी विविध तालुकास्तरावर असलेल्या संस्थेत विविध ट्रेडसाठी जागा उपलब्ध आहेत. ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी प्रक्रिया सुरु झाली असून यासाठी http://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर प्रवेश अर्ज भरता येतो.

नांदेड पाटबंधारे मंडळातील धरणात 62 टक्के पाणीसाठा
नांदेड (जिमाका) दि. 23 :- पाटबंधारे मंडळातर्गंत निम्न मानार प्रकल्पात 83 टक्के, उर्ध्व पैनगंगा प्रकल्पात (इसापूर धरण) 63.32 टक्के, येलदरी धरणात 69.57 टक्के, विष्णुपुरी प्रकल्पात 75 टक्के इतका पाणीसाठा निर्माण झाला आहे. तर मंडळातर्गंत मध्यम प्रकल्पात 60.59 टक्के, नऊ उच्च पातळी बंधाऱ्यात 71.65 टक्के जिल्ह्यातील 88 लघु प्रकल्पात 57.59 टक्के पाणीसाठा निर्माण झाला आहे. बाभळी उच्च पातळी बंधाऱ्यातून तेलंगणा राज्यात 1 हजार 291 दलघमी पाणी वाहून गेले आहे, अशी माहिती नांदेड पाटबंधारे मंडळाचे अधिक्षक अभियंता स. कों. सब्बीनवार यांनी दिली.

<

Related posts

Leave a Comment