बहुजन समाजाच्या हक्कासाठी लक्ष्मण हाके यांचा ठाम पवित्रा: “धरणवीरांनी शिकवू नये विवेक आणि विकृती”
Laxman Hake strongly criticizes Ajit Pawar for discrimination in fund distribution as Finance Minister
पुणे | प्रतिनिधी
ओबीसी, भटक्या-विमुक्त, दलित, आदिवासी समाजाच्या हक्कासाठी सातत्याने आवाज उठवणारे सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण हाके यांनी उपेक्षित घटकांच्या निधी वितरणातील अन्यायावर परखड भाष्य करत राज्यकर्त्यांना सवाल विचारले आहेत. “धरणात पाणी नसताना शेतकऱ्यांना अमृत पाजण्याची भाषा करणाऱ्यांनी आम्हाला विवेक शिकवू नये,” असा घणाघात करत त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर खरमरीत टीका केली आहे. Laxman Hake strongly criticizes Ajit Pawar for discrimination in fund distribution as Finance Minister
लक्ष्मण हाके यांनी बहुजन समाजाच्या ऐतिहासिक उपेक्षेचा संदर्भ देत म्हटले की, “स्वातंत्र्यपूर्व हजारो वर्षांचा आणि स्वातंत्र्यानंतर ७५ वर्षांचा प्रवास हा आमच्या खच्चीकरणाचाच राहिला. मात्र आता उपेक्षित वर्ग आपली मान उंचावू लागला आहे, आणि हे काही सत्ताधाऱ्यांना खटकते.”
अजित पवारांच्या ‘राजकीय विकृती’ विषयक विधानावर प्रत्युत्तर देताना हाके म्हणाले, “विवेक आणि विकृतीतला फरक समजावून सांगण्याआधी अजित पवारांनी महात्मा फुलेंची पुस्तके वाचावीत. फुले यांची भाषा ही व्याकरणाचे बंधन न पाळता तिडीक मांडणारी होती, आम्ही त्याच शाळेचे विद्यार्थी आहोत.”
हाके यांनी फुलेंच्या मृत्यूपत्राचा दाखला देत पवार घराण्यावरही निशाणा साधला. “फुलेंनी स्पष्ट म्हटलं होतं की वारस अक्षम ठरल्यास त्याला संपत्तीपासून बेदखल करावं. पण पवार घराणं उलट अर्थानं हा नियम पाळत आहे – जितका बहुजनहिताचा विरोध, तितका वारसा अधिक.”
आपली जात, आपली भटकंती, आणि सामाजिक बांधिलकी यावर गर्व व्यक्त करत हाके म्हणाले, “मी ओबीसी आहे, भटका आहे, धनगर आहे. समतेची ओवी गाणारी माझी जात आहे. आम्ही वाघाच्या अंगावर धावून जाणारं रक्त ठेवतो. परिवर्तनासाठी आम्ही तयार आहोत – एकदा नाही, शेकडोवेळा बलिदान द्यायला.”