Online Team : ‘आरक्षणाच्या संदर्भात मराठा समाजाची फसवणूक केली जात आहे. ५८ मूकमोर्चे काढले तरी आरक्षण मिळाले नाही. आता पुन्हा काही स्वयंघोषित नेते पुढे पुढे करीत आहेत. छावा संघटनेची पहिल्यापासूनच ठोक भूमिका राहिली आहे. संभाजीराजे यांना आमचा विरोध नाही. पण, त्यांनी घेतलेल्या भूमिकेला विरोध आहे. ते आरक्षणावर बोलत नाहीत. पण, सारथी संस्था, महामंडळाला निधी देण्याची भाषा बोलत आहेत. राजेंनी आमच्यासारखी ठोक भूमिका घ्यावी
‘मराठा आरक्षणासाठी ५८ मूकमोर्चे काढून काहीही फायदा झाला नाही. पण, समाजाचा वापर करून कोणी खासदारकी, कोणी आमदारकी तर कोणी महामंडळे मिळवून विश्वासघात केला आहे. स्वार्थी राजकारण सुरू आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा आरक्षणासंदर्भात घेतलेली भूमिका आम्हाला मान्य नाही. आरक्षणाची भूमिका बाजूला ठेवून राजे आज सारथी संस्था, महामंडळाला निधीची मागणी करीत आहेत. मूक आंदोलन करीत आहेत. मराठा समाजासाठी आता ठोक आंदोलन असेल. लवकरच महाराष्ट्रात आरक्षणासाठी उद्रेक दिसेल’, अशी माहिती अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष नानासाहेब जावळे यांनी मंगळवारी (ता.२२) येथे पत्रकार परिषदेत दिली.
‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आरक्षणावर बोलत नाहीत. पण, बंद दाराआड मात्र चर्चा करतात. आरक्षणाच्या नावाखाली नेत्यांची स्वतःची पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. न्यायालयात बाजू मांडण्यास राज्य शासन कमी पडले आहे. ठाकरे, अशोक चव्हाण यांनी मराठा समाजाला वाऱ्यावर सोडले आहे. मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण मिळाले पाहिजे यासाठी आमची लढाई आहे. आरक्षण नसल्याने समाजाचे मोठे नुकसान होत आहे. शांततेच्या मार्गाने मागण्या होत नाही हे आतापर्यंत पाहिले आहे. लवकरच महाराष्ट्रात या प्रश्नावर उद्रेक दिसेल. मराठा समाजाच्या २५ संघटना आमच्या सोबत आहेत, त्याची ताकद आम्ही दाखवून देऊ’, असा इशारा जावळे यांनी दिला.
यावेळी विद्यार्थी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष विजय घाडगे, भीमराव मराठे, भगवान माकणे, माधव गंभिरे, मराठा महासंग्रामचे राजकुमार सूर्यवंशी आदी उपस्थित होते.
हे खालील लेख वाचा . ——————————————-