आयटीआयच्या १० हजार विद्यार्थ्यांना मिळणार ऑन जॉब ट्रेनिंग – कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांची माहिती

आयटीआयच्या १० हजार विद्यार्थ्यांना मिळणार ऑन जॉब ट्रेनिंग – कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांची माहिती

10 Thousand ITI students to get on-the-job training – Skills Development Minister Nawab Malik

मुंबई, दि. 16 : राज्यातील दहा जिल्ह्यांमधील 126 शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (आयटीआय) शिकणाऱ्या साधारणतः 10 हजार प्रशिक्षणार्थ्यांना ऑन जॉब ट्रेनिंग उपलब्ध होणार आहे. यासाठी जर्मन ड्यूएल सिस्टीम ऑफ ट्रेनिंग या मॉडेल अंतर्गत प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार असून याकरीता राज्याचे कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांच्या उपस्थितीत व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय आणि सिमेन्स लिमिटेड व टाटा कम्युनिटी इनिशिएटीव्हज ट्रस्ट यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना प्रशिक्षण आणि त्याचबरोबर रोजगार उपलब्ध होईल. त्यामुळे हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरेल, असे मंत्री श्री. मलिक यांनी यावेळी सांगितले.
व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या कार्यालयात जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त काल आयोजित कार्यक्रमात हा सामंजस्य करार करण्यात आला. यावेळी कौशल्य विकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा वर्मा, कौशल्य विकास आयुक्त दीपेंद्रसिंह कुशवाह, कौशल्य विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. अनिल जाधव, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालक दिगंबर दळवी, सहसंचालक योगेश पाटील, सिमेन्स लिमिटेडचे मुख्य व्यवस्थापक मनमोहनसिंग कोरंगा, अनिस मोहंमद, टाटा स्ट्राईव्हचे अभिषेक धोत्रे यांच्यासह ऑनलाईन पद्धतीने राज्यातील आयटीआयचे प्राचार्य, शिक्षक, कर्मचारी आदी मान्यवर उपस्थित होते.

राज्यातील औरंगाबाद, कोल्हापूर, मुंबई, नागपूर, नाशिक, पालघर, पुणे, रायगड व ठाणे या १० जिल्ह्यातील १२६ शासकीय आयटीआयमध्ये इलेक्ट्रीशियन, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, फिटर, टर्नर, मशिनिस्ट, मशिनिस्ट ग्राईंडर, टूल आणि डाय मेकर, मोटार मेकॅनिक व्हेईकल, रेफ्रीजरेशन आणि एअर कंडीशनिंग तसेच वेल्डर या व्यवसाय अभ्यासक्रमात प्रशिक्षण घेत असलेल्या उमेदवारांसाठी हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या आयटीआयना नजिकच्या उद्योगांशी जोडून त्याद्वारे त्या उद्योगांमध्ये उमेदवारांना ऑन जॉब ट्रेनिंग उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. आयटीआयमधील प्रथम वर्ष प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर एक महिन्याचे ऑन जॉब ट्रेनिंग, द्वितीय वर्ष प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर दोन महिन्याचे ऑन जॉब ट्रेनिंग तर आयटीआयचा अंतिम निकाल घोषित झाल्यानंतर एक वर्षासाठी ॲप्रेंटीशीपची संधी उमेदवारांना उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. हा उपक्रम प्रभाविपणे राबविण्यात येईल. हा उपक्रम राज्यातील इतर जिल्ह्यांमध्येही सुरु करण्यासाठी सिमेन्स लिमिटेड व टाटा कम्युनिटी इनिशिएटिव्हीज ट्र्स्ट यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन मंत्री श्री. मलिक यांनी केले.
आयटीआयमधील पायाभूत सुविधा व प्रशिक्षणाचा विकास करण्यासाठी विविध उद्योग स्वत:हून पुढाकार घेत आहेत. यासाठी आतापर्यंत ५० हून अधिक नामांकित औद्योगिक आस्थापनांबरोबर सामंजस्य करार करण्यात आले आहेत, अशी माहिती मंत्री श्री. मलिक यांनी दिली.

औंध आयटीआयमध्ये अद्ययावत वेल्डींग वर्कशॉप
या कार्यक्रमात बांधकाम यंत्र सामुग्री आणि उद्वाहन (इलेव्हेटर्स) निर्मिती क्षेत्रातील नामांकित कंपनी थायसेनकृप इंडस्ट्रीज इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्यासमवेतही व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचा सामंजस्य करार करण्यात आला. या कंपनीद्वारे त्यांच्याकडील सीएसआर फंडामधून १ कोटी ८० लाख रुपये निधीतून औंध (जि. पुणे) येथील आयटीआयमध्ये अद्ययावत तंत्रज्ञानावर आधारीत वेल्डींग वर्कशॉप उभारण्यात येणार आहे. यासाठी थायसेनकृप इंडस्ट्रीजचे मुख्य वित्त अधिकारी पुलकीत गोयल आणि सुनिल सगणे यांनी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालक दिगंबर दळवी यांच्यासमवेत सामंजस्य कराराचे आदान-प्रदान केले.
राज्यात मोठ्या प्रमाणात बांधकाम व उत्पादन क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत. त्यामुळे कुशल संधाता (वेल्डर) यांची मोठ्या प्रमाणात मागणी आहे. थायसेनकृप इंडस्ट्रीजच्या सहयोगातून उभारण्यात येत असलेल्या वेल्डींग वर्कशॉपच्या माध्यमातून आयटीआयमधील विद्यार्थ्यांना या क्षेत्रातील अत्याधुनिक प्रशिक्षण उपलब्ध होईल, असे मंत्री श्री मलिक यांनी सांगितले.

<

Related posts

Leave a Comment