नितीन देसाई यांचे पार्थिव आज त्यांच्याच एनडी स्टुडिओमध्ये अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले आहे. स्टुडिओत असलेल्या जोधा अकबराच्या सेटवर नितीन देसाई यांना अखेरचा निरोप दिला जात आहे. संध्याकाळी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. दरम्यान उदयनराजे भोसले यांनी काही वेळापूर्वीच अंत्यदर्शनासाठी हजेरी लावली होती. तर स्टुडिओतील सर्व कर्मचाऱ्यांना लाडक्या दादांना अखेरचा निरोप देताना अश्रू अनावर झाले होते. नितीन देसाई यांच्यावर तिथल्या गावकऱ्यांचे अतोनात प्रेम होते. गावच्या अनेक लोकांना त्यांनी हाताला काम मिळवून दिले होते. त्यामुळे दादांना निरोप देताना अख्खं गाव हळहळ व्यक्त करत आहे.
नितीन देसाई आज अनंतात विलीन झाले सोबतच त्यांना त्रास देणाऱ्या पाच जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. नितीन देसाई यांना आत्महत्या करण्यास भाग पडणाऱ्या पाचही आरोपींची नावं रायगड पोलिसांनी जाहीर केली आहेत. ऑडिओ क्लिपमध्ये नितीन देसाई यांनी चार नव्हे तर पाच बिजनेसमन ची नावं जाहीर केली होती. ही नावं लोकांसमोर यावीत अशी तमाम जनतेने मागणी केली होती.
आता ही नावं समोर आली असून त्या पाचही जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. यात महत्वाचं नाव म्हणजे एडलवाईस कंपनीचे सीईओ आणि चेअरमन रशेष शहा यांचा समावेश आहे. तर स्मित शाह, जितेंद्र कोठारी, आर के बन्सल आणि केऊर मेहता अशा पाच आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे असे रायगड पोलिसांनी सांगितले आहे.
नितीन देसाई यांनी सीएफएम या वित्तीय संस्थेतून १८० कटींचे कर्ज घेतले होते. या कर्जाची वसुली करण्यासाठी सर्व खात्याचे अधिकार एडलवाईस कंपनीकडे सोपवण्यात आले होते. काल विधानसभेत आशिष शेलार यांनी नितीन देसाई यांना त्रास देणाऱ्या एका बिजनेसमनचे नाव जाहीर केले. एडलवाईस कंपनीचे सीईओ रशेष शहा यांनी नितीन देसाई यांना त्रास दिला असे ते भर सभेत बोलले. त्यानंतर बॉलिवूड मधल्या आणखी एका मोठ्या कलाकाराचे नाव यात आहे असेही म्हटले गेले.
नितीन देसाई यांनी तब्बल ११ ऑडिओ क्लिप रेकॉर्ड करून ठेवल्या होत्या. त्यात लालबागच्या राजाला त्यांनी अखेरचा नमस्कार असे म्हटले होते. तर एका ऑडिओ क्लिपमध्ये त्यांनी चार बिजनेसमनची नावं जाहीर केली होती. हे चारही बिजनेसमन मला मानसिक त्रास देत आहेत माझी फसवणूक करत आहेत असे त्या क्लिपमध्ये त्यांनी उघड केले होते. तर आपला एनडी स्टुडिओ या कर्ज देणाऱ्या कंपनीकडे जाऊ नये अशी विनंती त्यांनी पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांना केली होती. एनडी स्टुडिओ सरकारने ताब्यात घ्यावा असे नितीन देसाई स्पष्ट शब्दांत म्हणाले होते.
महत्वाचं म्हणजे नितीन देसाई हे आपल्या कर्जाबाबत वन टाइम सेटलमेंट साठीही तयार होते. पण कंपनीने आपला होकार आणि नकारही कळवला नसल्याने निर्णय लांबणीवर जात होता. खरं तर हे पाचही आरोपी नितीन देसाई यांचे एनडी स्टुडिओ कुठल्याही परिस्थितीत हडप करण्याच्या मार्गावर होते असा आरोप नितीन देसाई यांच्या कुटुंबियाने केला आहे.
एनडी स्टुडिओवर या अधिकाऱ्यांचा डोळा होता. त्याचमुळे देसाई सेटलमेंट साठी तयार असूनही हे अधिकारी त्यांचा निर्णय देत नव्हते. कर्जाच्या रक्कमेवरील व्याज कसे वाढले जाईल याकडे हे अधिकारी लक्ष देऊन होते. कंपनीने केवळ वेळ मारून नेण्याचे काम केले अशी धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. त्यामुळे रायगड पोलीस या पाचही आरोपींची सखोल चौकशी करणार आहेत. या साठी समन्स देऊन त्यांना चौकशीसाठी बोलावले जाणार आहे असे रायगड पोलिसांनी स्पष्ट केले आहे.