महाराष्ट्रातील, तसेच आंध्र-कर्नाटकातील कोट्यावधी भाविकांचे आराध्य दैवत आणि महाराष्ट्रातील भागवत धर्म वा संप्रदाय म्हणून ख्यातकीर्त असलेल्या ⇨वारकरी संप्रदायाचे उपात्य दैवत. विठ्ठल, पांडुरंग, पंढरीनाथ अशा अन्य नावांनीही ते प्रसिद्ध आहे. ह्या नोंदीत विठोबाचा निर्देश त्याच्या अन्य नावांनीही केला आहे. Pandhari Pandurang Vithoba Vitthal Rakhumai Information महाराष्ट्राच्या सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथे विठोबाचे प्रमुख मंदिर असून वारकरी संप्रदायाच्या अनुयायाचे-वारकऱ्यांचे-ते प्रमुख तीर्थस्थान होय. आषाढी आणि कार्तिकी शुद्ध एकादशांना तेथे सर्व वारकरी, तसेच महाराष्ट्र-आंध्र-कर्नाटकांतून लाखो अन्य भाविक विठोबाच्या दर्शनासाठी येतात. शुद्ध माघी व शुद्ध चैत्री ह्या एकादशांनाही पंढरपूरला आवर्जून येणारे वारकरी आणि अन्य भाविक आहेत. Pandharichi Wari पंढरपूर येथील विठोबाच्या मंदिरातल्या सोळंखांबी मंडपातील एका तुळईवर कोरलेल्या संस्कृत आणि कन्नड लेखातील संस्कृत आणि कन्नड अशा दोन्ही भागांत पंढरपूरचा निर्देश ‘पंडरगे’असा केलेला आढळतो. पंडरगे हेच पंढरपूरचे मूळ नाव असून ते कानडी आहेह्या नावावरूनच पांडुरंगक्षेत्र, पांडुरंगपूर, पौंडरीकक्षेत्र, पांडरीपूर, पांडरी व पंढरपूर ही क्षेत्रनामे तयार झाली. विठोबाला पांडुरंगही म्हणतात पण ‘पांडुरंग’ हे नाव पंडरगे ह्या मूळ क्षेत्रनामाचेच संस्कृतीकरण असून क्षेत्रनाम म्हणूनही ते वापरले जात होते, असे दिसते. ‘पांडुरंग’ ह्या शब्दाचा अर्थ ‘शुभ्र रंग’ असा होत असल्यामुळे तो गौरवर्णीय शिवाचा दर्शक आहे, असे प्रथमदर्शनी वाटले, तरी तसा अर्थ मराठी संतांना अभिप्रेत असल्याचे कुठेच दिसून येत नाही. मराठी संत हे शिव आणि विष्णू ह्यांच्या ऐक्याचेच पुरस्कर्ते होते तथापि त्यांनी पांडुरंगाला विष्णुचा अवतार असलेला गोपाळकृष्ण मानले. त्यांच्या दृष्टीने तो गोपवेष धारण केलेला श्रीहरी आहे. गाईच्या खुरांमुळे उधळलेली धूळ अंगावर पसरल्यामुळे सारी काया धूसर झालेल्या गोपाळकृष्णाला त्यांनी ‘पांडुरंग’ म्हटले आहे. श्रीज्ञानदेवांपासून निळोबांपर्यंत अनेक मराठी संतांनी विठोबाचे गुणगान केले आहे त्याचप्रमाणे चौंडरस, कनकदास, पुरंदरदास अशा दक्षिण भारतीय कवींनीही विठोबाला आपले परमप्रिय आराध्य दैवत मानले आहे. केरळीय कृष्णभक्त कवी लीलाशुक (बारावे-तेरावे शतक) ह्याने आपल्या श्रीकृष्णकर्णामृतम् ह्या संस्कृत काव्यात भीमरथीकाठच्या ‘दिगंबर’ आणि ‘तमालनील’ अशा विठाबोचे वर्णन केले आहे. सुप्रसिद्ध माध्वपंडित वादिराजतीर्थ ह्यांनीही आपल्या तीर्थप्रबंधनामक काव्यात विठोबांची स्तुती केली आहे. Pandhari Pandurang Vithoba Vitthal Rakhumai Information
विठ्ठलापासून विठोबा हे नाव प्रचारात आले. विठ्ठल ह्या नावाची सर्वमान्य अशी व्युत्पत्ती मिळालेली नाही. इतिहासाचार्य राजवाडे ह्यांनी विठ्ठल हा शब्द ‘विष्ठल’ (दूर रानावनात असलेली जागा) ह्या शब्दापासून व्युत्पादावा, असे म्हटले आहे. ह्या व्युत्पत्यनुसार विठ्ठलदेव हा दूर, रानावनात असणारा देव ठरतो. डॉ. रामकृष्ण गोपाळ भांडारकर ह्यांच्या मते ‘विष्णु’ ह्या शब्दाचे कानडी अपभ्रष्ट रूप ‘विट्टि’ असे होते आणि ‘विट्टि’ वरूनच ‘विठ्ठल’ हे रूप तयार झाले. शब्दमणिदर्पणाच्या अपभ्रंश प्रकरणातील ३२ व्या सूत्राचा आधार घेऊन राजपुरोहित ह्यांनी विष्णुचे ‘विट्टु’ असे रूप कसे होते, हे दाखवले आहे. ह्या रूपालाच प्रेमाने ‘ल’ हा प्रत्यय लावला, की ‘विठ्ठल’ असे रूप तयार होते, असे त्यांचे प्रतिपादन आहे. विदा (ज्ञानेन), ठीन् (अज्ञजनान्), लाति (गृह् णाति) म्हणजे ‘अज्ञ जनांना ज्ञानाने स्विकारणारा, तो विठ्ठल’ अशीही एक व्युत्पत्ती दिली जाते. ह्या व्युत्पत्तीतील ‘विठ्ठल’ ह्या नावातील प्रत्येक अक्षराला तात्विक अर्थ प्राप्त करून देण्यात आलेला आ हे. ‘विदि (ज्ञाने) स्थलः (स्थिरः)’ ‘म्हणजे जो ज्ञानाच्या ठिकाणी आहे, तो विठ्ठल’, अशी एक व्युत्पत्ती वि. कृ. श्रोत्रिय ह्यांनी दिली आहे. इटु, इठु, इटुबा, इठुबा ही विठ्ठलाची ग्रामीण मराठीतील नामोच्चारणे आहेत आणि विठ्ठलाचे ध्यान कमरेवर हात ठेवलेले, असे आहे. श्रीविठ्ठलाचे एक अभ्यासक विश्वनाथ खैरे ह्यांनी ‘इटु’ असा शब्द तमिळ भाषेत असून त्याचा अर्थ ‘कमरेवर हात ठेवलेला’असा असल्याते प्रतिपादन केले आहे. ‘विटेवर जो उभा, तो विठ्ठल’अशीही एक व्युत्पत्ती दिली जाते. Pandhari Pandurang Vithoba Vitthal Rakhumai Information
विठ्ठल हा ‘युगे अठ्ठावीस’ पंढरपुरी विटेवर उभा आहे, असे म्हटले जाते. त्याचा अर्थ, चालू अठ्ठावीसाव्या मन्वंतरातही आपल्या भक्तांसाठी तो पंढरपुरात उभा आहे, असे घेता येईल.
विठ्ठल हा कानडा आहे. श्रीज्ञानदेवांनी त्याला ‘कानडा’ आणि ‘कर्नाटकु’ अशी दोन्ही विशेषणे लावलेली आहेत. एकनाथांनी ‘तीर्थ कानडे देव कानडे । क्षेत्र कानडे पंढरीये।’असे म्हटले आहे, तर नामदेवांनी ‘कानडा विठ्ठल तो उभा भीवरेतीरी’ असा त्याचा निर्देश केला आहे. नामदेव तर विठ्ठलाचा भाषिक निर्देशही करतात (विठ्ठल कानडे बोलू जाणे । त्याची भाषा पुंडलीक नेणे ।।). ‘कानडा म्हणजे अगम्य’ अशा अर्थानेही संतांनी श्रीविठ्ठलाचे उल्लेख केलेलेआहेत. ‘कर्नाटकु’ ह्या शब्दाचा कर्नाटक ह्या प्रदेशाशी संबंध नसून ‘कर्नाटकु’ म्हणजे ‘करनाटकु’ वा ‘लीलालाधव दाखविणारा’, असेही मत काही अभ्यासकांनी व्यक्त केलेले आहे परंतु पंढरपूर हे महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांच्या सीमेवर आहे. त्याचे प्राचीन नाव ‘पंडरगे’ हे तर कानडीच आहे. विठ्ठलाचे बहुतेक सेवेकरीही कर्नाटकातले आहेत, ह्या बाबीही लक्षणीय ठरतात. श्रीविठ्ठल हे महाराष्ट्र-कर्नाटकाच्या, तसेच आंध्र प्रदेशाच्या सांस्कृतिक एकतेचे आणि प्रेमाचे प्रतीक आहे.
20विठोबाचे पंढरपुरातील प्रकटन: पंढरपुरात विठोबा कसा प्रकटला ह्याविषयीची सर्वश्रुत कथा पुंडलीक ह्या मातृपितृभक्ताशी संबंधित आहे. पुंडलिकाच्या भेटीसाठी वैकुंठीचा देव विष्णू हा पंढपुरी आला. ‘आईवडिलांची सेवा करतो आहे ती पूर्ण होईपर्यंत ह्या विटेवर थांब’असे देवाला सांगून पुंडलिकाने एक वीट भिरकावली आणि त्याच विटेवर देव कटी कर ठेवून उभा राहिला, अशी ही कथा आहे. सर्व संतांनी आणि अन्य भाविकांनी ता मोठ्या श्रद्धेने स्वीकारलेली आहे. भक्तराज, महावैष्णव म्हणून पुंडलीक ओळखला जातो. पंढरपुरात श्रीविठ्ठलाचे दर्शन घेण्यापूर्वी पुंडलिकाचे दर्शन घेण्याचा संकेत आहे.
पंढरपुरातील विठ्ठलाच्या प्रकटनासंबंधी आणखी तीन कथा सांगण्यात आल्या आहेत: (१) डिंडिरव वनातल्या डिंडीरव ह्याच नावाच्या एका दैत्याचा वध करण्यासाठी विष्णुने मल्लिकार्जुन शिवाचे रूप घेतले आणि त्याचा वध केला पंढरपूर येथे भीमातटी दिंडीरवन म्हणून एक ठिकाण आहे. त्याचा ह्या कथेतील डिंडीरव वनाशी संबंध जोडलेला दिसतो. (२) कृष्णाने द्वारकेत आल्यानंतरही राधेशी असलेली जवळीक सोडली नाही, म्हणून रूक्मिणी रूसून उपर्युक्त दिंडीरवनात येऊन राहिली तिची समजूत काढण्यासाठी कृष्ण हा आपल्या गाईगोपाळांसोबत आला आणि गोपवेष धारण करून रूक्मिणीस भेटावयास गेला. आपला परिवार त्याने पंढरपुराजवळच असलेल्या गोपाळपुरास ठेवला. पंढरपुराजवळ असलेल्या गोपाळपुराला वारकऱ्यांच्या वारीत फार महत्त्व आहे. गोपाळपुर हे एक वाडीवजा गाव आहे, तिथे गोपाकृष्णाचे मंदिर आहे. त्या मंदिरात भजने गात दिंड्या जातात. गोपाळकृष्णाचा काला दिला जातो. त्यानंतर बारीची सांगता होते. दिंडीरवनात लखूबाई नावाच्या देवतेचे मंदिर असून तिथे तिचा मूळ अनघड तांदळा आणि त्यामागे तिचे गजलक्ष्मीचे मूर्तीरूप आहे. कृष्णावर रूसून दिंडीरवनात आलेली रूक्मिणी म्हणजेच ही लखूबाई असे समजले जाते. (३) पद्मा नावाच्या एका सुंदर तरूण स्त्रीने इष्ट वर मिळावा म्हणून तपश्चर्या सुरू केली, तेव्हा विष्णूने तिच्यापेक्षा मनोहर रूप धारण करून तो तिच्या समोर प्रकट झाला. त्या रूपाचा तिला मोह पडला. तिचे वस्त्र गळून पडले आणि केस मोकळे झाले. पुढे तिच्या नावाने ‘मुक्तकेशी’ नावाचे तीर्थ निर्माण झाले. पंढरपूरच्या पश्चिमेस पद्मावती तीर्थ नावाचे तळे (कोरडे) आहे. तिथे पद्मावतीचे देऊळही आहे. पद्मावतीला ‘नग्ना’ आणि ‘मुक्तकेशी’ अशी विशेषणे लावली जातात. लखूबाई आणि पद्मावती ह्या दोन्ही देवतांच्या पूजेचा अधिकार श्रीविठ्ठलाच्या पुजाऱ्यांकडेच आहे. ह्या कथांपैकी डिंडीरवाची व द्वारकेतून रुसून पंढरपुराला आलेल्या रूक्मिणीची कथा पाद्म पांडुरंगमहात्म्यात, पुंडलिकाची कथा स्कांद पांडुरंगमाहात्म्यात आणि पद्मेची कथा स्कांद आणि पद्म अशा दोन्ही पांडुरंगमहात्म्यात आलेली आहे. ही पांडुरंगमाहात्म्ये पांडुरंगाचे, तसेच पंढरपूरचे महत्त्व सांगणारी संस्कृत पुराणे आहेत.
विठोबाची स्थापना व पूजन पंढरपूर येथे कधी सुरू झाले, हे निश्चितपणे सांगता येत नाही. तथापि होयसळ राजा विष्णुवर्धन किंवाबिट्टिदेव किंवा बिट्टिग (बारावे शतक) ह्याने पंढरपूरचे देऊळ बांधले असावे, असा ग. ह. खरे ह्यांचा तर्क आहे. स्वतःच्या नावापासून तयार झालेले ‘विठ्ठल’ हे नाव त्याने आपल्या उपास्य देवतेला दिले असावे, असेही ग. ह. खरे ह्यांना वाटते.
विठोबाची मूर्ती: पंढरपूरच्या विठ्ठलमंदिरात एकट्या विठोबाचीच मूर्ती आहे. तिच्या डोक्यावर साध्या मुकुटासारखी एक उंच आणि कडा असलेली टोपी आहे. भाविक ह्याच टोपीला वा साध्या मुकुटाला शिवलिंग समजतात. टोपीला जो कंगोरा आहे, त्यास पुजारी पाठीवर टाकलेल्या शिंक्याची दोरी, असे म्हणतात. हरिहरैक्याची उत्कट भावना त्यामागे दिसते. ह्या मूर्तीचा चेहरा उभट असून डोक्यावरील उंच टोपीमुळे तो अधिकच उभट वाटतो. मूर्तीच्या कानांत मत्स्याकाराची कुंडले आहेत. तथापि ती फार मोठी असून खांद्यांवर आडवी पसरलेली असल्यामुळे ते खांद्यांचे अलंकार आहेत, असा समज होतो. विठोबाच्या गळ्यात कौस्तुभमण्यांचा हार आहे. छातीच्या डाव्या भागावर एक खळगी आणि उजव्या भागावर एक वर्तुळखंड आहे. त्यांना अनुक्रमे श्रीवत्सलांछन व श्रीनिकेतन ही नावे देण्यात आली आहेत. मूर्तीच्या दंडावर आणि मनगटावर दुहेरी बाजूबंद व मणिबंध आहेत. दोन्ही हात कमरेवर आहेत. डाव्या हातात शंख असून उजव्या हातात कमलनाल (कमळाचा देठ) आहे. त्याचा टोकाशी असलेली कळी विठ्ठलाच्या मांजीवर लोळत आहे. हा हात उताणा आणि अंगठा खाली येईल, अशा प्रकारे कमरेवर ठेवला आहे. कमरेस तिहेरी मेखला आहे. दोन पायांना जोडणारा असा एक दगडी भाग पायांमध्ये आहे. त्यास ‘काठी’ असे म्हणतात. कमरेवर वस्त्र असल्याच्या खुणा दिसत नाहीत असे मूर्तीकडे पाहता वाटते. संतांनीही विठोबाला अनेकदा ‘दिगंबर’ म्हटले आहे. तथापि-काहींच्या म्हणण्यानुसार-विठोबाच्या कमरेस वस्त्र आहे, असे मानल्यास काठीस विठ्ठलाच्या वस्त्राचा सोगा म्हणता येईल व हा सोगा मूर्तीच्या पावलांपर्यंत आलेला आहे, असेही म्हणता येईल. ही पावले एका चौकोनावर असून त्यालाच ‘वीट’ म्हणतात. ह्या विटेखाली उलटे कमळ आहे. शिंक्याची दोरी व काठी अशा ज्या वस्तू दाखविल्या जातात, त्या खरोखरीच तशा आहेत, असे ग.ह. खऱ्यांसारख्या इतिहासज्ञाला वाटत नाही.
उपर्युक्त वर्णन हे पंढरपूरच्या विठ्ठलमंदिरात आज दिसत असलेल्या विठोबाच्या मूर्तीचे आणि ग.ह. खरे यांनी केलेले आहे. तथापि पंढरपूरचे मंदिर श्रीज्ञानदेवांच्याही पूर्वीचे असून तेथे जी मूळ वा आद्य मूर्ती होती, ती ही नसावी, असे मत व्यक्त केले जाते. १६५९ साली झालेल्या अफजलखानाच्या स्वारीसारखे जेव्हा येत, तेव्हा सुरक्षित ठेण्यासाठी म्हणून विठोबाची मूर्ती मंदिरातून चिंचोली, गुळसरे, देगाव ह्यांसारख्या पंढरपूरच्या गावांत हलविण्यात येई, असे दिसते. अफजलखानाच्या स्वारीच्या वेळी मूर्ती पंढरपूरजवळच असलेल्या माढे गावात नेऊन ठेविली होती आणि अफजलखानाचा वध झाल्यानंतर ती तेथून पुन्हा पंढरपूरात आणली, असे इतिहासाचार्य राजवाडे ह्यांनी म्हटले आहे. त्यानंतर ह्या संकटाचे स्मरण म्हणून माढे येथे विठोबाचे एक स्वतंत्र देऊळ आणि मूर्ती स्थापण्यात आली, असेही राजवाडे सांगतात. विजयनगरचा राजा कृष्णराय वा ⇨कृष्णदेवराय (कार. १५०९-१५२९) हयास ठिकठिकाणच्या देवमूर्ती आणून त्यांचा विजयनगरात स्थापना करण्याचा हव्यास होता. पंढरपूची विठ्ठलमूर्तीही त्याने विजयनगरास नेली होती आणि एकनाथांचे पणजे संत भानुदास ह्यांनी ती पुन्हा पंढरपूरास आणली अशी एक आख्यायिका आहे. ह्या आख्यायिकेला खुद्द एकनाथांनी भानुदासांच्या दिलेल्या माहितीत आधार सापडत नाही परंतु पैठण येथील एकनाथांच्या वाड्यातील विठोबाच्या मूर्तीचे ‘विजयविठ्ठल’ असे नाव आहे. ही मूर्ती विजयानगर साम्राज्याच्या काळातील दक्षिणी विठ्ठलमूर्तीसारखीच दिसते परंतु ती आकाराने लहान वाटते. भानुदासांच्या आख्यायिकेचा पक्का निर्णय करण्यासारखी साधने उपलब्ध नसली, तरी पंढरपूरच्या मंदिरातील विठोबाची मूर्ती वेळोवेळी हालविली जात होती व ह्या हालवाहालवीतच मूळ मूर्ती केव्हा तरी बदलली गेली असेल किंवा काय, असा प्रश्न निर्माण होतो.
ह्या प्रश्नाच्या उत्तराचा शोध घेण्यासाठी ह्या आद्य विठ्ठलमूर्तीची विश्वासार्ह वर्णने कोठे मिळत असल्यास पाहिली पाहिजेत आणि तशी ती मिळतात, असे ह्या विषयाचा अलीकडच्या काळात विशेष आणि सखोल अभ्यास केलेले संशोधक डॉ. रा. चिं. ढेरे ह्यांचे प्रतिपादन आहे. त्यांचे म्हणणे थोडक्यात असे : विठोबाचे पंढरपूरचे माहात्म्य सांगणारे तीन संस्कृत ग्रंथ (पांडुरंगमाहात्म्ये) आज उपलब्ध आहेत. त्यांतील स्कांद पांडुरंगमहात्म्य आणि पाद्म पांडुरंगमहात्म्य अनुक्रमे स्कंद व पद्म पुराणांतर्गत असल्याचा दावा करणारी आहेत. ह्या दोन पांडुरंगमाहात्म्यांचा निर्देश वर आलेलाच आहे. (तिसरे पांडुरंगमाहात्म्य हे विष्णुपुराणांतर्गत असल्याचा दावा करणारे असून त्याची एकुलती एक उपलब्ध प्रत डॉ. ढेरे ह्यांच्या संग्रही आहे). ह्या सर्व पांडुरंगमाहात्म्यांपैकी स्कांद पांडुरंगमाहात्म्य हे सर्वां त प्राचीन-म्हणजे निवृत्ती-ज्ञानदेवांच्याही पूर्वीचे आणि अगदी काटेकोरपणे सांगावयाचे झाल्यास रामदेवराय यादवाचा कारणाधिप ⇨हेमाद्री (तेरावे शतक, उत्तरार्ध) ह्याच्याही पूर्वीचे-आहे. ह्या स्कांद पांडुरंगमाहात्म्यास पंढरपूर आणि श्रीविठ्ठलाच्या अभ्यासात अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. पाद्म पांडुरंगमाहात्म्याची रचना सोळाव्या शतकात आणि विष्णुपुराणांतर्गत असल्याचा दावा करणाऱ्या उपर्युक्त पांडुरंगमाहात्म्याचीही रचना त्याच सुमारास झाली असावी.
उपर्युक्त स्कांद पांडुरंगमाहात्म्यात पंढरपूरच्या विठ्ठलमंदिरातील मूर्तीची जी अनन्यसाधारण लक्षणे सांगितली आहेत, त्यांतले एक म्हणजे त्या विठ्ठमूर्तीच्या हृदयावर मंत्राक्षरे आहेत. श्रीविठ्ठलाचाच मंत्र तेथे कोरलेला आहे. तेथे विठोबाला ‘महामंत्रयुतः’ हे विशेषण लावलेले आहे. त्याचप्रमाणे ‘देवाच्या हृदयावर मंत्राक्षरे पाहावयास मिळतात’ अशा आशयाचे स्पष्ट विधानही तेथे आहे. (मंत्राक्षराणि ….दृश्यन्ते तस्य वक्षसि). पाद्म पांडुरंगमाहात्म्यातही ‘श्रीवत्सं धारयन् वक्षे मुक्तामाला षडक्षराम्’। असा षडक्षर मंत्राचा निर्देश आहे. विठ्ठलसहस्त्रनामस्तोत्रात विठोबाला ‘षडक्षरमय’ म्हटले आहे. विठ्ठलाष्टोत्तरशतनामस्त्रोत्रात ‘मंत्राक्षरावलीहृत्स्थः ’ असे त्याचे वर्णन केलेले आहे. श्रीधरस्वामी नाझरेकर म्हणजेच प्रसिद्ध आख्यान कवी ⇨श्रीधर (१६५८-१७२९) ह्यांनी पंढरीमाहात्म्य ह्या नावाने प्रसिद्ध असलेल्या त्यांच्या एका मराठी पांडुरंगमहात्म्यात (एकूण अध्याय दहा) विठ्ठलाच्या हृदयावरील षडक्षर मंत्राचा कितीतरी वेळा निर्देश केलेला आढळतो. श्रीधर हे पंढरपूरजवळच्याच नाझरे गावचे. पंढरपूरच्या मंदिरातील मूर्ती त्यांच्या नेहमीच्या पाहण्यातील होती. ती मूर्ती प्रत्यक्ष पाहून त्यांनी ह्या षडक्षर मंत्राचा निर्देश केला असणे शक्य वाटते. संत ⇨सांवता माळी ह्यांनी विठ्ठलमूर्तीचे वर्णन करताना आपल्या एका अभंगात ‘विठ्ठलाचे रूप अतर्क्य विशाळ। हृदयकमळ मंत्रसिद्ध’।। असे शब्द वापरले आहेत. अशी मंत्रसिद्ध मूर्ती पंढरपूर येथील विठ्ठलमंदिरात नाही ती माहादाजी निंबाळकर ह्यांनी माढे येथे बांधलेल्या विठ्ठलमंदिरात आहे. अफजलखानाच्या स्वारीच्या वेळी पंढरपूरची विठ्ठलमूर्ती माढे येथे नेऊन ठेवली होती व ते संकट टळल्यावर ती पुन्हा पंढरपूरला आणण्यात आली. त्या संकटाच्या स्मृतिप्रीत्यर्थ माढे येथे जे विठ्ठलमंदिर बांधण्यात आले असे राजवाडे म्हणतात, तेच हे मंदिर. ह्या मंदिरात पंढरपूर येथील आद्य मूर्तीचीतंतोतंत प्रतिकृती माढेकरांनी स्थापन केली असली पाहिजे, असे डॉ. ढेरे ह्यांना वाटते. पंढरपूर येथील विठ्ठलमूर्तीच्या नित्य सहवसात असलेले काशीनाथ उपाध्याय उर्फ बाबा पाध्ये ह्यांनी रचिलेल्या विठ्ठलध्यानमानसपूजा ह्या स्तोत्रात त्यांनी विठ्ठलाच्या मूर्तीचे जे तपशीलवार वर्णन केलेले आहे, त्यात मूर्तीच्या हृदयावरील षडक्षर मंत्राचा स्पष्ट उल्लेख आहे. बाबा पाध्ये हे १८०५ मध्ये निधन पावले हे पाहता, पंढरपूरची आद्य विठ्ठालमूर्ती पंठरपूर येथे १८०५ पर्यंत तरी होती, असे ढेरे ह्यांना वाटते.
माढे येथील ही मूर्ती पूर्ण दिगंबर आहे. तिच्या मस्तकावर कंगोरा असलेली, गवळ्याच्या टोपीसारथी टोपी आहे. कानांत शंखाकार कुंडले आहेत. ती मूर्तीच्या खांद्यांवर टेकलेली आहेत. मूर्तीने धारण केलेल्या दोन माळांपैकी एक गळ्याशी आणि दुसरी हृदयावर लोंबणारी आहे. ह्या माळेत कौस्तुभमणी आहे. ह्या दोन्ही माळांनी साधलेल्या त्रिकोणात तो मंत्र आहे. मंत्राच्या अखेरीस ‘श्रीवत्स’ असा शब्द आहे. कमरेला श्रुद्रघंटिका असलेला पट्टा आहे. डाव्या हातात शंख असून उजव्या हाताचा तळवा काठीवर टेकलेला आहे. ह्या हाताच्या बोटात कमलकळी आहे. दोन्ही हात कमरेवर आहेत. दंडांत भुजबंध व मनगटांवर कडी आहेत. ह्या मूर्तीच्या भाळावर तिसरा नेत्र आहे, हे खास वैशिष्ट्य. मस्तकावर बांधलेल्या शिंक्याच्या दोऱ्या कपाळावरून मागे, दोन्ही बाजूंना गेल्या आहेत. डाव्या बाजूची दोरी मात्र खाली आलेली दिसत नाही. पंढरपूरप्रमाणेच माढे येथील मंदिरातही विठ्ठल हा एकटा आहे. त्याच्या समवेत रखुमाई नाही.
भाळावर तिसरा नेत्र आणि दिगंबरत्व अशी मूळ मूर्तीची अन्य दोन अनन्यसाधारण लक्षणे स्कांद पांडुरंगमाहात्म्यात सांगितलेली असून ती माढे येथील मूर्तीत स्पष्टपणे दिसून येतात. स्कांद पांडुरंग माहात्म्यातील वर्णन हे पुंडलिकासाठी पंढरपुरात आलेल्या श्रीकृष्णाच्या रूपाचे वर्णन करण्यासाठी आलेले आहे व ते माढे येथील मूर्ती दृष्टीसमोर ठेवून केल्यासारखे वाटावे, इतके साम्य त्या वर्णनात आणि माढे येथील विठ्ठलमूर्तीत आहे, असे, डॉ. ढेरे ह्यांचे प्रतिपादन आहे.
पांडुरंगमाहात्म्यांनी असे सांगितले आहे, की पंढरपुरात विठोबाची तीन रूपे आहेत:एक, प्रत्यक्ष मंदिरातले दुसरे, संपूर्ण पंढरपुराला व्यापून राहिलेले आणि तिसरे, चंद्रभागेच्या प्रवाहाच्या रूपाने अस्तित्वात असलेले. कवी श्रीधरांनी दहा अध्यायांचे पंढरीमाहात्म्य किंवा पांडुरंगमाहात्म्य जसे रचले आहे, तसेच बत्तीस अध्यायांचे दुसरे एक पांडुरंगमाहात्म्य (हा छोट्या पांडुरंगनाहात्म्याचाच विस्तार) लिहिले आहे. त्यात विठोबाच्या उपर्युक्त तीन रूपांखेरीज त्याच्या तीन मूर्तीचाही निर्देश आहे: एक, मुख्य स्थानावरील मूर्ती दुसरी, लक्ष्मीपुढची (म्हणजेच लखूबाईपुढची) आणि तिसरी, पुंडलिकासमोरची. लखुबाई आणि पुंडलिक ह्यांच्या समोर आज विठ्ठलमूर्ती दिसत नाही. मुख्य मूर्तीबद्दल श्रीधरांनी लिहिले आहे :‘मुख्य जे पांडुरंगस्थान । तेथे न करावे आरोहण।’ ‘आरोहण’ ह्या शब्दातून उंच ठिकाणावर चढून जाण्याची कल्पना सूचित होते. तेथे आरोहण केल्यास दारूण परिणाम होतील, असाही धाक श्रीधरकांच्या ओवीतून दाखविलेला आहे. त्यामुळे अगदी आरंभी ही मूर्ती नुसतीच एखाद्या उंचवट्यावर, मंदिर नसलेल्या अवस्थेत होती किंवा काय, असाही प्रश्न उपस्थित होतो.