महात्मा बसवेश्वर: सामाजिक समतेचे आद्य प्रवर्तक

महात्मा बसवेश्वर: सामाजिक समतेचे आद्य प्रवर्तक

महामानव, विश्वगुरू, परिवर्तनवादी सत्पुरुष, लिंगायत धर्म संस्थापक, सामाजिक समतेचे आद्य प्रवर्तक, थोर समाजसुधारक, वर्गविरहित समाज निर्माता जगदज्योती महात्मा बसवेश्वर यांचे १२ व्या शतकात आध्यात्मिक, वैचारिक व सामाजिक परिवर्तन घडवून आणण्यात मोठं योगदान आहे. बसवण्णा यांचा जन्म विजापूर जिल्ह्यातील बागेवाडी येथे सन ११३१ मध्ये वैशाख महिन्याच्या तिसऱ्या दिवशी म्हणजेच अक्षय्य तृतीयेच्या मंगलमय दिनी झाला, अन् जणू काही सामाजिक समतेचा सूर्यच उदयास आला. Mahatma Basaveshwar: Pioneer of Social Equality

म. बसवेश्वर हे वीरशैव लिंगायत धर्माचे संस्थापक व धर्मगुरू होते. थोर संत, महान कवी अन् सच्चे समाजसुधारक म्हणून त्यांची जनमानसात ख्याती होती. त्यांनी निर्गुण, निराकार, एकेश्वरवादी श्रद्धेचा पुरस्कार केला. बसवेश्वरांच्या आईचे नाव मादलांबिके तर वडिलांचे मादिराज. म. बसवेश्वरांच्या कालखंडात समाजामध्ये सर्वत्र कर्मकांड, दांभिकता, स्त्री-पुरुष असमानता, स्त्री दास्यत्व, वर्णभेद, जातीभेद या कुप्रथांचा बोलबाला होता. अशा मनुवादीप्रवृत्तीत जखडलेल्या कर्मकांडी समाजाला थेट आव्हान करत म. बसवेश्वरांनी वयाच्या ८ व्या वर्षी उपनयन संस्कारचे जानवे तोडून आपल्या मुंज विधीला नकार दिला. परिणामी म. बसवेश्वरांना आपल्या घराचा त्याग करावा लागला. मानवा-मानवात भेदाभेद करून जातीयता निर्माण करणं सामाजिक एकात्मतेला मारक आहे, असे त्यांचे ठाम मत होते. मनात भक्तिभाव बाळगा. कर्मकांड करू नका. कष्टकऱ्यांना कमी लेखू नका, हा मोलाचा उपदेश त्यांनी लोकांना दिला. म. बसवेश्वरांनी जातीपातीच्या भिंती गाडून चातुर्वर्ण्याला कडाडून विरोध करत, लिंगायत धर्माचा प्रचार करून सामाजिक समता प्रस्थापित केली.

उल्लेखनीय गोष्ट म्हणजे म. बसवेश्वरांनी लहानपणीच कर्मकांडी प्रवृत्तींविरुद्ध दंड थोपटले. कृष्णा व मलप्रभा या नद्यांच्या संगमावरील कुडलसंगम (जि.विजापूर) येथील अध्ययन केंद्रात ते दाखल झाले. तेथे त्यांनी १२ वर्षे वास्तव्य करून विभिन्न भाषा, धर्म, तत्त्वज्ञान आदी तत्सम गोष्टींचा सखोल अभ्यास केला. याशिवाय त्यांनी यज्ञविधीत पशूबळी देणं या अपप्रवृत्तीलाही कडाडून विरोध केला. भूतदया हा त्यांच्या व्यक्तिमत्वातील स्थायीभाव होता. दरम्यान मादूलांबा (मादंबा) नामक मामाच्या मुलीशी त्यांचा विवाह झाल्यावर त्यांनी सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथे सुमारे २१ वर्षे वास्तव्य केले, अन् तेथूनच म. बसवेश्वर यांनी वीरशैव लिंगायत धर्माचा आध्यात्मिक पाया रचला. शक्ती विशेषाद्वैत तत्त्वज्ञान मांडून म. बसवेश्वरांनी वर्गविरहित समाज निर्माण करण्यात आपलं सारं आयुष्य पणाला लावलं.

अंधश्रद्धा ही समाजाला लागलेली कीड आहे. त्यातून समाज अधोगतीच्या मार्गावर जातो, हा विचार म. बसवेश्वरांनी रयतेला दिला. या पार्श्वभूमीवरच त्यांनी तत्कालिन जुनाट रूढी- प्रथांविरुद्ध आपली भूमिका परखडपणे मांडली. त्याजागी ज्ञान-भक्ती-कर्म या त्रिसूत्रीचा अंगिकार करून कर्मकांड, अंधविश्वास,  जातीभेदाविरुद्ध जनमत उभे केले. सत्य, अहिंसा, दया, सदाचार, शील या सद्गुणांचा अंगिकार करा. भूतदया बाळगा. जातीपातीवर विश्वास न ठेवता इतरांबद्दल सदभावना ठेवा, आत्मस्तुती करू नका. दुसऱ्यांची निंदा नालस्ती करू नका. खोटे बोलू नका. चोरी करू नका. हत्या करू नका, परोपकारी व्हा म्हणजे हीच खरी अंतरंगशुद्धी व बाह्यशुद्धी आहे. ही तत्वे त्यांनी लिंगायत धर्मात  बिंबवली. तत्कालिन समाजातील प्रचलित उच्च – नीचता, स्त्री दास्यत्व, स्त्री-पुरुष असमानता या अनिष्ट चालीरितींविरुद्ध वाचा फोडून बसवेश्वर हे चातुर्वर्ण्य व्यवस्थेविरुद्ध सर्व शक्तीनिशी उभे राहिले. जातीच्या आधारावर भेदभाव करू नका. इतरांवर विसंबून न रहाता, आत्मनिर्भर होऊन स्वत:च्या भाकरीसाठी स्वतः कष्ट करायचं, हा संदेश त्यांनी रयतेला दिला. तात्पर्य, श्रमाशिवाय पर्याय नाही, असा संदेश त्यांनी लोकांना दिला. प्रत्येकाने आत्मनिर्भर होणे आवश्यक आहे, हा उपदेश त्यांना सर्व जातीतल्या लोकांना दिला.

कायकवे कैलास म्हणजे कर्म करण्यातच स्वर्ग आहे, हा विचार त्यांनी समाजाला दिला. कोणतेही काम कमी प्रतीचे वा उच्च प्रतीचे नसते. कुठलीही जात श्रेष्ठ वा कनिष्ठ नसते. सर्व मानव समान आहेत, हा उपदेश त्यांनी सर्वजातीय लोकांना दिला. बसवण्णा यांनी वैदिक धर्म त्यागून लिंगायत धर्म स्वीकारला.

वेदशास्त्र, होम-हवन, मूर्ती पूजा, उपास-तापास, पशूबळी, पुनर्जन्म यांना त्यांनी कडाडून विरोध केला. देव दगडात नव्हे, तर तुमच्या अंतर्मनात आहे. अठरा पगड जातीतील लोकांना सोबत घेवून त्यांनी लिंगायत धर्माची स्थापना केली. लिंगायत धर्माचे सदस्य हे आपल्या गळ्यात इष्टलिंग धारण करतात. हे लिंग शिवाचे म्हणजेच सत्याचे आहे, अशी त्यांची भावना आहे. पूजा करताना ते या लिंगाला आपल्या तळहातावर ठेवून प्रार्थना करतात. स्त्री-पुरुष, गरीब-श्रीमंत, स्पृश्य-अस्पृश्य या सर्वांना समान दर्जा व अधिकार हाच लिंगायत धर्माचा मूलाधार आहे. अशा सामाजिक सुधारणा केल्यानेच त्यांना गुरुदेव, संत, समाजसुधारक म्हटलं जातं.

भारतातील लिंगायत समाज म. बसवेश्वरांना देवाचा अवतार मानतात. स्त्री दास्यत्व नाहिसे करून सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने त्यांनी शिवानुभव मंटप/अनुभव मंटप संस्थेची स्थापना केली अन् त्यात सर्व जाती-धर्मातील लोकांना प्रतिनिधित्व दिले. या संस्थेत ब्राह्मण मधूवय्या, चांभार हरळय्या, ढोर कक्कय्या, नावाडी चौंड्या, सुतार बसप्पा, मांग चन्नया, न्हावी आप्पांना, सोनार किन्नरी ब्रह्मय्या, गुराखी रामण्णा, दोरखंड करणारा चंद्या, पारधी संगय्या आदींचा समावेश होता. महत्त्वाचे म्हणजे बसवेश्वर यांनी सवर्ण आणि कनिष्ठ जातीतील मुला-मुलींचे विवाह लावून दिले. त्यातून आंतरजातीय विवाहास चालना दिली. वास्तविक, सामाजिक समतेच्या पायावर नवसमाजाची निर्मिती करण्यासाठी सर्व जाती-धर्मातील लोकांना प्रतिनिधित्व देणं, हे खरं तर, आदर्श लोकशाहीचं द्योतक आहे, असे म्हणणे संयुक्तिक ठरेल. वास्तवात हेच त्यांच्या सर्वधर्मसमभावाचे प्रतिक होय.

कर्नाटकात सर्वाधिक लिंगायत समाज असून सोबतच आंध्र, तामिळनाडू, महाराष्ट्रात देखिल लिंगायत समाजबांधवांचे वास्तव्य आहे. १२ व्या शतकात म. बसवेश्वरांनी सुरू केलेलं सामाजिक समतेचं कार्य १९ व २० शतकात फुले-शाहू-आंबेडकर यांनी पुढे नेलं. त्याची परिणती म्हणजे तत्कालिन समाजातील जुनाट रूढी परंपरा, प्रथा, अंधश्रद्धा नष्ट होऊन त्याजागी स्त्री-पुरुष समानता, समान संधी समान अधिकार, धार्मिक सहिष्णुता, जातीय सलोखा प्रस्थापित झाला. अन् सर्व जाती-धर्माचे नागरिक गुण्या – गोविंदाने नांदू लागले आहेत. सामाजिक समतेचे पुरस्कर्ते म. बसवेश्वर यांच्या संकल्पनेतील स्त्री-पुरुष समानता प्रस्थापित होणं म्हणजे हेच खरे त्यांना अभिवादन ठरेल.

–       रणवीरसिंह राजपूत

<

Related posts

Leave a Comment