इसापूर धरणात 90.10 टक्के पाणीसाठा, नांदेड जिल्ह्यातील इतर प्रकल्प साठ्याच्या पाणी पातळीत वाढ, पैनगंगा नदीकाठच्या नागरिकांना सुरक्षित स्थळी राहण्याचे आवाहन

इसापूर धरणात 90.10 टक्के पाणीसाठा, नांदेड जिल्ह्यातील इतर प्रकल्प साठ्याच्या पाणी पातळीत वाढ, पैनगंगा नदीकाठच्या नागरिकांना सुरक्षित स्थळी राहण्याचे आवाहन

नांदेड (जिमाका) दि. 7 :- इसापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस पडत असल्याने धरणात पाण्याचा येवा होत आहे. त्यामुळे जलाशयाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. मंगळवार 7 सप्टेंबर रोजी इसापूर धरण 90.10 टक्के भरले आहे. संभाव्य पूर परिस्थिती लक्षात घेता जिवीत व वित्त हानी होऊ नये म्हणून पैनगंगा नदीकाठच्या दोन्ही तिरावरील गावातील नागरिकांनी आपली जनावरे, घरगुती व शेती उपयोगी वस्तूसह स्वत: सुरक्षित स्थळी रहावे, असे आवाहन नांदेडचे उर्ध्व पेनगंगा प्रकल्प विभाग क्र. 1 कार्यकारी अभियंता अ.बा.जगताप यांनी केले आहे.

इसापूर धरणाची पाणी पातळी 439.98 मी. एवढी असून इसापूर धरणाचा जलाशय प्रचलन आराखडा मंजूर आहे. पाण्याचा येवा पाहता इसापूर धरणाचा मंजूर जलाशय प्रचलन आराखडा (आरओएस) (90 टक्के विश्वासाहर्ता) नुसार 15 सप्टेंबर 2021 पर्यंत 440.85 मी. ठेवावी लागणार आहे. धरण सुरक्षिततेच्यादृष्टिने इसापूर धरणातून वक्रदारद्वारे कोणत्याही क्षणी धरणात येणारे अतिरिक्त पाणी पैनगंगा नदीपात्रात सोडवे लागेल. यामुळे नदीपात्रातील पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ होऊन पुर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येणार नाही, असे उर्ध्व पेनगंगा प्रकल्प विभाग क्र. 1 कार्यकारी अभियंता अ.बा.जगताप यांनी कळविले आहे.

नांदेड जिल्ह्यातील प्रकल्प साठ्याच्या पाणी पातळीत वाढ
आज 7 सप्टेंबर 2021 रोजी निम्न दुधना प्रकल्पातून 4 हजार 320 क्युसेस विसर्ग पूर्णा नदीपात्रात सुरु आहे. माजलगाव या मोठया प्रकल्पातून 97 हजार क्युसेस विसर्ग सुरु आहे. पुर्णा प्रकल्पाच्या येलदरी व सिध्देश्वर पाणलोट क्षेत्रात पूर्णा नदीत 6 हजार 242 क्युसेस विसर्ग सुरु आहे. सिध्देश्वर धरणाखाली मोठया प्रमाणावर पाऊस झाल्याने पुर्णा पुलाजवळ 76 हजार क्युसेस विसर्ग सुरु आहे. या सर्व नद्याचे पाणी गोदावरी नदीला मिळते. पाणलोट क्षेत्रात मोठया प्रमाणात पाऊस झाल्याने विसर्गात वाढ होत आहे. सद्यस्थितीत नांदेड शहराच्या खालील बाजूस तेलंगणा राज्यातील पोचमपाड धरण सुध्दा 100 टक्के भरले असून तेथून 3 लाख 6 हजार क्युसेस विसर्ग सुरु आहे. पोचमपाड प्रकल्प धरल्याने गोदावरी नदीत फुगवटा निर्माण होतो.

विष्णुपुरी प्रकल्पाच्या 12 दरवाज्यातून 1 लाख 72 हजार क्युसेकने विसर्ग सुरु आहे. नदीमधून येणारा येवा जास्त असला तरी विष्णुपुरी प्रकल्पाद्वारे तो नियंत्रित करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न राहील व विसर्ग नियंत्रित केला जाईल. तथापि संततधार पावसामूळे येव्यात मोठया प्रमाणात वाढ होत आहे. सध्या जुन्या पुलावर पाणीपातळी 351.10 मिटर आहे. इशारा पातळी 351 मिटर, तर धोका पातळी 354 मिटर इतकी आहे. इशारा पातळीचा विसर्ग 2 लाख 13 हजार क्युसेस व धोका पातळीचा विसर्ग 3 लाख 9 हजार 774 क्युसेस आहे.

हे ही वाचा ————————————-

<

Related posts

Leave a Comment