ED On Sanjay Raut |ईडीने या कारणामुळे खासदार संजय राऊत यांची संपत्ती केली जप्त

ED On Sanjay Raut |ईडीने या कारणामुळे खासदार संजय राऊत यांची संपत्ती केली जप्त

मुंबईः थेट शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेऊन भाजप आणि ईडीविरोधात रणशिंग फुंकणारे शिवसेना (ShivSena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या संपत्तीवर अखेर सक्तवसुली संचलनालयाने (ED) टाच आणलीय. संजय राऊत यांची अलिबागमधील संपत्ती जप्त करण्यात आली आहे. त्यात अलिबागमधील जमिनीचे आठ तुकडे, दादरमधील एक फ्लॅट जप्त करण्यात आलाय. पत्राचाळ जमीन घोटाळाप्रकरणी ही कारवाई केल्याचे समजते. या घोटाळ्यातील पैसे हे अलिबाग येथील जमीन खरेदीसाठी वापरले म्हणून ही कारवाई करण्यात आल्याचे समजते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्यानंतर शिवसेनेच्या बड्या नेत्यावर ईडीने केलेली ही पहिलीच कारवाई म्हणावी लागेल. या कारवाईवरून आता पुन्हा एकदा ईडी विरुद्ध शिवसेना आणि शिवसेना विरुद्ध भाजप असा सामना रंगलेला दिसणार आहे. त्याची चुणूक आता एकेक येणाऱ्या प्रतिक्रिया पाहता दिसून येत आहे. (Ed action against sanjay raut heel on the property of shiv sena mp sanjay raut excitement over ed s action)

पत्राचाळ घोटाळा काय?
2006 मध्ये जॉईंट व्हेंचरअंतर्गत गुरू आशिष बिल्डरने पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्प हाती घेतला. हा प्रकल्प 2008 मध्ये सुरू झाला. मात्र, दहा वर्षानंतरही पत्राचाळीचा पुनर्विकास झाला नसल्याचे लक्षात आले. मूळ 678 रहिवाशांना वाऱ्यावर सोडून म्हाडाच्या घरांना देखील बिल्डरने चुना लावल्याची माहिती होती. या बिल्डरने म्हाडाला 1 हजार 34 कोटींना फसवले होते. बिल्डरने विक्रीचे क्षेत्र सात त्रयस्थ विकाससकांना विकल्याचा आरोप आहे. या गुरू आशिष कंस्ट्रक्शन कंपनीचा संचालक राकेश वाधवान आहे. वाधवान यांच्यासोबत संजय राऊतांचे निकटवर्तीय प्रवीण राऊतांचा संबंध आहे. प्रवीण राऊत यांनी राकेश वाधवानसोबत मिळून पत्राचाळीच्या पुनर्विकास प्रकल्पात घोटाळा केल्याचा संशय आहे. या प्रकरणी प्रवीण राऊत यांना अटक आणि सुटका झाली. त्यानंतर पुन्हा 2 फेब्रुवारी 2022 रोजी प्रवीण राऊत यांना पुन्हा अटक झाली.

राऊत ते राऊत कनेक्शन
प्रवीण राऊतांच्या खात्यातून संजय राऊतांच्या पत्नीच्या खात्यात 55 लाख रुपये गेले होते. पण, हे पैसे 10 वर्षानंतर परत केले. हे पैसे कर्ज म्हणून घेतल्याचा दावा संजय राऊतांच्या पत्नीने केला होता. पण, संजय राऊतांचा देखील या घोटाळ्यात सहभाग असल्याचा संशय ईडीला होता. त्यामुळे ईडीने संजय राऊतांच्या कुटुंबीयांवर छापेमारी केली होती. याच घोटाळ्याप्रकरणी ईडीने आज संजय राऊतांची मालमत्ता जप्त केली आहे. पत्राचाळ घोटाळ्यातील पैसा संजय राऊत यांनी वापरल्याचा ईडीला संशय आहे.

ईडीकडून कोट्यवधींची ट्रान्सफर
संजय राऊत यांनी ईडी अधिकाऱ्यांवर कोट्यवधी रुपयांची ट्रान्सफर केल्याचा आरोप केला होता. 2017 मध्ये ईडीने दिवाण हाऊसिंग फायनान्सची चौकशी सुरू केली. जितेंद्र नवलानीच्या कंपनीला 25 कोटी ट्रान्सफर झाले. मग 31 मार्च 2020 पर्यंत वाधवानच्या कंपनीकडून नवलानीच्या कंपनीला पैसे गेले. अविनाश भोसलेंची चौकशी झाली. मग भोसलेंकडून नवलानीला 10 कोटी ट्रान्सफर केले. नवलानीच्या सात कंपन्यांमध्ये कोट्यवधी रुपये ट्रान्सफर केले गेले. 15 कोटी रुपयांबाबत अशाच एका चौकशी सुरू असलेल्या कंपनीकडून नवलानीला पैसे गेले. सेक्यूरिटी ट्रान्सफर लोनच्या रुपात हे पैसे दिले गेले. फक्त नवलानीच नाही तर असा ईडीचा पैसा ईडीच्या वेगवेगळ्या लोकांच्या कंपनीच्या खात्यात कॅश, चेक अशा वेगवेगळ्या स्वरुपात ट्रान्सफर झालाय. ईडीच्या कोणत्या अधिकाऱ्याच्या अकाऊंटमध्ये कुठे कसे पैसे गेलेत हे हळूहळू सांगेन, असा इशाराही राऊतांनी दिला होता.

<

Related posts

Leave a Comment