बीड: केज तालुक्यातील टाकळी येथील हॉटेल व्यावसायिक विलास घुले हत्या प्रकरणाने आता अत्यंत गंभीर आणि नाट्यमय वळण घेतले आहे. या हायप्रोफाइल खून प्रकरणात राजकीय भूकंप झाला असून, विशेष तपास पथकाने (SIT) बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांचे सुपुत्र सौरभ सोनवणे यांची तब्बल ४ तास कसून चौकशी केली आहे. दुसरीकडे, या संपूर्ण वादाच्या केंद्रस्थानी असलेल्या एका महिलेने समोर येत मृतांवर गंभीर आरोप केल्याने तपासाची दिशा पूर्णपणे बदलली आहे. eed Murder Mystery: MP’s Son Grilled For 4 Hours, Masked Woman’s Shocking Claim Flips Vilas Ghule Case!
काय आहे मुख्य घटना?
केज तालुक्यातील कदमवाडी फाटा येथे काही दिवसांपूर्वी दोन गटांतील वाद मिटवण्यासाठी गेलेले हॉटेल व्यावसायिक विलास घुले (वय ३०) यांची चाकू आणि बरच्याने भोसकून निर्घृण हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर बीड जिल्ह्यात तीव्र संतापाची लाट उसळली. नातेवाईकांनी मृतदेह पोलीस ठाण्यासमोर ठेवून ११ तास ठिय्या आंदोलन केले होते. या वाढत्या जनक्षोभानंतर गृहविभागाने प्रकरणाचे गांभीर्य ओळखून याच्या तपासासाठी विशेष तपास पथक (SIT) स्थापन केले.
खासदार पुत्राची एसआयटीकडून ४ तास चौकशी
मृताचे भाऊ रमेश घुले यांनी पोलिसांत दिलेल्या पूरक जबाबात खासदार पुत्र सौरभ सोनवणे यांच्या नावाचा उल्लेख केला. त्यानंतर तात्काळ हालचाली करत एसआयटीने शुक्रवारी रात्री खासदारांच्या केजमधील निवासस्थानी धाड टाकून सीसीटीव्ही फुटेज आणि काही दस्तऐवज जप्त केले. तर शनिवारी सहाय्यक पोलीस अधीक्षक व्यंकटराम यांच्या दालनात सौरभ सोनवणे यांची ४ तास चौकशी करण्यात आली. पोलिसांकडून सध्या त्यांच्या कॉल डिटेल्स (CDR) ची कसून तपासणी सुरू आहे.
महिलेच्या गंभीर आरोपांमुळे तपासात नवा ‘ट्विस्ट’
या संपूर्ण प्रकरणाला रविवारी त्यावेळेस वेगळे वळण मिळाले, जेव्हा या वादाच्या केंद्रस्थानी असलेल्या एका महिलेने समोर येत धक्कादायक खुलासे केले. “उमेश माने नावाच्या तरुणाने आणि विलास घुले यांनी माझे अश्लील व्हिडिओ बनवून मला सतत ब्लॅकमेल केले आणि माझ्यावर अत्याचार केला. या छळाला कंटाळून आणि स्वतःच्या कुटुंबाचा जीव वाचवण्यासाठीच हा प्रकार घडला,” असा गंभीर आरोप या महिलेने केला आहे. यामुळे पोलीस आता या प्रकरणाची मूळ बाजू (ब्लेकमेलिंग आणि छळवणूक) तपासून पाहत आहेत.
तपासाची सद्यस्थिती: १० आरोपी गजाआड, ‘मकोका’ची मागणी
पोलिसांनी या प्रकरणात लातूर येथून मुख्य संशयित राजकुमार मोरे याच्यासह आतापर्यंत १० आरोपींना अटक केली आहे. न्यायालयाने आरोपींची ४ दिवसांच्या पोलीस कोठडीत रवानगी केली आहे. मुख्य पीडित उमेश माने याच्या तक्रारीवरून आरोपींवर अॅट्रॉसिटी (SC/ST Act) अंतर्गतही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
दरम्यान, आज केजमध्ये विलास घुले यांच्या कुटुंबीयांनी आरोपींवर ‘मकोका’ (MCOCA) अंतर्गत कारवाई करावी आणि सोशल मीडियावरील बदनामी थांबवावी, या मागणीसाठी पाण्याच्या टाकीवर चढून ‘शोले’ स्टाईल आंदोलन केले. या प्रकरणाला आता राजकीय, गुन्हेगारी आणि कौटुंबिक छळाचे अनेक पदर लाभल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष या एसआयटी तपासाकडे लागले आहे.
– ब्यूरो रिपोर्ट, महाराष्ट्र व्हॉईस.
