देवमाणूस देवाघरी… ‘कर्मयोगी’ सेवाध्यायाची इतिश्री! श्री क्षेत्र शेगाव विश्वस्त शिवशंकरभाऊ पाटील

देवमाणूस देवाघरी… ‘कर्मयोगी’ सेवाध्यायाची इतिश्री! श्री क्षेत्र शेगाव विश्वस्त शिवशंकरभाऊ पाटील

श्री क्षेत्र शेगाव:
माणसातला ‘देव’ कुठे असतो?.. याचा पत्ता होता- शिवशंकरभाऊ पाटील. ‘कर्मयोग’ काय असतो, याचे ठिकाण होते- शिवशंकरभाऊ पाटील. ‘सेवाभाव’ काय असतो, याचे प्रतिक होते- शिवशंकरभाऊ अन्
व्यवस्थापन काय असते? याचे प्रत्यंतर होते- शिवशंकरभाऊ पाटील!
नावात ‘शिव’ अन् ‘शंकर’ म्हणजे ‘त्रिनेत्र’च नाहीतर, यत्र-तत्र-सर्वत्र असे सर्वव्यापी ‘नेत्र’ म्हणजे पारखी नजर अन् सेवात्मक ‘दृष्टी’ ज्यांच्याकडे होती, की ज्यामुळे श्रीसंत गजानन महाराज संस्थान शेगावमध्ये भक्तीमय ‘सृष्टी’ फुलली..
असे हजारो सेवाधारी निर्माण करणारे, शिवशंकरभाऊ पाटील!!
भगवान श्रीकृष्णाने धनुर्धर अर्जुनाला कुरुक्षेत्रावर ‘कर्मयोग’ सांगितला, पण ‘सेवा परमो: धर्म’ ही धारणा ठेवून जे ‘कर्मयोगी’ ठरले..
ते शिवशंकरभाऊ पाटील!! श्रीगजानन विजय ग्रंथाचे २१ अध्याय आहेत, त्यातल्या एक सेवाध्याय ठरावा.. अशा सेवायुगाची सांगता, अर्थातच ‘कर्मयोगी’ सेवाध्यायाची इतिश्री झाली….संस्थानचे व्यवस्थापकीय विश्वस्त शिवशंकरभाऊ पाटील यांच्या जाण्याने. मंदीरं महाराष्ट्रात, देशात अन् जगात असंख्य आहेत.. पण ती मंदीरं तिथल्या ‘देवामुळं’ ओळखली जातात, पण एकमेव शेगावचे असे मंदीर, की जे श्रीसंत गजानन महाराजांमुळे तर ओळखले जातेच.. पण निष्काम-निस्वार्थ सेवाकार्यासाठी ते मंदीर ओळखल्या जाते, ते शिवशंकरभाऊ पाटील यांच्यासारख्या देवमाणसांमुळे. म्हणूनच कुठल्याही देवापुढे माथा न टेकविणाऱ्या शरद पवारांचा माथा शिवशंकरभाऊंच्या चरणांवर आदरानं नतमस्तक होतो. माणसातल्या देवमाणसाची ‘दिव्यत्वाची प्रचिती’ तिथेच करकमल जुळल्यावर येते!

कोण होते शिवशंकरभाऊ?
एक साधा अन् तेवढाच सरळ माणूस. धोतर-कुर्ता अन् टोपी परिधान करणारे सामान्य व्यक्ती. जे काही करतो आहे, ते ‘श्री’ कृपेने.. त्यामुळे उभ्या आयुष्यात ‘पद्मश्री’ व ‘पद्मविभुषण’सारखे अनेक पुरस्कार या माणसाने हात जोडून विनम्रपणे नाकारले.. व आकार देत राहीला फक्त हा माणूस, संस्थानच्या सेवाभावी प्रकल्पांना.. मज पामराशी काय थोरपण, पायीची वहाण पायी बरी.. या तुकोबारायांच्या जाणीवेतून! शिवशंकर सुखदेव पाटील, शेगावी १२ एप्रिल १९४० मध्ये खटला असणाऱ्या पाटलाच्या कुटुंबात जन्मले. शिक्षण अर्थातच जेमतेम. फार मोठा परिवार, पुढे लग्न करुन संसाराला लागले. २ मुले व ४ मुली यासह सुना, नातवंडे व जावई असं विस्तारलेलं कुटुंब. शेती-बाडी, गुरं-ढोरं.. असा बाडबिस्तारा सांभाळता सांभाळता हा माणूस श्री गजानन महाराज संस्थान शेगावच्या सेवाकार्याकडे वळला. ३१ ऑगस्ट १९६२ रोजी त्यांच्या संस्थानच्या विश्वस्त पदी नेमणूक झाली. १९६९ ते १९९० पर्यंत ते संस्थानचे अध्यक्ष होते, १९८१ ते १९९० पर्यंत व्यवस्थापकीय विश्वस्त व अध्यक्ष अशा दोन्ही पदांवर ते कार्यरत होते. तर सध्या ते व्यवस्थापकीय विश्वस्त म्हणून काम पाहत होते. शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व शेगावचे नगराध्यक्षही राहून गेले.
सेवात्याग व समर्पणाचे धनी असलेले शिवशंकरभाऊ पाटील यांच्या संकल्पनेतून श्री संत गजानन महाराज संस्थानचे सेवाकार्य अविरत सुरु राहीले. एवूâण ४२ प्रकल्प त्यांच्या प्रेरणेने उभे राहीले. भक्तांच्या सेवेसह आदिवासींच्या सेवेपासून तर अन्नदान तसेच कपडेदान, वैद्यकीय सेवा, मोफत औषधोपचार, शिक्षण, पर्यावरण व अध्यात्मीक सेवेच्या माध्यमातून नवा आदर्श घडवत असतांना शिवशंकरभाऊंच्या कल्पकतेतून जे ‘आनंद सागर’ साकारले होते, तो पर्यटनाचा विलोभनीय भक्तीमय प्रयोगच!

श्री संत गजानन महाराज संस्थान शेगावच्या माध्यमातून मंदीर व्यवस्थापनाचा उत्तम नमुना म्हणून गणना होते. वयाच्या १८व्या वर्षीच त्यांनी संस्थानच्या सेवायज्ञात स्वत:ला झोकून दिले होते, तेंव्हापासून त्यांनी हे व्रत अखंडपणे चालविले. श्रध्दा, विश्वास अन् भक्ती या त्रिसुत्रीच्या माध्यमातून भाऊसाहेबांनी कार्य करतांना भक्तांच्या निवासाची अल्पदरात केलेली व्यवस्था ही आगळी-वेगळी ठरली. टाळकरी, माळकरी व वारकरी हे संस्थानचे स्तंभ असून येथील जवळपास ३६००च्यावर सेवाधारी हे बिनपगारी अन् फुल अधिकारी, याचे उत्तम उदाहरण आहे. संस्थानने स्वतंत्र असा सेवाधारी विभाग स्थापन केला असून, त्यांच्या कुटुंबीयांच्या सुख-दु:खात संस्थान हे सदैव मायेचा हात देत असते. यामुळेच अनेक सेवाधारी वेटींगवर कायम असतात. इथल्या सेवाधाऱ्यांचा सेवाभाव हा संशोधनात्मक अभ्यासाचा स्वतंत्र विषय असून, त्यावर अनेक माध्यमांनी विविध माध्यमातून टाकल्याचा प्रकाश, हा उल्लेखनीय ठरतो. म्हणूनच इथल्या सेवाधाऱ्यांचा सेवायज्ञ हा सर्वत्र चर्चेचा व कुतूहलाचा विषय._

सेवाधाऱ्यांच्या मुखात कायम एकच शब्द असतो, माऊली..! श्री संत गजानन महाराज शेगावच्या भक्तीमय शाखा या पंढरपूर, त्र्यंबकेश्वर, आळंदी व ओमकारेश्वर येथेही आहेत. २ हजार मानसेवी, ३ हजार स्वयंसेवक व तेवढ्याच सेवाधारी युवकांची प्रतिक्षा यादी असते. कोरोना काळापुर्वी दररोज ५० हजार भाविकांना प्रसाद वाटपाची व्यवस्था भक्तनिवासातील ३ हजार खोल्या, वैद्यकीय लोकोत्तर सेवाकार्य, अभियांत्रिकी महाविद्यालय, हजारो वारकरी दिड्यांना भजनी साहित्याचे वाटप.. हे सर्वत्र सुरु असते. कोरोना काळात ज्यावेळी मंदीरं सुरु झाले होते, त्यावेळी दर्शनाची व्यवस्था कोरोना नियमांचे पालन करुन कशी असावी? हा आदर्श इतर मंदीरांना जो घालून देण्यात आला, त्यामागे प्रेरणा शिवशंकरभाऊंचीच. ‘पैसा साचू देवू नका, पैशाला स्पर्श करु नका अन् पैसा कुणाकडे मागू नका..’ हे संत गजानन महाराजांनी संस्थान स्थापन करतांना सांगितलेलं तत्व, शिवशंकरभाऊ पाटील यांनी उभ्या हयातीत जपलं. त्यामुळेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे ‘सामना’तून त्यांच्यावर स्तृतीसुमनांचा वर्षाव करुन गेले तर शरद पवारांनी शिवशंकर भाऊंपुढे नतमस्तक होण्याची इच्छा जाहीरपणे प्रकट केली होती. परंतु भाऊंचे मस्तक सदैव ‘श्री’चरणी झुकलेले राहीले अन् त्यांनी ‘श्री’च्या सेवेतच घेतला अंतिम श्वास..
देवमाणूस देवाघरी गेला,
अन् झाली ‘कर्मयोगी’ सेवाध्यायाची इतिश्री!

<

Related posts

Leave a Comment