महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांच्याशी कोरोना साथीवर केली चर्चा

महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांच्याशी कोरोना साथीवर केली चर्चा

Maharashtra Health Minister Rajesh Tope discusses Union Health Minister Mansukh Mandvia’s corona pidemic

नवी दिल्ली, दि. 16 : कोविड प्रतिबंधात्मक कोविशिल्ड लशीच्या दोन मात्रांतील अंतर कमी करावे, अशी मागणी सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांच्याकडे केली. सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांची निर्माण भवन येथे भेट घेतली. या भेटी दरम्यान श्री. राजेश टोपे यांनी श्री. मांडविया यांना राज्यातील कोविडची परिस्थिती, त्यावर मात करण्यासाठी राज्य शासनाने केलेल्या उपाययोजना, लसीकरणाच्या बाबतीत मुंबई महानगरपालिकेने केलेले उल्लेखनीय काम आदी मुद्यांबाबत सविस्तर माहिती दिली.

श्री. टोपे यांनी कोविड लसीकरण जलद गतीने करण्याच्या दृष्टीने कोविशिल्डच्या दोन डोसमधील अंतर ८४ दिवसावरुन २८ दिवसापर्यंत करता येईल का याचा फेरविचार करावा जेणेकरून लसीकरण गतीने होईल. त्याचबरोबर काही देशांत दोन मात्रेतील अंतर कमी करण्यात आले आहे. त्याप्रमाणे आपल्या देशातही विचार व्हावा. परदेशी नोकरी अथवा शिक्षणासाठी जाणारे नागरिकांसाठी दोन मात्रांमधील अंतर कमी करण्यात आले आहे, त्याचप्रमाणे याचाही विचार व्हावा, अशी विनंती श्री. टोपे यांनी श्री. मांडविया यांना केली.

तिसरी लाट येण्याची शक्यता गृहीत धरून आरोग्य कर्मचाऱ्यांना कोविड लसीचा बुस्टर डोस देण्याबाबत विचार करावा. शाळा सुरू करणे सुरक्षित होण्यासाठी १८ वर्षाखालील मुलांचे लसीकरण लवकरात लवकर सुरु करण्यात यावे, अशी आग्रही मागणी श्री. टोपे यांनी केली. संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कोविड संबंधित अधिकचे मनुष्यबळ लागण्याची शक्यता आहे. हे मनुष्यबळ उपलब्ध करुन घेण्यासाठी प्रकल्प अंमलबजावणी आराखड्यात निधी उपलब्ध करून देण्याचीही मागणी केली कारण दुसरी लाट ओसरल्यानंतर राष्ट्रीय आरोग्य अभियानमधून निधी उपलब्ध होण्यासाठी काही समस्या आहेत. तरी हा निधी उपलब्ध करून देण्यात यावा, जेणेकरून कर्मचारी यांची सेवा घेता येतील, असे श्री. टोपे यांनी सांगितले.

राज्य शासनाने राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत सादर केलेल्या आराखड्यात राज्यातील आठ ठिकाणी कॅथलॅब सुरू करण्यासाठी प्रस्ताव सादर केले होते. या प्रस्तावास मान्यता प्राप्त झाली नाही. तथापि या संदर्भातील सुधारीत प्रस्तावास पुरवणी आराखड्यात मान्यता देण्यात यावी, अशी मागणी टोपे यांनी श्री. मांडविया यांच्याकडे केली.

मुंबई महानगरपालिकेचे केंद्रीय मंत्र्यांकडून कौतुक मुंबई महानगरपालिकेने लसीकरणाच्या बाबतीत केलेल्या कामगिरीबाबत केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी कौतुक केले. मुंबई महानगरपालिकेने लसीकरणाच्या पहिल्या मात्रेचे शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण केले आहे. या कामगिरीबद्दल श्री. मांडविया यांनी श्री. टोपे यांचे अभिनंदन केले आणि आभार मानले. मुंबई सारख्या महानगरात लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण केले ही मोठी कामगिरी आहे. राज्यातील इतर शहरातही अशाच पध्दतीने लसीकरण केले जावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली, असे टोपे यांनी सांगितले.

======================================================

<

Related posts

Leave a Comment