राज्यातील जिल्हा परिषदांमधील रिक्त पदांची कर्मचारी भरती ZP Bharti 2023 करण्यासाठी घेण्यात येणाऱ्या संभाव्य लेखी परीक्षेचे स्वरूप जाहीर करण्यात आले आहे. यानुसार या भरतीसाठी स्पर्धा परिक्षेच्या धर्तीवर प्रश्नपत्रिका काढण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी संवर्गनिहाय वेगवेगळ्या प्रश्नपत्रिका काढण्यात येणार असून, या परीक्षेसाठी दहावी, बारावी, पदवी आणि संबंधित पदाच्या व्यावसायिक अभ्यासक्रमावर आधारित प्रश्न विचारले जाणार आहेत. या परीक्षेसाठी मराठी इंग्रजी, सामान्य ज्ञान, गणित व बुद्धिमापन आणि तांत्रिक विषयाशी संबंधित प्रश्न असणार आहेत. यामध्ये प्रत्येकी दोन गुणांचे १०० प्रश्न असतील. या परीक्षेसाठी दोन तासांचा कालावधी दिला जाणार असल्याचे ग्रामविकास विभागाच्यावतीने जाहीर करण्यात आले आहे. Zilla Parishad Recruitment 2023
या कर्मचाऱ्यांच्या भरतीसाठी घेण्यात येणाऱ्या संभाव्य परीक्षेसाठीचा अभ्यासक्रम तयार करण्यासाठी ग्रामविकास खात्याने विविध सहा राज्यस्तरीय समित्यांची स्थापना केली होती. या समित्यांमध्ये ग्रामविकास खात्यातील उच्चशिक्षित आणि अनुभवी अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला होता. या अधिकाऱ्यांची दोन दिवशीय कार्यशाळा २८ आणि २९ एप्रिल २०२३ रोजी पुणे येथे आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत संभाव्य परीक्षेचे स्वरूप, अभ्यासक्रम, प्रश्नांची काठिण्य पातळी, प्रश्नांची संख्या, एकूण गुण, परीक्षेसाठीचा कालावधी आजी मुद्यांवर मंथन करण्यात आले होते.
सर्व जिल्हा परिषदांमधील मिळून कर्मचाऱ्यांच्या १८ हजार ९३९ जागा रिक्त आहेत. या कर्मचाऱ्यांची सन २०१६ पासून आतापर्यंत एकदाही भरती झालेली नाही. पूर्वी ही प्रक्रिया दरवर्षी जुलै महिन्यात सुरु केली जात असे. दरम्यान, क वर्गीय रिक्त पदांची भरती करण्यासाठी राज्य सरकारने महाभरती अंतर्गत मार्च २०१९ आणि आॅगस्ट २०२१ अशी दोन वेळा भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली होती. परंतु या दोन्ही भरती प्रक्रिया राज्याच्या ग्रामविकास विभागाने आक्टोबर २०२२ मध्ये रद्द केल्या होत्या.
विषयानुसार प्रश्नांची संख्या व गुण
- मराठी — १५ (३० गुण)
- इंग्रजी — १५ प्रश्न (३० गुण)
- सामान्य ज्ञान — १५ प्रश्न (३० गुण)
- गणित व बुद्धिमापन — १५ प्रश्न (३० गुण)
- तांत्रिक प्रश्न — ४० (८० गुण)
- एकूण प्रश्न — १०० (२०० गुण)
- परीक्षेचा कालावधी — १२० मिनिटे (दोन तास)
परीक्षेसाठी विविध चार प्रकार निश्चित
या कर्मचारी भरतीसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठी विविध चार प्रकार निश्चित करण्यात आले आहेत. या प्रकारांना अनुक्रमे अ, ब१, ब२ आणि क अशी नावे देण्यात आली आहेत. यापैकी पहिल्या प्रकारात विविध ११ पदे, दुसऱ्या प्रकारात १० पदे, तिसऱ्या प्रकारात एक आणि चौथ्या प्रकारात १७ अशी एकूण विविध ३९ पदे भरली जाणार आहेत.