राज्यातील जनतेने आज सत्ताधारी महायुतीच्या पदरात भरभरून मतांचे दान टाकले. महाविकास आघाडीची अक्षरशः धूळधाण झाली असून विधानसभेच्या २८८ पैकी २३१ पेक्षा अधिक जागा जिंकत युतीने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपने १३० पेक्षा अधिक जागा जिंकत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. Maharashtra Assembly Elections 2024 BJP Mahayuti Victory
फडणवीस हे राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्याची शक्यता आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीला ऐतिहासिक आणि नामुष्कीजनक पराभवाला सामोरे जावे लागले आहे. आघाडीचा अवघ्या ५० जागांत खुर्दा झाला. छोटे पक्ष, अपक्षांना १२ जागा मिळाल्या आहेत. मनसे, वंचित बहुजन आघाडी, तिसरी आघाडी भुईसपाट झाली आहे. संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या बारामती मतदारसंघात अजित पवार हेच ‘ दादा’ असल्याचे स्पष्ट झाले आहे.
महायुतीने महाविकास आघाडीचा इतका दारुण पराभव केला आहे की विरोधी पक्ष नेतेपद देखील आघाडीला राखता आलेले नाही. या निवडणुकीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, मुख्यमंत्रिपदाचे दावेदार बाळासाहेब थोरात हे पराभूत झाले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा काठावर विजय झाला. राज्याच्या चौदाव्या विधानसभेचा निकाल ऐतिहासिक ठरला आहे.
निवडणूक चाचण्यांनी काँटे की टक्कर होईल असे जाहीर केले होते. मात्र मतदारांनी ते साफ फोल ठरवत महायुतीला निर्विवाद एकहाती सत्ता दिली आहे. या निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जाहीर करण्यात आलेली व गेम चेंजर ठरलेली ”लाडकी बहीण” योजना, ” कटेंगे तो बटेंगे” , ” एक है तो सेफ है ”, ” मोदी है तो मुमकिन है ” चा दिलेला नारा आणि निवडणुकीचे भाजपने केलेले ” मायक्रो प्लॅनिंग” मोठ्या विजयाचे कारण ठरले आहे. वाढलेल्या मतांचा फायदा भाजप आणि महायुतीला होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला होता. तो विश्वास सार्थ ठरल्याचे या निकालाने स्पष्ट झाले आहे.
पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकण, उत्तर महाराष्ट्र, मुंबई या सर्वच ठिकाणी भाजप आणि महायुतीने एकहाती वर्चस्व मिळविले आहे. मराठा आरक्षण आंदोलन, ओबीसी आरक्षण आणि जातीय उपवर्गीकरण हे मुद्दे निवडणुकीत निष्प्रभ ठरल्याचे दिसून आले.
या निवडणुकीत भाजपने ऐतिहासिक कामगिरी नोंदविली आहे. भाजपने १४९ जागांवर आपले उमेदवार उभे केले होते. यातील तब्बल १३३ उमेदवार विजयी झाले आहेत. यापूर्वी २०१४ मधील निवडणुकीत भाजपने १२२ जागा जिंकल्या होत्या. जागा जिंकण्याचा हा स्ट्राईक रेट ८९ टक्के असा सर्वाधिक आहे. मागील दोन विधानसभा निवडणुकीत भाजपचा स्ट्राईक रेट घसरणीला लागला होता.
त्याला ब्रेक लावण्यात भाजपला या निवडणुकीत यश आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने ८१ जागा लढविल्या होत्या. त्यापैकी तब्बल ५५ जागा जिंकत शिवसेना कोणाची? याचे उत्तर दिले आहे. शिंदे सेनेचा स्ट्राईक रेट ६७ टक्के इतका राहिला आहे. शरद पवार यांच्यापासून फारकत घेऊन महायुतीत गेलेल्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला ५९ पैकी ४० जागी विजय मिळाला आहे त्यांच्या विजयाचा स्ट्राईक रेट ६४ टक्के राहिला आहे.
विरोधकांच्या आघाडीची घसरण
विरोधी महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षाला या निवडणुकीत सर्वाधिक फटका बसला आहे. गत निवडणुकीत काँग्रेसचे ४४ उमेदवार विजयी झाले होते. यावेळी त्यांना केवळ २० जागांवर समाधान मानावे लागले आहे. पक्षाचा २०१४ च्या मोठ्या विरोधी लाटेत देखील असा दारुण पराभव झाला नव्हता. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने मागील निवडणुकीत १२६ जागा लढवीत ५६ जागी विजय मिळवला होता.
शिवसेनेतील फुटीनंतर यावेळच्या झालेल्या निवडणुकीत ठाकरेंच्या पक्षाने ९५ जागा लढत केवळ १६ जागांवर विजय मिळविला आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने २०१९ मधील निवडणुकीत १२१ जागेवर उमेदवार दिले होते यातील ५४ उमेदवार विजयी झाले. तर राष्ट्रवादीतील फुटीनंतर यावेळी झालेल्या निवडणुकीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने ८६ उमेदवार उभे केले यातील केवळ १३ उमेदवारांना विधानसभेत प्रवेश मिळाला आहे.
पहिल्यांदाच विरोधी पक्ष नेता नसेल
राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच सभागृहात विरोधी पक्ष नेता नसेल. राज्यात विधानसभेच्या २८८ जागा आहेत. विरोधी आघाडीतील कोणत्याही एका पक्षाला विरोधी पक्ष नेतेपद मिळविण्यासाठी किमान २८ जागांची आवश्यकता असते मात्र विरोधी महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना यापैकी एकाही पक्षाला २८ जागांवर विजय मिळालेला नाही त्यामुळे विरोधी पक्ष नेतेपद कुणालाही मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
एकनाथ शिंदे यांना सर्वांधिकार
विधानसभा निवडणुकीत जोरदार यश मिळवल्यानंतर शिवसेनेच्या कार्यकारिणीची बैठक आज मुख्यमंत्री आणि पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीत मित्रपक्षांसोबत चर्चा करण्याचे सर्वाधिकार शिंदे यांना देण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला.
महाराष्ट्राच्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर मोठी बातमी समोर आली आहे. भाजपचा 48 तासात नेता निवडीचा निर्णय होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. भाजपचे दोन निरीक्षक नेता निवडीसाठी महाराष्ट्रात येणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. भाजपच्या नेता निवडीची बैठक ही 29 तारखेला होणार आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. विशेष म्हणजे एकनाथ शिंदे, अजित पवार आणि भाजप यांची खातीदेखील ठरली आहेत, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी आज मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. नवं सरकार स्थापन होईपर्यंत आणि नव्या मुख्यमंत्र्यांनी शपथ घेईपर्यंत ते राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री राहणार आहेत.