इतिहासीक

कारगिल युद्धाचा इतिहास व संपुर्ण माहिती |Kargil war information in marathi

कारगिल युद्ध हे भारत व पाकिस्तान यांच्या दरम्यान इ.स. १९९९ च्या उन्हाळ्यात लढले गेलेले मर्यादित युद्ध होते. या युद्धाची व्याप्ती भारताच्या कारगील व आजूबाजूच्या परिसरापुरतीच मर्यादित राहिली, त्यामुळे याला मर्यादित युद्ध म्हणतात. तसेच या पूर्वीच्या भारत पाक युद्धांप्रमाणेच याही युद्धात, युद्ध सुरू झाल्याची व संपल्याची कोणतीही घोषणा करण्यात आलेली नव्हती. उलट पाकिस्तानतर्फे युद्धादरम्यान त्यांचा देश अलिप्त आहे असा कांगावा करण्यात आला होता. पुढे अनेक वर्षांनंतर हळूहळू पाकिस्तान सरकारने व अनेक लष्करी अधिकाऱ्यांनी हे युद्धच होते असे जाहीर केले. इ.स. १९९९ च्या उन्हाळ्यात, पाकिस्तानी घुसखोरांनी भारतीय सीमा ओलांडून भारताच्या हद्दीतील अनेक ठाणी कब्जा केल्याचे भारताच्या लक्षात आले व या घुसखोरांना हुसकावण्यासाठी कारगीलचे युद्ध सुरू झाले. ही ठाणी कारगील व द्रास परिसरातील अतिउंच दुर्गम जागी होती. अनेक महिन्यांच्या प्रयत्‍नांनंतर भारताला ही ठाणी परत मिळवण्यात यश मिळाले. कारगिल युद्ध आधुनिक इतिहासातील अतिउंचीवरच्या युद्धाचे अत्युत्‍कृष्ट उदाहरण आहे. यात युद्धाला लागणारी सामग्री व मनुष्यबळ ने-आण करण्याचा चांगलाच अनुभव भारतीय सैन्याला मिळाला. हे युद्ध दोन्ही देश अण्वस्त्रसज्ज झाल्यानंतरचे पहिलेच युद्ध होते त्यामुळे सगळ्या जगाचे लक्ष हे युद्ध कसेकसे पुढे चालले आहे याकडे होते. परंतु भारताने हे युद्ध कारगीलपुरतेच मर्यादित ठेवले. त्यामुळे दाखवलेल्या संयमाबद्दल भारताचे जगभर कौतुक झाले. म्हणूनच, भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावर पाठिंबा मिळाला व याउलट, सैन्य मागे घ्यावे यासाठी पाकिस्तानवर अमेरिकेसह अनेक देशांनी दबाव आणला. या युद्धानंतर भारताने आपल्या संरक्षण खर्चात अनेक पटीने वाढ केली. तर पाकिस्तानात राजकीय अस्थिरता माजली. परिणामी, काही महिन्यांतच (ऑक्टोबर, इ.स. १९९९ मध्ये) पाकिस्तानात जनरल परवेझ मुशर्रफ यांनी नवाझ शरीफ यांचे सरकार उलथून लष्करशाही लागू केली.

Kargil war information on map kargil war point

कारगिल युद्ध स्थळ
कारगिल शहर जम्मू आणि काश्मीरची राजधानी श्रीनगरपासून २०५ किमी अंतरावर भारत-पाक आंतरराष्ट्रीय नियंत्रण रेषेपासून जवळ आहे[. हिमालयाच्या इतर भागात प्रमाणे, कारगिलंमध्येही थंड वातावरण असते. उन्हाळा हा सौम्य तर हिवाळा अतिशय दीर्घ व कडक असतो व बऱ्याचदा तापमान -४० °C पर्यंतही उतरू शकते.
राष्ट्रीय महामार्ग लेह ते श्रीनगर या रस्त्यावर कारगिल वसलेले आहे. कारगिलचे युद्ध होण्याचे प्रमुख कारण हा रस्ता हे होय. घुसखोरांनी पाकव्याप्त काश्मीरच्या जवळच्या आणि रस्त्याला समांतर अशा १६० किलोमीटरच्या पट्यातच साधारणपणे घुसखोरी केली. लष्कराच्या अनेक चौक्या या भागात आहेत. त्यातील काही चौक्या समुद्रसपाटीपासून ५,००० मीटरपेक्षाही अधिक उंचावर आहेत. नुसतेच कारगिल नव्हे तर आग्नेयेकडील द्रास व नैर्ऋत्येकडील मश्को खोऱ्यातील, तसेच बटालिक विभागातील चौक्यांवरही घुसखोरी झाली.
वर नमूद केल्याप्रमाणे कारगिल, द्रास व मश्को खोऱ्यातील चौक्या ह्या अतिउंचीवर आहेत. अतिउंचावरील चौक्यांवर कडक हिवाळ्याच्या महिन्यांत सैन्य तैनात करून ठेवणे अतिशय अवघड असल्याने, हिवाळ्यापूर्वी दोन्ही बाजूने सैन्याची माघार व्हावी आणि उन्हाळ्यात बर्फ वितळल्यावर व हवामान मानवी रहाण्यास स्थिर झाल्यानंतर, ते ते सैन्य आपापल्या चौक्यांमध्ये परतावे, असा अलिखित समझौता भारत-पाकिस्तानमध्ये, कारगिल युद्धाच्या आधीपर्यंत होता. मात्र १९९९ साली भारतीय सैन्य भारतीय चौक्यांवर परतण्यापूर्वीच पाकिस्तानी घुसखोरांनी ऐन हिवाळ्यात चौक्यांचा ताबा घेतला. त्यामुळे, कारगिलचे युद्ध भडकण्यास ठिणगी पडली. या चौक्यांचा ताबा घेतला गेल्याने राष्ट्रीय महामार्ग १ए (NH1) हा पाकिस्तानी तोफगोळ्यांच्या आणखी जवळच्या टप्प्यांत आला. तसेच, उंचावरील चौक्यांचा ताबा घुसखोरांकडे गेल्याने त्यांना उतारावरील चौक्यावर नियंत्रण ठेवणे सोपे गेले. या चौक्या डोंगरमाथ्यावरील किल्ल्यांप्रमाणे होत्या. त्यांचा ताबा मिळवण्यास मोठ्या प्रमाणावर फौजेची गरज लागते. त्यातच अतिउंची व कडाक्याची थंडी हे काम अजूनच अवघड करते.

कारगिल युद्धची कारणे
इ.स. १९७१च्या युद्धानंतर भारत व पाकिस्तानमध्ये थेट मोठे युद्ध झाले नाही. तरी सातत्याने छोट्या छोट्या चकमकी होत आहेत. सियाचीन हिमनदी वर भारतीयांचे नियंत्रण तसेच सभोवतालचा परिसरावर नियंत्रण मिळवण्यात दोन्ही बाजू सातत्याने प्रयत्‍नशील असतात. इ.स. १९८०च्या सुमारास पाकपुरस्कृत दहशतवाद्यांनी पंजाबात खलिस्तानच्या नावावर दंगा घातला तसेच इ.स. १९९०च्या सुमारास काश्मीरमध्ये दहशतवादाने मूळ धरले परिणामी भारताने काश्मीरमध्ये कायमस्वरूपी सैन्य तैनात केले. हे दहशतवादी सुरुवातीच्या काळात काश्मीरमधील असत व त्यांना प्रशिक्षित करून पाठवले जात असे. काही काळानंतर पाकिस्तानी सैनिक, अधिकारी व तालिबानी अफगाणिस्तानातील भाडोत्री अतिरेक्यांनाही काश्मीरमध्ये पाठवले जाऊ लागले. पाकिस्तानने नेहमीच या बाबतीत आपला सहभाग असल्याचा इन्कार केला. कारगिलच्या युद्धातदेखील पाकिस्तानने हीच खेळी वापरली व घुसखोर हे काश्मिरी स्वातंत्र्यसैनिक आहेत असे जगाला सांगण्याचा प्रयत्‍न केला. इ.स. १९९८मध्ये भारत पाकिस्तानने अणु चाचण्या केल्यानंतर दोन्ही देशातील संबंध चांगलेच ताणले गेले. परंतु वाजपेयी यांनी मैत्रीचा हात पुढे करून संबंध निवळण्याचा प्रयत्‍न केला व त्यासाठी ते स्वतः लाहोरला जाऊन आले होते.
इ.स. १९९८-९९ च्या हिवाळ्यात पाकिस्तानी लष्करातून अनेक तुकड्यांना मुजाहिदीनच्या वेषात भारतात नियंत्रण रेषेपलीकडे पाठवण्यात आले. या कारवाईला ऑपरेशन बद्र असे नाव देण्यात आले व कुणाच्याही लक्षात न येता त्यांनी रिकाम्या भारतीय चौक्यांचा ताबा घेतला. (वर नमूद केल्याप्रमाणे हिवाळ्यात प्रचंड थंडीमुळे सैन्य माघारी घेतले गेले होते.) नियंत्रण रेषेच्या जास्तीत जास्त आत घुसखोरी करून राष्ट्रीय महामार्ग १ च्या जवळ यायचे. असे केले की, महामार्गावर कायमस्वरूपी ताबा मिळवता येईल आणि नंतर राजकीय वजन वापरून काश्मीरच्या प्रश्नाचे आंतरराष्ट्रीयीकरण करणे पाकिस्तानला सोपे पडेल असा हा या कारवाईचा मुख्य उद्देश होता. भारताला नवीन नियंत्रण रेषा मान्य करायला भाग पाडले की. लडाख व सियाचीनला भारतापासून तोडणे सोपे जाईल असा पाकिस्तानी युद्धनीतिज्ञांचा कयास होता. तसेच घुसखोरीदरम्यान कारगील/काश्मीर परिसरात अंतर्गंत बंडखोरी भडकावून भारताला अजून बुचकळ्यात पाडण्याचा पाकिस्तानी व्यूह होता. भारतीयांनी सियाचीन हिमनदीवर नियंत्रण मिळवण्यात जी क्‍ऌप्ती वापरली तसाच काहीसा प्रकार पाकिस्तानने केला असा काही लेखकांचा सूर होता.

युद्धचा घटनाक्रम
कडक हिवाळ्यातील महिन्यांमध्ये मनुष्यहानी कमी व्हावी म्हणून, अतिउंचावरील चौक्या रिकाम्या करायचा प्रघात भारत व पाकिस्तान हे दोघेही पाळत. हवामान पुन्हा ठीकठाक झाल्यानंतर दोन्ही बाजूंचे सैन्य आपापल्या चौक्यांमध्ये परतून संरक्षणाची जवाबदारी घेत असे.
फेब्रुवारी, इ.स. १९९९मध्ये पाकिस्तानी लष्कराने कडक हिवाळ्यातच भारतीय चौक्यांचा ताबा घेणे आरंभले. पाकिस्तानने ही कारवाई अतिशय सूत्रबद्धरीत्या व थांगपत्ता लागू न देता पार पाडली. यांतच भर म्हणजे, भारतीय गुप्तहेर खात्याला या घटनेची माहिती अजिबात मिळाली नाही त्यामुळे भारतीय गुप्तहेर खात्याच्या कार्यक्षमतेवर सर्वत्र भारतातून व जगातूनही चांगलीच टीका झाली. स्पेशल सर्व्हिसेसच्या सर्वोत्कृष्ट तुकड्या, तसेच नॉर्दर्न लाइट इन्फट्रीच्या ४ ते ७ बटालियन तुकड्या या कामात गुंतल्या होत्या. रिकाम्या चौक्यांव्यतिरिक्त भारतीय सैन्याला हल्ला करायला अवघड जावे म्हणून मोक्याच्या जागाही ताब्यात घेण्यात आल्या. साधारणपणे, अतिउंचावरील एक मुख्य चौकी व त्याला टेका देणाऱ्या दुय्यम उतारावरील व कमी उंचीवरील चौक्या पाकिस्तानी सैन्याने ताब्यात घेतल्या. पाकिस्तानी मुख्य सैनिकांबरोबरच अफगाणी मुजाहिदीन, काश्मिरी मुजाहिदीन यांनाही या कार्यवाहीत समाविष्ट केले गेले.
सुरुवातीला, अनेक कारणांमुळे कारगिलची घुसखोरीचा पत्ता लागण्यास उशीर झाला. मुख्यत्वे पाकिस्तानने अनेक भागात तोफांचा मारा केल्यामुळे शोधपथक पाठवण्यास दिरंगाई झाली. भारतीय लष्कराच्या मते, हा तोफखान्याचा मारा नेहेमीचा असतो, त्यात नवे काही नाही. पाकिस्तानने हा मारा नियंत्रण रेषेपलीकडील सैनिकांना/घुसखोरांना संरक्षण देण्यासाठी केला. मेच्या दुसऱ्या आठवड्यात स्थानिक मेंढपाळ यांनी घुसखोरीची सूचना भारतीय सैन्याला दिली. त्यानुसार भारतीय सैनिकांनी टेहळणीसाठी तुकडी पाठवली. तिच्यावर हल्ला करण्यात आला व घुसखोरी झाल्याचे सिद्ध झाले. सुरुवातीला ही मुजाहिदीन स्वरूपाची भासल्याने घुसखोरी लवकरच संपवता येईल असे वाटले. परंतु लगेचच नियंत्रण रेषेच्या बऱ्याच लांबीवर ही घुसखोरी झाल्याचे लक्षात आले. घुसखोरांकडून आलेले प्रत्युत्तर वेगळ्याच प्रकारचे होते व वरवर घुसखोरी वाटणारी घटना मोठ्या नियोजनाचा भाग आहे असे लक्षात आले. अशा रितीने कारगिल येथे युद्ध सुरू झाले आहे यावर शिक्कामोर्तब झाले. पाकिस्तानने एकूण सुमारे १३० ते २०० चौरस किलोमीटर प्रदेश ताब्यात घेतला होता. तर मुशर्रफ यांच्या मते १३०० चौरस किलोमीटर इतका प्रदेश ताब्यात घेण्यात आला होता.
भारतीय सरकारने ‘ऑपरेशन विजय’ या नावाखाली कारगिलच्या युद्धासाठी कार्यवाही चालू केली. त्यासाठी संख्येने मुळात सुमारे २,००,००० इतक्या फौजेचा आधार घेण्यात आला. परंतु भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता मोठ्या प्रमाणावर युद्ध करणे शक्य नव्हते. त्यामुळे रेजिमेंटल व बटालियन पुरतीच कारवाई शक्य होती. अर्थातच फौजेची गणसंख्या २०,००० पर्यंत मर्यादित ठेवण्यात आली. अर्धसैनिक व वायुदल मिळून भारताने एकूण ३०,००० पर्यंत सैनिक कारगिलच्या युद्धात वापरले. घुसखोरांची संख्या पाकिस्तानी सूत्रांप्रमाणे साधारणपणे ५,००० होती. यांत पाकव्याप्त काश्मीरमधील तोफखान्यामधील सैनिकही समाविष्ट होते.
भारतीय वायुसेनेकडूनही ‘ऑपरेशन सफेद सागर’ सुरू झाले. या ऑपरेशनाद्वारे पायदळ सैन्याची ने-आण करण्याची मोठी भूमिका वायुसेनेने निभावली. मोठे बॉम्ब वाहून नेण्यासाठी लागणारे मोठे विमानतळ, भौगोलिक परिस्थितीमुळे या भागात नसल्याने इथेही वायुसेनेचीही व्याप्ती मर्यादित होती.भारतीय नौदलानेही पाकिस्तानी बंदरांना आपले लक्ष्य केले व त्यामध्ये येणाऱ्या जहाजांची कोंडी केली. कराची बंदर हे खासकरून लक्ष्य करण्यात आले. या कृत्याने पाकिस्तानला आवश्यक अशा जीवनावश्यक वस्तूंची रसद थांबली. काही काळाने नवाज शरीफ यांनी उलगडवून सांगितले की पाकिस्तानकडे या काळात फक्त ६ दिवसांचाच इंधन साठा राहिला होता व जर पूर्ण युद्ध सुरू झाले असते तर पाकिस्तानची बरीच नाचक्की झाली असती.

हे ही वाचा —————————-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Site Statistics
  • Today's visitors: 1,377
  • Today's page views: : 1,432
  • Total visitors : 499,493
  • Total page views: 525,907
Site Statistics
  • Today's visitors: 1,377
  • Today's page views: : 1,432
  • Total visitors : 499,493
  • Total page views: 525,907
error: लेख Copy Peast करण्यापेक्षा Share करा. News Maharashtra Voice