संततधार पावसाने नांदेड जिल्हा जलमय, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा, आपत्कालीन नियंत्रण कक्ष स्थापन
⦁पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडून जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा ⦁जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्याकडून विविध ठिकाणी भेट देऊन पाहणी
दिनांक 6 सप्टेंबर रोजी रात्री अचानक पाऊसाचा जोर वाढल्यामुळे नायगाव तालुक्यातील कुंटूर येथे एक व्यक्ती पुरात अडकली होती. या व्यक्तीची प्रशासनामार्फत सुखरुप मुक्तता करण्यात आली. मुखेड तालुक्यातील मोतिनाल्यात एक व्यक्ती अडकला होता. या व्यक्तीचीही सुखरुप मुक्तता करण्यात आली आहे. याचबरोबर बाऱ्हाळी, थोटवाडी नाल्यात 3 व्यक्ती अडकले असून त्यांना सुखरुप काढण्यासाठी प्रशासनाच्यावतीने प्रयत्न केले जात आहेत.
नरसी-देगलूर व नरसी-बिलोली या महामार्गावर दुपारी 1.30 वाजल्यापासून वाहतूक बंद झाल्याचे बिलोली तहसीलदार यांनी कळविले. अर्धापूर तालुक्यातील शेलगाव (बु) व सांगवी या गावाचा दुपारी 3.15 पासून तात्पुरता संपर्क तुटला आहे. देगलूर तालुक्यातील लाखा, तपशेलगाव, सुगाव, मनसकरगा या गावाचा दुपारी 3.30 पासून संपर्क तुटला आहे. बिलोली तालुक्यातील आरळी, अटकळी, दुगाव, कासराळी, लघुळ या गावातील कुटुंबे तात्पुरती स्थलांतरीत करण्यात आली आहेत. याचबरोबर लोहगाव येथील लघुपाटबंधारे विभागांतर्गत जिल्हा परिषदेचा तलाव, कंधार तालुक्यातील गनातांडा, पानशेवडी येथील तळे फुटल्या बाबत संबंधित तहसिलदाराने कळविले आहे.
हिमायतनगर तालुक्यातील पोटा येथील संतोष सुर्यवंशी यांचे दोन बैल 6 सप्टेंबरला वीज पडून मयत झाल्याबाबत संबंधित तहसिलदार यांनी कळविले आहे. कंधार तालुक्यातील कवठा येथील मारोती घोरपे यांची एक म्हैस पुरात वाहून मयत झाली आहे. बिलोली तालुक्यातील सावळी येथे आज एक गाय, एक वासरू पुरात वाहून मयत झाल्याची माहिती संबंधित तहसिलदार यांनी दिली आहे.
जिल्हा प्रशासनातर्फे पूरसदृश्य परिस्थितीवर नियंत्रणासाठी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी नांदेड जिल्हा मुख्यालयात आपत्कालीन नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. यात जिल्हा पुरवठा अधिकारी लतीफ पठाण, तहसिलदार विजय अवधाने, नायब तहसिलदार राजेश लांडगे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी किशोर कुऱ्हे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे, उपअभियंता गावंडे, पाटबंधारे विभागाचे उपअभियंता निळकंठ गव्हाने, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे उपअभियंता महेश गट्टुवार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता नरमीटवार यांचा समावेश आहे.
हे ही वाचा ————————–
- नराधमाचा क्रूरपणा! मालेगावच्या मानदे डोंगराळेत चिमुरडीची बलात्कारानंतर हत्या; संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र संतापाची लाट.
- माहुर पाचुंदा गावात दोन शेतकरी महिलांची निर्घृण हत्या! परिसरात खळबळ
- अमेरिकेतील न्यूयॉर्कचे पहिले मुस्लिम आणि भारतीय वंशाचे महापौर: झोहरान ममदानी यांच्या ऐतिहासिक विजयाची कहाणी
- मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येच्या कटाने खळबळ; धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप, दोन अटकेत!
- वर्गखोलीत राष्ट्र घडविणारा शिक्षकच खरा राष्ट्रनायक – डॉ गोविंद नांदेडे

