माहूरगड पर्यावरणाचा झेंडा फडकवणार कलावंत,नाम फाउंडेशन चे मकरंद अनासपुरे – राज्यस्तरीय संमेलनाचे निमंत्रण स्वीकारले
माहूरगड प्रतिनिधी :- (ज्ञानेश्वर कऱ्हाळे ) निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ, महाराष्ट्र राज्य आयोजित ९ वे राज्यस्तरीय पर्यावरण संमेलन 27 व 28 ऑक्टोबर 2025 श्री क्षेत्र माहूरगड येथे भव्यदिव्य पद्धतीने होणार आहे. या संमेलनाच्या तयारीचा भाग म्हणून संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सुप्रसिद्ध पर्यावरणप्रेमी सिनेअभिनेते श्री मकरंद अनासपुरे व सैराट फेम अभिनेते श्री सुरेश विश्वकर्मा यांची विशेष भेट घेऊन त्यांना कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले.
या भेटीत दोन्ही कलाकारांनी पर्यावरण संवर्धनाच्या कार्याला आपला पूर्ण पाठिंबा देत संमेलनात उपस्थित राहण्याचे आश्वासन दिले. भेटीच्या वेळी पर्यावरणाचा संदेश जपणारी रोपटी भेट देऊन सन्मान करण्यात आला.
या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष प्रमोददादा मोरे, कार्याध्यक्ष श्री संतोष परदेशी, जिल्हा संघटक श्री चंद्रकांत भोजने, राज्य प्रसिद्धी प्रमुख महेश पाडेकर,श्री दिगंबर पुराणे, श्री सोपान वायाळ, श्री अनुज्ञकुमार रोडे, कु. दीपिका परदेशी आदी मान्यवर उपस्थित होते.
संस्थेचे अध्यक्ष प्रमोददादा मोरे म्हणाले, “माहूरगड येथील या संमेलनातून राज्यभरात पर्यावरण संतुलन, वृक्षसंवर्धन आणि प्रदूषण निवारण याबाबत ठोस संदेश पोहोचेल. कलाकारांची उपस्थिती तरुण पिढीसाठी प्रेरणादायी ठरेल.”
मकरंद अनासपुरे यांनी सांगितले, “निसर्ग हा आपला खरा गुरु आहे. त्याचं रक्षण करणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. या संमेलनाला हजेरी लावून मी निसर्ग संदेश अधिक प्रभावीपणे पोहोचवेन.”या संमेलनात विचारमंथन, कार्यशाळा, सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून समाजात पर्यावरण जनजागृतीचा नवा उत्साह निर्माण करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.