Who is this unfortunate Bilkis Bano ….? In the words of Heramb Kulkarni
गुजरात मध्ये २००२मध्ये गोध्रा येथे रेल्वेचा डबा पेटवला व त्यात ५६ व्यक्ती जळाल्या हे अतिशय क्रूर कृत्य होते पण दुसऱ्या दिवसापासून गुजरात मध्ये जो नरसंहार झाला तो तर क्रूरतेचा कळस होता. त्या नरसंहारात बिलकिस बानोची कथा गुजरात मधील अत्याचारांचा चेहरा ठरावा अशी प्रतिनिधिक कहाणी होती. सर्व राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय माध्यमाने तिची दखल घेतली होती. बिलकिस अवघ्या २१ वर्षांची होती. तिच्या घरात एकूण सर्वमिळून १३ व्यक्ती होत्या. दंगल सुरू झाल्यानंतर जीवाच्या भीतीने घरातील सहा व्यक्ती दुसरीकडे जाऊन लपून बसले. दंगलखोरांनी घरात प्रवेश केला आणि तिच्या समोर त्या सात व्यक्तींचे खून केले तिच्या तीन वर्षाच्या लहान मुलीचा नराधमानी खून केला आणि नंतर त्यांची नजर तिच्या शरीराकडे गेली. बिल्कीस त्यावेळी पाच महिन्यांची गरोदर होती. तिच्यावर अनेकांनी बलात्कार केला. त्या बलात्कारात तिची अक्षरश: शुद्ध हरपली व नग्न अवस्थेत ती ३ तास पडून राहिली. तिला जाग आली, तेव्हा घरात कोणीच नव्हते…त्यावेळी तिचा गर्भ ही पडून गेला.
घरातील काही जण पळून गेले तर काहींचे मृत्यू झालेले अशात एका आदिवासी महिलेने तिला साडी दिली.एका महिला होमगार्डने तिला पोलीस स्टेशनला नेले. पोलीस स्टेशनला गेल्यावर तिने जे घडले ते सांगितले पोलिसांनी वरवर गुन्हा नोंदवला परंतु पुरावे सापडत नाहीत… या नावाखाली ती केस बंद करण्यात आली. ७ व्यक्तींचे मृत्यू व सामूहिक बलात्कार असूनही पोलिसांना तपास गंभीरपणे करावासा वाटला नाही.त्यांनी पुरावे सापडत नाही म्हणून केस बंद केली..
शेवटी सामाजिक संस्थांच्या मदतीने तिथे थेट मानव अधिकार आयोग व सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली.
सर्वोच्च न्यायालयाने बंद केलेली केस पुन्हा चालवण्याचे आदेश दिले. सतत धमक्या येत होत्या. तेव्हा तिने ही केस गुजरात बाहेर चालवण्याची विनंती केली. त्यानुसार ती केस मुंबईमध्ये चालली. या काळातल्या धमक्यांना घाबरून बिलकिसने २० वेळा राहण्याची जागा बदलली. यावरून तेथील दहशत आपल्या लक्षात येऊ शकेल..शेवटी सर्वोच्च न्यायालयाने पोलीस व डॉक्टर यांच्यासह आरोपी वर खटला चालवला व ११ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा दिली.बिलकीसच्या २००२ ते २०१७ या १५ वर्षाच्या अथक पाठपुराव्याचे यश होते..
स्वतःवरील अन्यायविरुद्ध एक महिला संघर्ष किती टोकाला जाऊन संघर्ष करू शकते, याचे हे प्रेरक उदाहरण होते. त्यावेळी अनेकांना समाधान वाटले पण आज त्या आरोपींना कोणी सोडून देऊ शकेल अशी कल्पना सुद्धा केली नव्हती…..पण जिल्हाधिकारी यांनी समिती नेमून आरोपींची तुरुंगातील वर्तणूक चांगली होती असे जखमेवर मीठ चोळणारे निष्कर्ष काढण्यात आले. एका महिलेवर सामूहिक अत्याचार करणे तिच्या मुलीचा आणि कुटुंबातल्या ७ व्यक्तींचा खून करणे याला जर चांगली वर्तणूक म्हणायचे असेल तर आपण हतबुद्ध होऊन जातो…नवा भारत कसा आहे याने आपण सुन्न होतो..
गुजरात मधील बाबू बजरंगीची महिला अत्याचारांची भीषण कबुली, नरोद पटीयामध्ये जे ९५ खून झाले त्याचे नेतृत्व करणाऱ्या माया कोडणानी यांनी त्या दंगलखोर जमावाचे नेतृत्व करून सुद्धा त्यांना ‘कायमस्वरूपी जामीन’ दिला जातो.संजीव भट वर ज्या पोलीस स्टेशनला फक्त भेट दिली तेथील एक आरोपी सुटल्यावर मृत्यू झाला तरीही भट यांचेवर गुन्हा दाखल करून जन्मठेप लादली जाते व जामीन अर्ज सुद्धा कोर्ट ऐकून घेत नाही असा हा न्याय आहे
दंगलीतील सगळेच घटनाक्रम आणि अथक मेहनतीने लागलेल्या शिक्षा या समाधानात फार राहता आले नाही. तिस्ता सेटलवाड आज आक्रमकपणे बिलकिस बानो यांना घेऊन उभे राहिल्या असत्या पण त्यांना तुरुंगात पाठवले आणि गुजरात राज्याची बदनामी केली असा आरोप त्यांच्यावर ठेवला आहे…
गुजरात राज्याची बदनामी अशा प्रकारचे गुन्हेगार करत नाहीत. त्या गुन्हेगारांना चांगल्या वर्तणुकीचे शिफारस देऊन त्यांचे तुरुंगातून मुक्तता करणारे बदनामी करत नाहीत तर बिलकिस सारख्या अशा महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी लढा देणारे मात्र गुजरातची बदनामी करतात… हे सारे प्रकरण निराश करणारे आहेत उदास करणारे आहे
आपण लिहून बोलून काहीच फरक पडणार नाही, आपल्या मर्यादा ही स्पष्ट आहेत, बिलकीस ची निराशा उदासी किती वेदनादायक असेल…ज्या बिलकिस ने हे सारे भोगले आहे त्या बिलकीसची आज काय मनस्थिती असेल..?
तिच्या मुलीचा खून करणारे, गर्भपात घडवणारे सुटल्यावर जेव्हा पेढे वाटले जातात तेव्हा आपण का जिवंत राहिलो असेच तिला वाटले नसेल का…?
आणि वाईट म्हणजे लाल किल्यावरून महिला सन्मानाचे आवाहन झाल्यावर हे पेढे वाटले आहेत…चला आपणही पेढे वाटू या आणि महिला सन्मानाचा आनंद साजरा करू या..
हेरंब कुलकर्णी Who is this unfortunate Bilkis Bano ….? In the words of Heramb Kulkarni