प्रबोधनकारांचे राज ठाकरे यांना पत्र

प्रबोधनकारांचे राज ठाकरे यांना पत्र

Prabodhankar’s letter to Raj Thackeray


प्रिय राज,
टिव्ही चॕनेलला दिलेल्या एका मुलाखतीत तू अकलेचे तारे तोडल्यामुळे सध्या चहूबाजूंनी तुझ्यावर टिकेचा भडीमार सुरु आहे.परंतु मुद्देसूद उत्तर द्यायला तुझ्याकडे एखादा अभ्यासू शिलेदार सुध्दा नाही हे पाहून मला अतिशय वेदना होत आहे.एखाद्या विषयाची परिपूर्ण माहिती नसतांना किंवा अभ्यास नसतांना त्या विषयावर बोलून विनाकारण आपले हसे करुन घेवू नये याची तुझ्यासारख्या राजकारणी व्यक्तीला समज नसावी याचे आश्चर्च वाटते.राज, महाराष्ट्राचा सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक इतिहास खूप मोठा व संघर्षमय आहे.तो समजून घेण्यासाठी प्रचंड वाचन व व्यासंग असणे आवश्यक आहे.परंतु तुझा व्यासंग तरुणांच्या हाती दगड देवून टोलनाके फोडणे आणि परप्रांतियांना शिव्या देणे यापलिकडे अजूनही गेला नाही असे मला वाटते.निदान माझी दोन-चार पुस्तके जरी तू वाचली असतीस तरी तुझे बरेच कन्सेप्ट क्लिअर झाले असते.परंतु तुझ्या घरातच माझ्यासारखा इतिहासकार,स्वतःं तुझ्या रक्ताचा आजोबा असतांना तू कोण्या पुरंदरे नावाच्या विकृताच्या मागे लागावा याचा मला खेद वाटतो.अरे,या महाराष्ट्राच्या लोकांनी मला सन्मानाने प्रबोधनकार ही उपाधी बहाल केली आहे.माझ्यावर इथल्या बहुजन समाजाने प्रचंड प्रेम केले आहे आणि आताही करतात.पुरोगामी चळवळीत फुले-शाहू-आंबेडकर यांच्याप्रमाणेच माझा आदर केला जातो व माझे नाव सन्मानाने घेतले जाते.तरीसुध्दा तुला माझे महत्व समजू नये याचे फार वाईट वाटते.

अरे राज, ब.मो.पुरंदरे हा माणूस इतिहासकार नाही.तो शाहीरही नाही.देशाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर करुन या माणसाने एकीकडे प्रचंड पैसा कमावला आणि दुसरीकडे शिवरायांचा व त्यांच्या कुटूंबाचा खोटा इतिहास लिहून बदनामी केली.इतका कृतघ्न आणि कपटी माणूस मी पाहिला नाही.तरीसुध्दा तू नेहमी अशा माणसाचे गुणगाण करतोस ! त्याच्यासमोर लोटांगण घालतोस ! परंतु माझे नाव किंवा माझे साहित्य याचा मात्र तू कधी उल्लेख करत नाही.माझ्या आजोबांचे साहित्य वाचा असे आपल्या कार्यकर्त्यांना कधीच सांगतही नाही.यावरुन तुझ्या लेखी माझ्यापेक्षा पुरंदरेंचे महत्व जास्त आहे असे दिसते.

प्रिय राज, शिवसेना स्थापन करण्याची कल्पना माझी होती हे कदाचित तुला माहित असेलच.मराठी माणसांच्या हितासाठी व रक्षणासाठी शिवसेना स्थापन करण्याचा सल्ला तुझे काका बाळासाहेबांना मीच दिला होता.मराठी माणसाचे किती हित झाले हे तर मी सांगू शकणार नाही,पण मराठी माणसांच्या नावावर स्वतःंचे हित साधण्यात तुम्ही मात्र जराही कसूर केला नाही हे मला ठाऊक आहे.महाराष्ट्र ही संतांची,महापुरुषांची पवित्र भूमी आहे.या संतमहापुरुषांनी लोकांचे प्रबोधन करुन जनजागृती केली.परंतु येथील ब्राम्हणी व्यवस्थेने त्यांना प्रचंड त्रास दिला,अपमान केला,वैकुंठाला पाठविले.

अरे राज, पुरोहितशाहीमुळे या देशातील लोकांना जनावरापेक्षाही वाईट अवस्थेत जगावे लागले.डुकरी,कुत्री तळ्यावरचे पाणी पीवू शकत होती,पण माणसांना मात्र पाणी पिण्यास बंदी होती.माझ्या पुस्तकांमधे हे मी निर्भिडपणे व पुराव्यानिशी लिहिले आहे.परंतु तुला पुस्तके वाचायला वेळ तरी कुठे आहे ? इतरांची नाही तर निदान आपल्या आजोबांची पुस्तके तरी वाचावी असे तुला का वाटले नाही ? त्या पुरंदरेने तुझी मती भ्रष्ट केली असावी असे आता वाटायला लागले आहे.त्या पुरंदरेंच्या पूर्वजांना मी माझ्या पुस्तकातून चांगले झोडपून काढले आहे व त्यांची नालायकी जगासमोर आणली आहे.म्हणूनच माझा बदला घेण्यासाठी पुरंदरेंनी तुला मानसिक गुलाम बनवून बहुजनांच्या विरोधात भडकावून दिले आहे असे म्हणायला पुरेपुर जागा आहे.

प्रिय राज, परिवर्तनवादी चळवळीत मला मानणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे.परंतु तुझ्या अशा अविवेकी आणि अतिरेकी वागण्यामुळे मी इतक्या मेहनतीने कमावलेले नाव आणि सन्मान तू खराब करीत आहेस.तुला येथील वर्णव्यवस्थेचा अभ्यास नाही.या वर्णव्यवस्थेने जनावरांना माणसांपेक्षा श्रेष्ठ मानले आहे.म्हणून पुरोहितशाही नष्ट झाली की जातीयवाद आपोआप नष्ट होईल.पुरोहितशाही ही भारताला लागलेली किड आहे आणि पुरंदरे हे पुरोहितशाहीचे कट्टर समर्थक आहेत हे तुला कसे समजावून सांगू ? पुरंदरे ऐवजी जर तू छत्रपती शिवरायांच्या नावाचा जयघोष केला असता आणि सोबतीला माझ्या परिवर्तनवादी विचारांची जोड दिली असती तर आज तुला मराठी माणसाने डोक्यावर घेतले असते.परंतु थोरांऐवजी तू चोरांचा जयजयकार करीत बसलास आणि मराठी माणसाच्या नजरेतून पूर्णपणे उतरलास.

माझ्या लाडक्या राजा,अजूनही माझे ऐक.ते पुरंदरे आता शंभरीला टेकले आहे.ते याआधीही तुझ्या कामी पडले नाही आणि आता तर अजिबातच पडणार नाही.त्यामुळे त्यांचा नाद सोड.इतिहासाचे तटस्थपणे वाचन,मनन,चिंतन कर.माझे साहित्य एकदा गांभीर्याने वाच.मग पहा तुझ्या मेंदूला कशा झिणझिण्या येतात ! तुझ्या विचारांना कशी चालना मिळते ! वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबांचे पहिले चरित्र मी लिहिले आहे हे तुला माहित आहे का ? गाडगेबाबांनी आपल्या संपूर्ण आयुष्यामधे किर्तनातून घातक रुढी,परंपरा,कर्मकांड,अंधश्रध्दा,बुवाबाजी,पुरोहितशाही यावर जोरदार प्रहार केले आहेत.पुरंदरे हे गाडगेबाबांच्या विचारांच्या विरोधात काम करतात.तरीसुध्दा तू त्यांची पाठराखण करतोस हा फक्त माझाच नाही तर गाडगेबाबांच्या विचारांचाही अवमान आहे.त्यामुळे आतातरी हा फालतूपणा बंद कर.माझे विचार मान्य नसेल तर मानू नकोस,पण निदान त्या विचारांच्या विरोधी कृत्य तरी करू नकोस ही तुला हात जोडून नम्र विनंती आहे.

प्रिय राज,राजकारणाला चांगल्या समाजकारणाची जोड दे ! तोडफोडीचे धंदे बंद कर ! मराठी माणसांसाठी खरोखरच काम करायची प्रामाणिक इच्छा असेल तर आधी मराठी माणसाचे मन समजून घे ! त्यासाठी मुंबईच्या बाहेर पड ! मुंबई म्हणजे महाराष्ट्र नाही.खेड्यापाड्यातील लोकांचे जीवन,समस्या,अडचणी समजून घे ! AC च्या बाहेर निघून कडक उन्हात एखाद्या शेताच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घे ! एक वर्ष अजिबात घरात न येता महाराष्ट्राचा कप्पा-कप्पा पिंजून काढ आणि उभा,आडवा महाराष्ट्र समजून घे ! मग पहा तुला खऱ्या महाराष्ट्राचे दर्शन होईल आणि तुझे राजकारण योग्य दिशेने जाण्यास तुला खूप मदत होईल.अरे हो,जाता जाता एक सांगायचे राहूनच गेले, ते *भिक्षूकशाहीचे बंड* आणि *देवळांचा धर्म व धर्माची देवळे* ही माझी दोन पुस्तके नक्की वाचून काढ ! स्वतःंची व कुटूंबाची काळजी घे ! काही अडचण आली तर माझी पुस्तके वाचत चल ! बरं भेटू या पुन्हा !!!

तुझाच आजोबा
केशव सीताराम ठाकरे
( प्रबोधनकार )

“”””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””
प्रेमकुमार बोके
अंंजनगाव सुर्जी
९५२७९१२७०६
२० आॕगस्ट २०२१ (डाॕ.नरेंद्र दाभोळकर स्मृतीदिन)

<

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: लेख Copy Peast करण्यापेक्षा Share करा. News Maharashtra Voice