बीड : केंद्र सरकारच्या शिक्षण विभागाकडून देण्यात येणारे राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर झाले आहेत. देशभरातील ४६ शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारानं ५ सप्टेंबर २०२२ रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. रौप्यपदक आणि ५० हजार रुपये असं राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराचं स्वरुप आहे. राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांमध्ये महाराष्ट्रातील दोन शिक्षकांनी बाजी मारली आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील दोन्ही शिक्षक हे बीड जिल्ह्यातील आहेत.
बीड जिल्हा परिषदेचे शिक्षक शशिकांत कुलथे (Shashikant Kulthe) आणि सोमनाथ वाळके ( Somnath Walke) यांना राष्ट्रपती पुरस्कार जाहीर झाला आहे. शिक्षक शशिकांत कुलथे हे गेवराई तालुक्यातील दामू नाईक तांडा तर सोमनाथ वाळके हे आष्टीतील पारगाव जोगेश्वरी या शाळेवर सध्या कार्यरत आहेत. राष्ट्रपती पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्या दोघांचे झेडपीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार , शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी , उप शिक्षणाधिकारी अजय बहिर यांच्यासह अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
जिद्द, नाविन्याचा ध्यास आणि कष्ट करण्याची तयारी असेल तर किती मोठे काम उभे करता येते हे अनेक लोकांनी सिद्ध करून दाखविले आहे.याच वेगळ्या वाटेवर चालून स्वतःमधील गुणवत्ता सिद्ध करून शैक्षणिक क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करणारे शिक्षक म्हणजे सोमनाथ वाळके.बीड सारख्या दुष्काळी आणि उसतोड मजुरांचा जिल्हा असलेल्या जिल्ह्यात आष्टी तालुक्यातील पारगाव जोगेश्वरी या शाळेवर ते सध्या कार्यरत आहेत.
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमात प्रत्येक मुल शिकले पाहिजे यासाठी रचनावाद, ए बी एल ,तंत्रज्ञान,अशा अनेक गोष्टींची शाळेत सुरुवात करावी असा शासनाचा हेतू होता. त्यानुसार सोमनाथ वाळके यांनी रचनावाद समजून घेत शाळेत रचनावाद सुरु केला त्याचे अतिशय चांगले परिणाम दिसून यायला लागले. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत चांगला फरक दिसून आला आणि पारगावची शाळा रचनावादाचे मॉडेल म्हणून नावारूपास यायला लागली.
आतापर्यंत महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील शिक्षक आणि अधिकारी यांनी शाळेला भेट देऊन शाळेतील रचनावादी पद्धतीचे कौतुक केले आहे. पारगावच्या शाळेचे अनुकरण अनेक शाळांनी केलं आहे. आज राज्यात अनेक ठिकाणी मुलं समजून घेताना या विषयावर संवाद साधण्यासाठी सोमनाथ वाळके यांना बोलावले जाते.त्यांनी राज्यभरात आतापर्यंत 70 पेक्षा अधिक कार्यशाळा घेतल्या आहेत.
विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी यासाठी तंत्रज्ञानातील वेगवेगळे प्रयोग सोमनाथ वाळके याँनी केले.यामध्ये मोबाईल, संगणक, प्रोजेक्टर, कराओके स्टुडिओ ,रेकॉर्डिंग स्टुडिओ ,व्हिडिओ रेकॉर्डिंग स्टुडिओ अशा अनेक डिजीटल साधनांचा प्रभावी वापर करीत विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविली. सध्या शाळेत राज्यातील पहिला म्युझिक स्टुडिओ लोकसहभागातून उभा केला आहे . कलेसारख्या दुर्लक्षित विषयाचा विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी कसा फायदा करून घेता येतो हे या शाळेतील हायटेक रेकॉर्डिंग स्टुडिओ पाहिल्यानंतर लक्षात येते. हा स्टुडिओ एकदा चोरीला गेल्यानंतर सुद्धा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सहकार्याने सोमनाथ वाळके यांनी हा स्टुडिओ पुन्हा उभा केला.
आजमितीस या शाळेत कॅसिओ, ऑक्टापॅड, काँगो, डफ, ढोल,ताशा, ढोलकी, खंजीर, ट्रँगल, बिगुल अशी अनेक प्रकारची भारतीय व पाश्चात्य वाद्ये आहेत, शाळेतील विद्यार्थी ही सर्व वाद्ये लीलया वाजवतात. अभ्यासात रुची कमी असलेले विद्यार्थी एरव्ही शाळेपासून दूर पळत होते परंतु या स्टुडिओच्या ओढीने हीच मुले आता शाळेत नियमित झाली आहेत. राज्यातील शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांच्यासाठी उपयुक्त असा शिक्षककट्टा नावाचा ब्लॉग तयार केला असून त्यावर विविध प्रकारची शैक्षणिक माहीती ,सॉफ्टवेअर ,लेख उपलब्ध करून दिले आहेत.
लोकसहभागातून १५ लाखांची उभारणी, शाळेचा कायापालट
शिक्षकांनी चांगले काम केले तर ग्रामस्थ व पालक सुद्धा शाळेसाठी भरभरून मदत करत असतात, याचा अनुभव पारगावच्या शाळेत गेल्यानंतर येतो. या गावातील ग्रामस्थांनी १५ लक्ष रुपयांहून अधिक रक्कम लोकसहभाग जमा करून या शाळेचा अंतर्बाह्य विकास केला आहे. लोकसहभागातून शाळेचे क्रीडांगण, वाचनालय, संगणक कक्ष, व्हर्च्युअल क्लासरूम, सोलर सिस्टीम, बोअर, पिण्याच्या पाण्याची सुविधा, रंगरंगोटी, व्हरांडा, उद्यान निर्मिती, हॅन्ड वॉश स्टेशन, इन्व्हर्टर, शैक्षणिक साहित्य आदी प्रकारची कामे केली आहेत. सोमनाथ वाळके यांनी सहकारी शिक्षकांच्या मदतीने यासाठी विशेष प्रयत्न केले
चर्चासत्रात सहभाग
सोमनाथ वाळके यांचे शाळेतील उत्कृष्ठ कार्य पाहून त्यांना न्युपा,नवी दिल्ली येथे शाळा सिद्धी कार्यक्रमाच्या राष्ट्रीय बैठकीसाठी महाराष्ट्रातून एकमेव शिक्षक म्हणून पाठविले गेले तसेच मुंबई येथे झालेल्या नवीन शैक्षणिक धोरण बैठक, अमरावती येथे झालेल्या अप्रगत विद्यार्थ्यांच्या केस स्टडी संदर्भातील चर्चासत्र ,विद्या परिषद पुणे येथे झालेली राज्यस्तरीय तंत्र्स्नेही शिक्षक बैठक अशा अनेक राष्ट्रीय व राज्यस्तरीय चर्चासत्रे व बैठकांना जाण्याची संधी मिळाली. या प्रत्येक ठिकाणी त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटविला. सतत नाविन्याचा ध्यास ठेवणे आणि नवोपक्रम राबवून विद्यार्थ्यांना नवनवीन ज्ञान मिळवून देणे हेच त्यांचे ब्रीद आहे. गायन,वादन,संगीत,चित्रकला,खेळ,तंत्रज्ञान अशा अनेक गोष्टीत पारंगत असणारे शिक्षक म्हणून त्यांची ओळख आहे.