गडावरील, गडीवरीवरील,वाड्यावरीलआणि वस्तीवरील
मराठा जातीचे मोर्चे संपल्यानंतर मराठा जात एकसंघ होऊ शकत नाही, मराठे गोळा होऊ शकतात पण एक होऊ शकत नाही असे विचार प्रत्येक चर्चेत, भाषणात मी ऐकत आलोय. एखाद्या व्यक्तीला आजारी पडला तर त्या आजाराची चिकित्सा केल्यावरच त्याला औषध दिले जाते, त्याच्या आजाराचे कारण न समजताच जर त्या व्यक्तीला औषध, ट्रिटमेंट दिली तर त्याचा आजार बरा होईलच असे नाही, तो वाढू पण शकतो किंवा त्यात त्या व्यक्तीचा अंत देखील होऊ शकतो.
असेच काही मराठा जातीचे झाले आहे असे मला वाटते. जोपर्यंत आपण मराठा जातीत निर्माण झालेल्या समस्यांची चिकित्सा करणार नाही तो पर्यंत प्रत्येक संघटना, पक्ष त्यांच्या भूमिकेप्रमाणे मराठा मोर्चाला डोस (वळण) देण्याचा प्रयन्त करतील, त्यात मराठा जातीचे हित नाही.
आपण मराठा जातीची चिकित्सा केल्यावर लक्षात येईल की मराठा जातीला, जातीत निर्माण झालेल्या वर्गांचे भान अजून आलेले नाही. जात ही धर्माने निर्माण केली आहे, तर वर्ग हे बाजारवादी अर्थव्यवस्थेने सत्ता, संपत्ती, संसाधने ह्यातून निर्माण झाले आहेत.
मराठा जातीत चार वर्ग निर्माण झाले आहेत.
1. गडावरील मराठे – म्हणजे ज्या मराठ्यांनी स्वतःचे पक्ष काढले आहेत किंवा राष्ट्रीय सत्तेत असणाऱ्या पक्षात ते स्ट्रॉंग आहेत. त्यांचे खासदार, आमदार असून सत्तेत त्यांची भागीदारी आहे. जगातील कॉर्पोरेट लॉबीशी त्यांचे हित संबंध आहेत, अश्या मराठ्यांची संख्या हाताच्या बोटावर मोजता येईल एवढी आहे.
2. गढी वरील मराठे – खासदारकी, आमदारकी, सहकार, कारखाने, उद्योग, शिक्षण संस्था, व्यवसाय सांभाळणारे आपल्या जिल्हा, तालुक्यातील सत्ता कंट्रोल करणारे व गडावरील मराठ्यांची चापलुसगिरी करणारे म्हणजे गढी वरील मराठे ह्यांची संख्या हजाराच्या आसपास असेल.
3. वाड्यावरील मराठे – गुत्तेदार, ठेकेदार, पेट्रोल पंप, जेसीबी, पोकलेन, वाळू, रॉकेल माफिया-व्यापारी जिल्हापरिषद, पंचायत समित्या, मार्केट कमिटी, सांभाळणारे छोट्या संस्था मध्ये अडकून गढी वरील मराठ्यांच्या दारात हजेरी लावणारे म्हणजे वाड्या वरील मराठे.
4. वाडी वस्तीवरील मराठे – स्वाभिमानासाठी, सन्मानासाठी आत्महत्या करणारे. आयुष्याची फरपट सहन करीत शेती, शेतमजुरी, हमाली, ऊसतोडणी, रोजंदारी करणारे; शिक्षण, नोकरी, सत्तेपासून दूर म्हणजे वाडी वस्तीवरील मराठे
खरा प्रॉब्लेम हा वाडी वस्तीवरील मराठ्यांचा आहे, वाड्यावरचे गढी वरच्यांची दलाली करतात, गढी वरचे गडावरील मराठ्यांची दलाली करतात गडावरील सर्वांचे शोषण विविध पद्धतीने करतात आणि वाडी वस्तीवरील मराठे आत्महत्या करतात.
मराठा जातीत निर्माण झालेला हे चार वर्ग कधीच एकत्रित येऊ शकत नाहीत, त्यामुळं मराठ्यांना एकत्रित करणे, एकसंघ करणे शक्य नाही.
त्यामुळे एकसंघ, एकत्रित करायचे असेल तर वाडी वस्तीवरील मराठ्यांना केलं पाहिजे.
वाडी वस्ती वरील मराठ्यानो एक व्हा असा नारा दिला पाहिजे आणि गावागावात फिरले पाहिजे, त्यासाठी त्याग व बलिदान देणारे कार्यकर्ते हवेत तेव्हा क्रांती होईल.