शेतकरी बांधवांनो नमस्कार. उत्तम शेती या संकेतस्थळावर आपले मनःपूर्वक हार्दिक स्वागत. द्राक्ष या नगदी फळ पिकाच्या उत्पादनात महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांनी लक्षणीय प्रगती केली आहे. देशातील एकूण 16 लक्ष टन द्राक्ष उत्पादनापैकी 11 लक्ष टन एवढा राज्याचा वाटा आहे. द्राक्ष फळ नाशवंत असल्याने त्वरित विक्री न झाल्यास प्रक्रिया करून बेदाणा करण्यास सुरुवात झाली. परंतु त्यालाही मर्यादा येऊ लागली. मागणी मर्यादित असल्याने शीतगृहात साठे पडून राहू लागले.
त्यामुळे बेदाणा पासून मिळणाऱ्या उत्पन्नात देखील घट झाली. अशा बिकट परिस्थितीत काही प्रगतिशील शेतकऱ्यांनी द्राक्षापासून वाइन तयार करण्यास सुरुवात केली. महाराष्ट्र राज्यातील द्राक्ष उत्पादनाचे प्रगती लक्षणीय आहे. द्राक्ष उत्पादकतेत महाराष्ट्र राज्य आघाडीवर आहे. द्राक्ष विक्री मधील वाढत्या समस्येमुळे देशांतर्गत बाजारपेठा, बेदाणा प्रक्रिया आणि निर्यात इत्यादी पर्यायही अपुरी पडल्यामुळे काही प्रगतिशील द्राक्ष बागायतदारांनी द्राक्षापासून वाईन तयार करण्याचा पर्याय पसंत केला.
महाराष्ट्र शासनाने ‘महाराष्ट्र द्राक्ष मद्यार्क प्रक्रिया उद्योग योजना 2001’जाहीर केले आहे. यानुसार द्राक्ष प्रक्रिया प्रकल्पाला औद्योगिक क्षेत्राच्या सुविधा/सवलती मिळतील:
- या प्रकल्पाचा लघुउद्योग समावेश असेल.
- द्राक्ष प्रक्रिया उद्योगाला पाच वर्षांसाठी अबकारी कर पूर्णपणे माफ असेल.
- विक्री करात सवलत असेल.* एक खिडकी योजनेत समावेश असेल.
- द्राक्षवाईन वरील उत्पादन व विक्रीसाठी परवाना पद्धतीचे सुलभीकरण असेल.
- वाईन उद्योगास अन्नप्रक्रिया उद्योगाचा दर्जा असेल. शेतकऱ्यांना प्रशिक्षणासाठी वाईन इन्स्टिट्यूट आणि निर्यात वाढीसाठी महाराष्ट्र द्राक्ष मंडळ यांची स्थापना करता येईल.
वाईन प्रकल्पासाठी महाराष्ट्र शासनाने कोणकोणत्या सवलती दिलेल्या आहेत…?
- द्राक्ष वायनरी चालू करण्यासाठी लागणारा परवाना आता जिल्हा पातळीवर जिल्हाधिकारी कचेरीत मिळण्याची सुविधा करण्यात आलेली आहे.
- वाईनचा समावेश आता लवकरात लवकर अन्न प्रक्रिया उद्योगात करण्यात येईल. त्यामुळे त्यावरील विक्रीकर 20 टक्क्यांवरून 4 टक्क्यांवर आणण्यात येईल.
- वाईन उत्पादनाचा उद्योग इतर देशी व विदेशी दारू पासून वेगळा करण्यात आला आहे. त्यामुळे त्यावरील एक्साईज 100% यांवरून 0 टक्क्यापर्यंत कमी करण्यात आला आहे.
- वाईन उत्पादकाला वाईनची विक्री करणे सोपे जावे म्हणून त्यांना दोन दुकानांचे विक्री परवाने देण्यात येतील.
- द्राक्ष बागायतदारांना स्वतःची वायनरी आपल्या शेतावर चालू करण्यास परवानगी मिळू शकेल. त्यासाठी त्या जागेचे बिगर शेतीमध्ये बदल करण्याची आवश्यकता आता लागणार नाही.
- लहान शेतकऱ्यांना स्वतःची वाइन उद्योग कमीत कमी खर्चात चालू करता यावे म्हणून ग्रामीण भागातील काही एमआयडीसीमध्ये वाईन पार्क सुरू करण्यात येतील. त्यासाठी तेथील काही भूखंड आरक्षित ठेवले जातील.
द्राक्ष वाईन प्रकल्प उभारण्यासाठी अर्जासोबत कोणकोणते कागदपत्र लागतात..?
द्राक्ष वाईन प्रकल्प निर्माण करण्याकरिता अर्जासोबत जोडावयाच्या कागदपत्रांची माहिती:
- बी आर ओ नमुन्यातील अर्ज.
- अर्जाचे शुल्क रुपये 500/- भरल्याचे चलन..
- उद्योग विभागाकडील प्रकल्प नोंदणी बाबतचा दाखला किंवा प्रमाणपत्र
- नियोजित प्रकल्पाचे नकाशे चार प्रतीत
- वाईन उत्पादन करण्याची प्रक्रिया पद्धती
- सार्वजनिक मर्यादित कंपनी असल्यास कंपनीचे मेमोरेंडम अँड आर्टिकल्स ऑफ असोसिएशन.
- भागीदार किंवा संचालकांची संपूर्ण नावे व पूर्ण पत्ते.
- प्रकल्प अहवाल यामध्ये कच्च्या मालाची उपलब्धता, पक्क्या मालाच्या विक्रीची सोय, विज, जमीन, पाणी यांच्या उपलब्धतेबाबतची माहिती, भांडवलाची आवश्यकता व ती उभारण्यासाठी केलेली व्यवस्था.
- प्रदूषण मंडळाचे ना हरकत प्रमाणपत्र.
- परदेशातील भांडवलाची गुंतवणूक होणार असल्यास केंद्र शासनाच्या संबंधित विभागाची मान्यता प्रमाणपत्र.
- प्रकल्प उभारण्यासाठी आवश्यक असलेल्या अन्य सरकारी विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र.