किनवट/माहूरच्या लाडक्या ‘भाया’ ची अकाली एक्झिट
ज्ञानेश्वर कऱ्हाळे,माहूर किनवट/माहुर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार प्रदीप हेमसिंग जाधव (नाईक) यांचे आज ता.१ जानेवारी रोजी पहाटे ५ वाजता हैदराबाद स्थित त्यांच्या निवासस्थानी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले.ते ७० वर्षांचे होते. प्रदीप नाईकांच्या पार्थिवावर उद्या ता.२ रोजी किनवट तालुक्यातील दहेली तांडा या त्यांच्या मूळ गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.त्यांच्या निधनामुळे राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे.किनवट विधानसभा मतदारसंघाचे ते २००४ पासून सलग तीन टर्म आमदार होते.
माजी आमदार प्रदीप नाईक यांची प्रकृती बऱ्यापैकी ठणठणीत होती, निवडणुकीत पराभव झाल्या नंतर त्यांनी किनवट आणि माहूर तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या व कार्यकर्त्यांना निवडणुकीत झालेल्या पराभवाच्या धक्क्यातून बाहेर निघा आणि जनतेच्या कामांमध्ये हलगर्जीपणा करू नका, ‘जिवंत राहिलो तर पुन्हा लढूत’ असा हौसला नाईकांनी कार्यकर्त्यांना देऊन या आठवड्यात शुक्रवारला ते हैदराबाद साठी रवाना झाले. दरम्यान ते आज हैदराबाद वरून चेन्नईला जाणार होते, तोच पहाटे काळाने घाला घातला झोपेतच असताना अंदाजे ५ वाजता हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचे दुःखद निधन झाले.दरम्यान या घटनेमुळे किनवट माहूर तालुक्यातील बंजारा समाजासोबतच इतर अठरा पगड जातींचे नेतृत्व म्हणून परिचित असलेल्या प्रदीप नाईक उर्फ ‘भाया’ यांच्या अनःपेक्षीत निधनाने दोन्ही तालुक्यावर शोककळा पसरली असून संयमी, आझाद शत्रू व्यक्तिमत्व व दुरदृष्टीचा नेता हरवल्याची भावना जनतेतून व्यक्त होत आहे.
माजी आमदार प्रदीप नाईक यांच्या निधनामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (पक्ष शरद पवार)चे मराठवाड्यातील खंबीर नेतृत्व हरवल्याची भावना व्यक्त होतं आहे.नाईकांच्या निधनाची बातमी कळताचा सर्वांना एकच धक्का बसला. राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा खा.शरद पवार, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार,खासदार सुप्रियाताई सुळे,प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, नांदेडचे खासदार अशोकराव चव्हाण, किनवटचे आमदार भीमराव केराम,आमदार रोहित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार),राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार),काँग्रेस,भाजपा,शिवसेना आदीसह सर्वच राजकीय नेत्यांनी त्यांच्या निधनावर समाज माध्यमाद्वारे दु:ख व्यक्त केलंय.
◼️उद्या मूळ गावी होणार अंतिम संस्कार
राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाचे माजी आमदार प्रदिप नाईक यांचा आज पहाटे हैद्राबाद येथे त्यांच्या घरी झोपेत हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले असून त्यांच्या पार्थिवावर उद्या ता.२ जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजता त्यांच्या मुळ गावी किनवट तालुक्यातील दहेली तांडा येथे शासकीय इतमामात अंतिम संस्कार होणार असल्याचे कुटुंबियांकडून सांगण्यात आले आहे.
◼️राजकीय क्षेत्रातील मान्यवरांच्या प्रतिक्रिया…
◼️पक्षाचे माजी आमदार प्रदीप नाईक यांच्या निधनाची दुःखद बातमी समजली.नांदेड जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासात नाईक यांचे योगदान फार मोठे आहे.जिल्ह्यात जलक्रांती घडवून आणत त्यांनी शेतकऱ्यांना समृद्ध केले. प्रदीप नाईक यांच्या रूपाने एक दूरदृष्टी असलेला नेता आज काळाच्या पडद्याआड गेला आहे.नाईक कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत,भावपूर्ण श्रद्धांजली!
खा.शरद पवार,
अध्यक्ष,राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार)
◼️किनवटचे माजी आमदार प्रदीप नाईक यांच्या निधनानं धडाडीचा लोकप्रतिनिधी, कर्तव्यनिष्ठ लोकसेवक हरपला आहे.त्यांच्या निधनानं किनवटच्या सामाजिक जीवनाशी घट्ट नाळ जुळलेलं व्यक्तिमत्त्व हरपलं आहे. किनवट विधानसभा मतदार संघाच्या विकासात त्यांनी दिलेलं योगदान कायम स्मरणात राहील.दिवंगत प्रदीप नाईक यांच्या कुटुंबियांच्या,सहकाऱ्यांच्या,कार्यकर्त्यांच्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी असून मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो.
अजित दादा पवार,
उपमुख्यमंत्री,महाराष्ट्र राज्य.
◼️किनवट विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रदीप नाईक यांच्या निधनाची बातमी अतिशय दुःखद आहे. या कठीण प्रसंगात आम्ही सर्वजण नाईक कुटुंबियांसोबत आहोत.भावपूर्ण श्रद्धांजली.
खा.सुप्रियाताई सुळे,बारामती.
◼️नांदेड जिल्ह्यातील किनवट विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार प्रदीप नाईक यांच्या निधनाची बातमी अतिशय दुःखद आहे. मा.आ. प्रदीप नाईक पक्षाच्या कठीण काळात पक्षाशी एकनिष्ठ राहिले व नेहमी आपला पक्ष कसा अजून मजबूत होईल याबाबत प्रयत्न केले.नाईक परिवाराच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. भावपूर्ण श्रद्धांजली.
आ.जयंत पाटील,
प्रदेशाध्यक्ष,राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद चंद्र पवार)
◼️किनवटचे माजी आमदार प्रदीप नाईक यांच्या निधनाची बातमी अतिशय दुःखद आहे. विधीमंडळात आम्ही सहकारी होतो.नांदेड जिल्ह्याच्या विकासासंदर्भात आम्ही एकत्र काम केले.त्यांचे अकस्मात निधन धक्कादायक आहे. माजी आमदार प्रदीप नाईक यांना भावपूर्ण श्रद्धांजली.त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे.
अशोकराव चव्हाण,खासदार,नांदेड.
◼️किनवटचे माजी आमदार प्रदीप नाईक यांच्या निधनाचं वृत्त अत्यंत दुःखद आहे. त्यांच्या माध्यमातून एक कर्तव्यनिष्ठ लोकसेवक हरपला आहे.किनवट विधानसभा मतदारसंघाच्या विकासात त्यांनी दिलेलं योगदान कायम स्मरणात राहील.त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत!
भावपूर्ण श्रद्धांजली!
आ.रोहित पवार,राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार)
◼️एकमेकांचे राजकीय विरोधक असतांनाही आम्ही दोघांनी टिकवून ठेवलेल्या मैत्रीचा आज तारा निखळला!मी नाईक परिवाराच्या दूख:त सहभागी असून ईश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती देवो हीच प्रार्थना,माझे मित्र स्व.प्रदिपजी नाईक यांना माझ्या कडून भावपूर्ण श्रद्धांजली.
आ.भीमराव केराम,
किनवट, विधानसभा मतदारसंघ
राजकारणात राजकारणा पलीकडे जाऊन माझ्यावर माझ्यावर पुत्रवत प्रेम करणारे नाईक साहेबां संदर्भात अविश्वासनीय निरोप आल्यानंतर कसं व्यक्त होऊ हेच कळत नाही.माझं देव हरवला,आम्ही पोरके झालो, राजकारणात संयमाचे मूल्य काय असते हे बोट धरून शिकवणारे नाईक साहेब आपल्यात नाही या गोष्टीवर विश्वास बसत नाही.