मुंबई, दि. 13 :- सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी आणि चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर येथे अपर जिल्हाधिकारी कार्यालय स्थापन करण्यात येणार असून शासकीय काम अधिक गतिमान होणार असल्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सांगितले. Establishment of new Additional Collector Offices at Shirdi and Chimur; Strengthening of District Administration
शिर्डी आणि चिमूर येथे नवे अपर जिल्हाधिकारी कार्यालय स्थापन करण्याबाबतचा अतिशय महत्त्वाचा ठराव आज मंत्रिमंडळ बैठकीत एकमताने मंजूर करण्यात आल्याची माहिती महसूल मंत्री श्री.विखे पाटील यांनी दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे त्यांनी आभार मानले आहेत. Establishment of new Additional Collector Offices at Shirdi and Chimur; Strengthening of District Administration
जिल्हा प्रशासनाचे बळकटीकरण करण्याच्या तसेच शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी व चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर येथे येथे स्वतंत्र अपर जिल्हाधिकारी कार्यालय स्थापन करणेबाबतचा प्रस्ताव महसूल मंत्री श्री.विखे-पाटील यांनी मंत्रिमंडळ बैठकीत मांडला.
अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी येथील अपर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात कोपरगाव, राहाता, श्रीरामपूर संगमनेर, अकोले व राहूरी या तालुक्यांचा समावेश असणार आहे. तसेच उच्चस्तरीय सचिव समितीने या कार्यालयासाठी अपर जिल्हाधिकारी, नायब तहसिलदार व लघुलेखक (निम्नश्रेणी) अशा नव्याने निर्माण करण्यात आलेल्या प्रत्येकी एका पदास आणि अव्वल कारकुनाचे एक पद व लिपिक टंकलेखकाची दोन पदे या अतिरिक्त 3 नवीन अशा एकूण 6 पदांनाही आज मान्यता देण्यात आली. या निर्णयामुळे शिर्डी कार्यक्षेत्रातील सर्वसामान्य नागरिकांना शासकीय कामकाजासाठी स्वतंत्र जिल्हाधिकारी कार्यालय लवकरच उपलब्ध होणार असल्याचे श्री.विखे पाटील यांनी सांगितले.
तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर येथे अपर जिल्हाधिकारी कार्यालय स्थापन करण्यासाठी यापूर्वी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार कार्यालय कार्यान्वित करण्यास मान्यता दिली आहे. या कार्यालयासाठी मंजूर 6 नियमित पदांपैकी अपर जिल्हाधिकारी विशिष्ट वेतनश्रेणीतील एका पदास मंत्रिमंडळ मान्यता देण्यात आल्याचे श्री.विखे- पाटील यांनी सांगितले.