Black Fungus | म्युकर मायकोसिसचे हे आहेत लक्षण, वेळीच उपचार घेतल्यास धोका कमी – डॉ. संजय मंठाळे यांचे मत (कान, नाक, घसा तज्ज्ञ)

सध्या कोविड-19 च्या आजारातून बरे झालेल्या रूग्णांना म्युकर मायकोसिसचा धोका निर्माण झाला आहे. हा आजार रोगप्रतिकार शक्ती कमी झालेल्या रूग्णांमध्ये आढळतो, मात्र वेळीच उपचार घेतल्यास म्युकर मायकोसिसचा धोका कमी असल्याचे मत कान, नाक, घसा तज्ज्ञ डॉ. संजय मंठाळे यांनी व्यक्त केले.

कोरोना संसर्गाबरोबरच म्युकर मायकोसिस आजाराने रुग्णांच्या चिंतेत आणखीच भर टाकली आहे. प्रामुख्याने हा आजार कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांत फैलावत असल्याचे आढळून येत आहे. हे एक फंगल इन्फेक्शन असून ते साधारणपणे नाक किंवा सायनसच्या माध्यमातून शरीरात प्रवेश करते. कोरोनातून बरे झालेल्या रूग्णांना हा आजार दोन ते सहा आठवड्यापर्यंत होऊ शकतो. म्हणून कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांनी आणखी काही दिवस काळजी घेणे गरजेचे आहे. वेळीच उपचार केले नसल्यास रूग्ण दगावण्याची शक्यता 50 टक्के असल्याचेही डॉ. मंठाळे यांनी सांगितले.

कोरोना रूग्णांनी सकस आहार घ्यावा, कोवळ्या उन्हात थांबावे, व्यायाम, प्राणायम करावेत. पाणी भरपूर प्रमाणात प्यावे आणि सर्दी होणार असे पदार्थ खाणे टाळावे. मुबलक सूर्यप्रकाश आणि खेळती हवा असलेल्या ठिकाणी रहावे, असेही डॉ. मंठाळे यांनी सांगितले. मधुमेह रूग्णांनी काळजी घेणे आवश्यक आहे.

आजाराची लक्षणे

· नाक बंद पडणे, नाक गळणे, लालसर किंवा काळा स्त्राव येणे.

· गालावर सूज येणे, बधीरपणा येणे.

· तीव्र डोकेदुखी.

· वरच्या जबड्यातील दात हलणे, जबड्यातील दात पडून पू येणे.

· वरच्या जबड्याच्या टाळूला किंवा वरच्या भागाला छिद्र पडणे.

· जबड्याची टाळू व नाकातील त्वचेचा रंग काळसर होणे.

· नाकाच्या भागाला काळसर ठिपके पडणे.

· डोळ्याच्या आजूबाजूला, सायनसच्या आजूबाजूचा भाग सुजणे.

वरील लक्षणे आढळल्यास त्वरित कान नाक घसा तज्ञ, नेत्र तज्ञ, दातांचे डॉक्टर, किंवा फॅमिली डॉक्टरना लवकरात लवकर दाखवून उपचार घ्यावेत.

प्रतिबंधक उपाय

· डॉक्टरांनी दिलेले औषधोपचार नियमित घेणे.

· रक्तातील साखरेचे प्रमाण तपासून नियंत्रणात असल्याची खात्री करावी.

· डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार नाकात बेटाकीन्ड रेडी 0.5 टक्के सोल्यूशनचे (पोविडन-आयोडिन) दोन ते तीन थेंब दिवसातून तीन-चार वेळा टाकावे.

· बेटाकीन्ड रेडी नाकात टाकण्यापूर्वी सोल्सप्रे नसल स्प्रे किंवा नॅसोमिस्ट नसल ड्रॉप्स नाकात टाकावे.

· बेटाकीन्ड रेडी किंवा बेटाडिन ओरल सोल्यूशनने दिवसातून दोनवेळा गुळण्या करणे.

. बाहेर जाऊन आल्यास वाफ घेणे.

· माती आणि धुळीच्या थेट संपर्कात येऊ नये. कोरोनानंतर सुरू असणारी स्टिरॉइड्स, इम्युनिती सप्रेसंटची औषधे चालू असे पर्यंत मातीकाम, बागकाम टाळावे.

· शेत, बगिचा किंवा बांधकामाच्या ठिकाणी संपूर्ण शरीर झाकले जाईल, असे कपडे घालणे.

· त्वचेवर जखम असेल तर साबण आणि पाण्याने स्वच्छ करावे.

· मास्कचा नियमित वापर करावा. एकच मास्क जास्त दिवस वापरू नये.

· घरात बुरशी जमा होणार नाही याची काळजी घ्यावी.

· वास येणारे, खराब अन्न टाकून द्यावे. शिळे अन्न। खाणे शक्यतो टाळावे.

Leave a Comment

error: लेख Copy Peast करण्यापेक्षा Share करा. News Maharashtra Voice