हिंदुराष्ट्र आणि कोलॅटरल डॅमेज, अविवेकी निर्णयक्षमतेमुळे राष्ट्र अर्थिक दारिद्रयच्या खाईत.

कोलॅटरल डॅमेज म्हणजे अनुषंगिक हानी. शत्रुसैनिकांवर हल्ला केला असताना कधी कधी सैनिक नसलेल्यांची देखील हत्या होते, त्याला अनुषंगिक हानी असं म्हणतात. म्हणजे हिरोशिमा आणि नागासाकी या दोन जपानी शहरांवर अमेरिकेने अणुबॉम्ब टाकले आणि तिथले लाखो रहिवासी ठार झाले, जे वाचले ते कायमचे जायबंदी झाले आणि तिथल्या नंतरच्या पिढ्यासुद्धा व्यंग असलेल्या निपजल्या. पण अणुबॉम्ब टाकल्यावर जपानने तात्काळ शरणागती जाहीर केली आणि दुसरं महायुद्ध संपुष्टात आलं. एक महायुद्ध संपवण्यासाठी, म्हणजेच ते चालू राहून पुढे होणारी हानी टाळण्यासाठी अणुबॉम्ब टाकावे लागले. त्यात अपरिहार्यपणे काही निष्पाप जिवांना शिक्षा झाली. त्या शिक्षेला म्हणायचं कोलॅटरल डॅमेज. अनुषंगिक हानी.

आता हिंदू राष्ट्र बनवायचे आहे म्हणजे नेमके काय करायचे ? तर जसे पाकिस्तान हे फक्त मुस्लिमांचे राष्ट्र आहे असे बनवायचे आहे. की ज्या राष्ट्रात हिंदूंचा आद्यपुरुष मनु याने तयार केलेली जाती वर्ण व्यवस्था १००% राबवायची आहे. की वेद, धर्म शास्त्र, होमहवन, कर्मकांड, चमत्कार, साक्षात्कार, पुजा अर्चा, अंधश्रद्धा, चालीरीती, जुन्या परंपरा यांनाच मान्यता देणारे अन असे मानणारे राष्ट्र निर्माण करायचे आहे. अशी भावना निर्माण झाली आहे.

आता सध्या कोविडमुळे आपल्या देशवासियांना जे भोगावं लागत आहे, त्याला सुद्धा एक प्रकारचं कोलॅटरल डॅमेज मानायला हवं. हिंदुराष्ट्र स्थापन व्हायचं असेल, तर असली अनुषंगिक हानी सहन करणं भाग आहे, असं एकूणच सध्याच्या राज्यकर्त्यांचं म्हणणं असावं असं दिसतं.

पण असं म्हणून सोडून देता येणार नाही. थोडं विस्ताराने सांगावं लागेल.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नायट्रोजनचं रूपांतर ऑक्सिजनमध्ये करण्याचा मार्ग शोधून काढण्याचं आवाहन आस्त्रज्ञांना केलं.

गटारात निर्माण होणाऱ्या गॅसचा वापर करून गटाराशेजारी चहा बनवणाऱ्याची कथा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्णन केली.

पवित्र गंगा नदीत डुबकी मारणाऱ्यांना कोविड होणार नाही, असा विश्वास उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंग रावत यांनी व्यक्त केला.

गाईच्या शेणाचा लेप किरणात्सर्ग थोपवू शकतो, असं आणखी कोणी केंद्रीय मंत्री म्हणाला.

मोराच्या अश्रूंपासून लांडोर गर्भवती होते, असं आणखी कोणी म्हणालं.

जगातील सगळ्यात पहिली सर्जरी ही गणपतीवर करण्यात आली होती असं पंतप्रधानांनी शास्त्रज्ञांच्या सभेत सांगणे अन् त्याला क्षणिक का होईना मान्यता देणे.

अशी मतं असणारे, असं खरोखरच वाटणारे समाजात पूर्वीपासून आहेत. पण पूर्वी त्यांना कोणी विचारत नसे. त्यांच्या मताला किंमत देत नसे. परंतु आता स्थिती बदलली आहे. अशी मनोभूमिका असलेले आता सत्तेच्या, अधिकाराच्या जागी बसले आहेत. त्यांच्या तोंडचे असे आणखी शंभर उद्गार सापडतील. ज्यांनी हे उद्गार काढले, त्यांना विनोदनिर्मिती करायची नव्हती. पूर्ण शुद्धीत राहून, स्वत:च्या शब्दांची जबाबदारी घेत एकेक जण हे म्हणाला आहे.

याला मोडीत काढता येणार नाही. कारण हे उद्गार काढणारे सर्व लोक आज देश चालवत आहेत. लोकांच्या जगण्याविषयीचे मोठमोठे निर्णय घेत आहेत. त्यांचे आदेश देशभरातली नोकरशाही मुकाट पाळत आहे. आणि त्यांना दुखावणारा एक शब्द काढण्याची हिंमत पत्रकार, सुज्ञ, शिक्षित, व्यासंगी, तज्ञ, वैज्ञानिक मीडिया तसेच मनोरंजन उद्योगातल्या बहुतेकांना होत नाही आहे. त्यांच्या हातात देशाची सूत्रं आहेत आणि देशवासियांना कुठे घेऊन जायचं, हे तेच ठरवत आहेत. म्हणून अशा उद्गारांचा काहीतरी खोल अर्थ, अन्वय लावणं भाग आहे.

एक गोष्ट स्पष्ट जाणवते की या सर्वांना विज्ञानाविषयी, आधुनिक तंत्रज्ञानाविषयी तुच्छतेची भावना आहे. विज्ञानाची समाजमनात पिढ्यानपिढ्या मुरलेली अशी एक परंपरा असते, साखळी-संस्कृती असते आणि या संस्कृतीमधूनच वैज्ञानिक तयार होतात, नवनवे शोध लागतात, हे त्यांना माहीत नाही असे नाही तर असं विज्ञान अन् शोध मान्यच नाही. त्यांच्या मते एक शास्त्रज्ञ त्याच्या जागेवर बसून विचार करतो, चिंतन करतो आणि त्याच्यासमोर लहानमोठे शोध प्रकट होतात.

त्याच्या पुढची गोष्ट अशी की अशा विचारात, चिंतनात जर मिनिटं-तास-दिवस यांच्याऐवजी वर्षं घालवली, तर अचाट शोध लागू शकतात आणि विज्ञान तोंडात बोट घालेल, असं सामर्थ्य मिळवता येतं असंही ते मानतात. उदाहरणार्थ, आपले प्राचीन ऋषिपूर्वज. त्यांच्यापाशी वर-शाप देण्याचं, नदीत धुकं पसरवून सोबतच्या यौवनसुंदरीला कस्तुरीचा सुगंध बहाल करण्याचं किंवा थेट प्रतिसृष्टीच निर्माण करण्याचं जे तप:सामर्थ्य होतं, ते त्यांनी याच पद्धतीने प्राप्त केलं होतं. तसले ऋषी आज समाजात दिसत नसले, तरी त्यांचा अंश मानता येईल असे साधू, तपस्वी, साधक आहेत आणि त्यांच्यापाशी त्याच प्रकारच्या दिव्य शक्तीचा अंश आहे.

वेगळ्या शब्दांत सांगायचं तर वर्तमानकाळातल्या विज्ञानाला क:पदार्थ मानत असताना या लोकांना आपल्या प्राचीन, पौराणिक परंपरेचा विलक्षण अभिमान – नव्हे गर्व – वाटतो. इतकंच नाही, त्या प्राचीन काळची दिव्य शक्ती आजही वातावरणात, अंतराळात, अगदी आत्म्या परमात्म्यात कुठेतरी सुप्तपणे वावरते आहे आणि तिला योग्य प्रकारे आवाहन केल्यास ती हस्तगत होऊ शकते, असा त्यांचा गाढ विश्वास आहे.

म्हणून भाजपच्या नावाने राज्य करणारे सध्याचे राज्यकर्ते यज्ञाला प्रोत्साहन देतात, पूजापाठ करतात करवतात, मंत्रांचा घोष करतात. सरकारी कामात सरकारी पैशाने होमहवन करतात आणि होय, कुंभमेळ्याला आडकाठी करत नाहीत. तर चार तासांची सूचना देऊन देशव्यापी लॉकडाऊनचा निर्णय किंवा ८५ टक्के चलनाचं रूपांतर एका फटक्यात ‘कागजके टुकडे’ मध्ये करण्याचा निर्णय घेणं एक वेळ सोपं आहे; त्या निर्णयांचा परिणाम म्हणून लाखो देशबांधवांना भोगाव्या लागलेल्या हालअपेष्टा एक वेळ बिनमहत्त्वाच्या ठरवता येतील; पण कुंभमेळा थांबवण्याचा निर्णय महाकठीण आहे. म्हणून मोदीजींनी तिथल्या साधूंना नम्रपणे विनंती फक्त केली की पुढील स्नान प्रत्यक्ष नव्हे, तर सांकेतिक करावं. परंपरेला, संस्कृतीला, साधूंपाशी असलेल्या संभाव्य ज्ञानसंचिताला धुडकावून कुंभमेळा तडकाफडकी थांबवण्याचा निर्णय घेतला नाही.

काही विश्लेषकांना वाटतं, मोदीजी किंवा त्यांचे सहकारी असं वागतात, बोलतात कारण देशातला, विशेषत: उत्तरेतला श्रद्धाळू हिंदू त्यांचा खंदा पाठीराखा आहे, मतदार आहे आणि त्याच्या संवेदनशीलतेला चुचकारणं त्यांना भाग आहे. पण मला खात्री आहे की भाजप आणि भाजपची मातृसंघटना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांची मनोधारणाच तशी आहे. त्यांच्या वागण्याबोलण्यात दुटप्पीपणा नाही, सुसंगती आहे. कोविडचा झंझावात होरपळून टाकत असताना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गाय-हेल्पलाइन सुरू करून राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात खास गायींसाठी ऑक्सिमीटर, थर्मल स्कॅनर उपलब्ध करून देण्याचा आदेश काढला आहे. कारण त्यांना खरंच विश्वास वाटतो की गोमातेची कृपा झाली, तर या अस्मानी संकटाचं निवारण होऊ शकतं. त्याकरता ऑक्सिजन सिलिंडर, आयसीयू बेड यांच्यासाठी धावाधाव करण्याची गरज नाही. मला तर असंसुद्धा वाटतं की कोरोनाला शरण आणण्यासाठी अनुष्ठानं, यज्ञ, अभिषेक, वगैरेंसारख्या जालीम उपाययोजना एव्हाना उत्तर प्रदेश, उत्तराखंड मध्ये कुठे कुठे होतही असतील.

वरिष्ठ नेत्यांना बाजूला सारून उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी प्रशासनाचा शून्य अनुभव असलेल्या योगी आदित्यनाथ यांची निवड झाली कारण त्यांना विज्ञानाची किती माहिती आहे, ते देशाच्या घटनेला किती मान देतात, कायदा आणि सुव्यवस्था यांबद्दलची त्यांची मतं काय आहेत, या सगळ्यापेक्षा ते हिंदुराष्ट्राची संकल्पना प्रत्यक्षात उतरवून दाखवू शकतात, हेच भाजपच्या सर्वोच्च नेत्यांना जास्त महत्त्वाचं वाटलं. म्हणूनच मोदींनंतरचे राष्ट्रप्रमुख म्हणून त्यांचं नाव घेतलं जातं.

हिंदुराष्ट्र म्हणजे नेमकं काय ? याचाही शोध घ्यायला हवा. म्हणून कोलॅटरल डॅमेज जाणिवपूर्वक केले जात आहे काय ? की होतच राहील. हे सुज्ञानीं पहाणे महत्त्वाचे आहे.

<

Related posts

Leave a Comment