शैक्षणिक दबावाचा बळी! नीट चाचणीत कमी गुण पडल्याने वडिलांनी मारहाण केली; बारावीची हुशार विद्यार्थिनी साधना भोसले हिचा मृत्यू
Sangli Tragedy: 12th-Grade Girl Dies After Beating by Father Over NEET Mock Test Scores
सांगली जिल्ह्यातील नेलकरंजी गावात बारावीच्या विद्यार्थिनीचा नीट चाचणीत कमी गुण मिळाल्याने पित्याच्या मारहाणीमुळे मृत्यू झाला. मृत विद्यार्थिनी साधना भोसले ही डॉक्टर होण्याचं स्वप्न बाळगणारी हुशार मुलगी होती. आरोपी वडील धोंडीराम भोसले हे शाळेचे मुख्याध्यापक असून त्यांना अटक करण्यात आली आहे. ही घटना शैक्षणिक दबाव आणि पालकांच्या अवास्तव अपेक्षांचं भयावह उदाहरण ठरत आहे. वाचा संपूर्ण बातमी ‘न्यूज महाराष्ट्र व्हाईस’ वर.
नेलकरंजी (ता. आटपाडी, जि. सांगली): बारावीत शिकणाऱ्या हुशार विद्यार्थिनीचा फक्त चाचणी परीक्षेत कमी गुण मिळाल्याने जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना आटपाडी तालुक्यातील नेलकरंजी गावात घडली आहे. साधना भोसले (वय १७) ही विज्ञान शाखेची बारावीची विद्यार्थिनी तिच्या डॉक्टर होण्याच्या स्वप्नासाठी मेहनत घेत होती. मात्र नीटच्या चाचणी परीक्षेत अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्याच्या रागातून तिच्या वडिलांनीच तिला लाकडी खुंट्याने बेदम मारहाण केली. या अमानुष मारहाणीमुळे साधना गंभीर जखमी होऊन तिचा मृत्यू झाला.
ही हृदयद्रावक घटना शुक्रवारी (२० जून २०२५) रात्री ९:३० च्या सुमारास घडली. मृत विद्यार्थिनीच्या वडिलांचे नाव धोंडीराम भोसले असून ते स्वतः एका खाजगी माध्यमिक शाळेत मुख्याध्यापक आहेत. साधनाच्या आई प्रीती भोसले यांनी आटपाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केल्यानंतर रविवारी (२२ जून) पोलिसांनी धोंडीराम भोसले यांना अटक केली. साधना ही अतिशय अभ्यासू होती. दहावीला ९५ टक्के गुण मिळवले होते. नीट परीक्षेत उत्तम गुण मिळवून डॉक्टर होण्याचे तिचे स्वप्न होते. मात्र एका चाचणी परीक्षेतील कमी गुणांमुळे तिच्यावर तिच्याच वडिलांनी क्रूरतेने हात उचलला.
विशेष म्हणजे मारहाणीच्या दुसऱ्या दिवशी धोंडीराम यांनी साधनाला रुग्णालयात नेण्याऐवजी स्वतः शाळेत जाऊन योगदिन साजरा केला. घरी परतल्यावर साधना बेशुद्ध अवस्थेत आढळली. तिला रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता.
या प्रकारामुळे नेलकरंजी गावात आणि संपूर्ण तालुक्यात शोककळा पसरली आहे. शैक्षणिक क्षेत्रात मुलांवर वाढत चाललेला मानसिक ताण, पालकांची अवास्तव अपेक्षा आणि त्यांच्या जबरदस्तीनं उचललेले टोकाचे पावले यावर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पोलिसांनी घटनेचा सखोल तपास सुरू केला असून आरोपी वडिलांवर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जात आहे.
– न्यूज महाराष्ट्र व्हाईस