माहुर पाचुंदा गावात दोन शेतकरी महिलांची निर्घृण हत्या! परिसरात खळबळ
wo Farmer Women Brutally Murdered in Pahuchunda Village; Local Area Stunned
माहूर प्रतिनिधी :- (ज्ञानेश्वर कराळे) नांदेड, महाराष्ट्र. माहूर तालुक्यातील पाचुंदा येथे दोन शेतकरी महिलांची गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शेतात कामासाठी गेलेल्या या महिला सायंकाळपर्यंत घरी परतल्या नाहीत, म्हणून कुटुंबीयांनी शेतात धाव घेतली असता हा प्रकार उघडकीस आला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दागिन्यांसाठी हत्या केल्याचा संशय
मृत महिलांची नावे अंतकला अशोक आढागळे (वय ५५) आणि अनुसयाबाई साहेबराव आढागळे (वय ५०) अशी आहेत. या दोघी दुपारी दोन ते तीन वाजेदरम्यान शेतात काम करत असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या अंगावरील दागिने काढून घेण्यासाठी त्यांची गळा दाबून हत्या केल्याचे प्राथमिक तपासात दिसून येत आहे. ही घटना लूटमारीच्या उद्देशाने घडल्याचा संशय व्यक्त होत आहे.
पोलीस ताफा घटनास्थळी दाखल
घटनेची माहिती मिळताच माहूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक देविदास चोपडे यांनी तात्काळ पोलीस ताफ्यासह घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामा केला. पोलीस निरीक्षक चोपडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही मृत महिलांचे शिव विच्छेदन (पोस्टमॉर्टम) माहूर ग्रामीण रुग्णालय येथे होणार आहे.
चोरट्यांच्या शोधासाठी पोलिसांचे तपासचक्र सुरू
या दुहेरी हत्याकांडामुळे पाचुंदा आणि आजूबाजूच्या परिसरात दहशतीचे वातावरण आहे. पोलीस निरीक्षक चोपडे यांनी सांगितले की, या अज्ञात चोरट्यांना आणि मारेकऱ्यांना शोधण्यासाठी पोलीस यंत्रणेचे तपासचक्र सुरू झाले आहे. पोलिसांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे आणि लवकरच आरोपींना पकडण्यात येईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.
या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

