कोळवाडी गावात “एक गाव, एक दिशा” स्नेहमिलन कार्यक्रम उत्साहात संपन्न
कोळवाडी, 22 ऑक्टोबर 2025: कोळवाडी गावात “एक गाव, एक दिशा” या संकल्पने अंतर्गत आयोजित स्नेहमिलन व विचारमंथन कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. गावातील मान्यवर, शिक्षक, पालक, तरुण आणि विद्यार्थ्यांनी एकत्र येत गावाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आणि सामाजिक ऐक्यासाठी कृतीशील पावले उचलण्याचा निर्धार व्यक्त केला.
यावेळी गावातील विविध परीक्षांमध्ये प्राविण्य मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करुन गुणगौरव करण्याचा आला. तसेच गावातील जे तरुण शासकीय व खाजगी सेवेत विविध स्पर्धा परीक्षा देऊन विविध पदावर नोकरीला लागले असे मुलांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी गुणगौरव व सत्कार सोहळ्यास गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमातील ठळक मुद्दे
पायाभूत सुविधांचा विकास: गावातील रस्ते आणि मूलभूत सुविधा सुधारण्यावर भर देण्यात आला. सुस्थित रस्ते शिक्षण, व्यापार आणि शेतीला चालना देतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
शिक्षणाचा दर्जा: शिक्षण हे प्रगतीचे मूळ आहे. शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांनी शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी एकत्रित प्रयत्न करण्याची प्रतिज्ञा घेतली.
स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन: तरुणांना सरकारी सेवेत प्रवेश आणि स्पर्धा परीक्षांसाठी गावातच मार्गदर्शन केंद्र सुरू करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला.
सोशल मीडियाचा विधायक वापर: सोशल मीडियाचा उपयोग शिक्षण, शेती आणि रोजगार संधींसाठी करावा, असे आवाहन तरुणांना करण्यात आले.
हवामान केंद्र: शेतकऱ्यांना वैज्ञानिक शेतीसाठी पावसाचे आणि तापमानाचे अचूक भाकीत मिळावे यासाठी गावात हवामान केंद्र स्थापन करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला.
शेतजमिनींची डिजिटल मोजणी: जमिनीच्या वादविवादांना आळा घालण्यासाठी पारदर्शक आणि डिजिटल पद्धतीने शेतजमिनींची मोजणी करण्याचा निर्णय घेण्यात आला.
शिष्यवृत्ती योजना: आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गुणवान विद्यार्थ्यांसाठी गावकऱ्यांच्या वर्गणीतून शिष्यवृत्ती योजना राबविण्याचा ठराव मंजूर झाला.
मुलींचे सक्षमीकरण: मुलींच्या शिक्षणाला आणि सामाजिक सहभागाला प्रोत्साहन देण्यावर भर देण्यात आला. “एक शिक्षित मुलगी म्हणजे दोन कुटुंबांचा विकास” हा संदेश कार्यक्रमाचा भावनिक केंद्रबिंदू ठरला.
सामूहिक विमा योजना: नैसर्गिक आपत्ती, अपघात किंवा आजारपणाच्या संकटात गावकऱ्यांना आर्थिक सुरक्षा मिळावी यासाठी संपूर्ण गावासाठी सामूहिक विमा योजना राबविण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला.
फळबाग लागवड: पारंपरिक शेतीबरोबरच फळबाग लागवडीला प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेण्यात आला. सहकार आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून फळबागीचे क्लस्टर विकसित करण्यावर सर्वांचे एकमत झाले.
कार्यक्रमाचा संदेश
या स्नेहमिलनाने गावकऱ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण केले. शिक्षण, एकोपा, पारदर्शकता, सामाजिक सुरक्षा आणि नवशेती हे गावाच्या प्रगतीचे पाच स्तंभ असल्याचा ठाम संदेश या कार्यक्रमातून मिळाला. प्रत्येक विद्यार्थी हा गावाचे भविष्य असून, पालक हे त्याचे आधारस्तंभ आहेत, अशी भावना व्यक्त करण्यात आली.
पुढील दिशा
कोळवाडी गावाने या कार्यक्रमातून “आदर्श विकासाचे केंद्र” बनण्याचा संकल्प केला आहे. सर्वांनी एकत्रितपणे काम केल्यास कोळवाडी गाव राज्यभर आदर्श गाव म्हणून ओळखले जाईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
महाराष्ट्र व्हॉईस, कोळवाडी संवाददाता

