निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचा उपक्रम
“निसर्गाचे पर्यावरण धोक्यात आले आहे. उष्णतेने सर्वोच्च तापमान गाठल्याने उष्माघाताने मानवाचे जीवनमान धोक्यात आले आहे.” असे प्रतिपादन निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे अध्यक्ष श्री प्रमोद मोरे यांनी नारायणगाव (ता. जुन्नर) येथील खांडगे आणि कारखिले यांच्या लग्न समारंभात व्यक्त केले. अशा पर्यावरण पूरक विवाहाची भविष्यात गरज आहे व अशा प्रकारच्या विवाहाचे समाजाने अनुकरण करावे असेही प्रमोद मोरे यांनी सांगितले.
पुणे जिल्हा निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे संघटक श्री संजय कारखिले यांचे चिरंजीव संकेत यांच्या विवाहाच्या निमित्ताने 1500 केशर आंब्याची रोपे अध्यक्ष श्री प्रमोद मोरे, पुणे जिल्हा पर्यावरण मंडळाचे जिल्हाध्यक्ष आणि मुख्याध्यापक संघाचे सचिव मारुती कदम, राज्य सचिव श्री सुभाष वाखारे, जुन्नर तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष श्री तबाजी वागदरे, आंबेगाव तालुका पर्यावरण अध्यक्ष श्री भानुदास बोराडे, कार्याध्यक्ष श्री पोपट पवार, सदस्य श्री हरिभाऊ शिंदे,वर पिता श्री संजय कारखीले, वधूपिता भरत खांडगे, वधू प्रतीक्षा खांडगे- कारखिले यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
लग्न समारंभात सत्कार समारंभाला व अनाठाई खर्चाला फाटा देत राजगुरू सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष श्री दिपकशेठ वारुळे यांच्या संकल्पनेतून वरपिता संजय कारखिले (सर) आणि वधुपिता श्री भरत खांडगे,वधु चुलते उद्योजक श्री अशोक खांडगे व संयोजक श्री शरद दरेकर यांनी केशर आंब्याची रोपे वाटण्याचा निर्णय घेतला. पर्यावरण मंडळाने राबविलेल्या या उपक्रमाचे समाजातील सर्व थरातून कौतुक होत आहे.
“संपूर्ण सजीव सृष्टीला आरोग्यमय जीवन संपन्न होण्यासाठी पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धन करणे गरजेचे आहे.” असे जिल्हाध्यक्ष मारुती कदम यांनी यावेळी सांगितले.
संपूर्ण महाराष्ट्रभर ही संस्था मोठ्या ताकदीने उभी असून पर्यावरणाची जनजागृती आणि संवर्धन करण्याचे काम विविध पर्यावरणीय उपक्रमातून मंडळाच्या सर्व सदस्यामार्फत होत आहे.