नवी दिल्ली: एलोन मस्क यांच्या स्टारलिंक इंटरनेट सर्विसेस या आंतरजाल/इंटरनेट पुरवठा सेवेने केलेल्या जाहिरातीप्रमाणे भारतात उपग्रहाधारित आंतरजाल/इंटरनेट सेवा पुरवण्यासाठी आवश्यक असलेला परवाना स्टारलिंक इंटरनेट सर्विसेसकडे नसल्याचे भारत सरकारच्या दूरसंचार विभागाने स्पष्ट केले आहे.
स्टारलिंकने उपग्रहाधारित आंतरजाल सेवेच्या आगावू नोंदणी वा विक्रीस आरंभ केल्याचे निदर्शनास आले आहे. www.starlink.com या संस्थळावरून भारतीय प्रदेशातील उपग्रहाधारित सेवांसाठी नोंदणी करता येते, असे निदर्शनास आले आहे.
भारतात उपग्रहाद्वारे आंतरजाल सेवा पुरवण्यासाठी भारत सरकारच्या दूरसंचार विभागाचा परवाना घेणे आवश्यक असते. या कंपनीच्या संस्थळावरुन नोंदणी करण्यात येत असलेली आंतरजाल सेवा पुरवण्यासाठी कोणताही परवाना वा अधिकृत मान्यता या कंपनीने मिळवलेली नसल्याचे दूरसंचार विभागाकडून सार्वजनिकरित्या स्पष्ट करण्यात येत आहे.
त्याचप्रमाणे भारतात आंतरजाल सेवा पुरवण्यासाठी कंपनी नियमांची चौकटीला बाध्य असल्याने या सेवांसाठीची नोंदणी त्वरीत थांबवावी असा आदेश कंपनीला देण्यात आला आहे. स्टारलिंककडे परवाना नसल्यामुळे लोकांनी स्टारलिंकने केलेल्या जाहिरातीला बळी पडू नये आणि त्यांच्याकडून पुरवण्यात येत असलेल्या सेवेसाठी नोंदणी करू नये असे आवाहन करण्यात येत आहे.