पर्यावरण चळवळीशी लोकांना जोडण महत्त्वाचे; माहूरला नवव्या पर्यावरण संमेलनात विचारांचा जागर सुरू
Connecting people with the environmental movement is important; Mahur’s ninth environmental conference begins to awaken ideas
माहूर (नांदेड) :- ज्ञानेश्वर कऱ्हाळे:: ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांची प्रेरणा आणि स्व. ‘वृक्षमित्र’ आबासाहेब मोरे यांच्या मार्गदर्शानुसार आपण पर्यावरणाच्या जनजागरण चळवळीचे काम करत आहोत. पर्यावरणाच्या चळवळीत काम करणाऱ्या आपणा कार्यकर्त्यांचे मुख्य काम या चळवळीशी लोकांना जोडणे हे आहे. पर्यावरण अभ्यासक-संशोधकांची संशोधने आणि कार्य जास्तीत जास्त समाजमानसापर्यंत पोहोचवून त्यांचा पर्यावरण चळवळीला पाठिंबा उभा करण्याचे काम आपले आहे. अशा संमेलनांच्या आणि मंडळाच्या विविध उपक्रमांच्या माध्यमातून ते साध्य होत आहे. मंडळाच्या कामाला अधिकाधिक पर्यावरण मित्रांशी जोडत पर्यावरण चळवळीला अधिकाधिक जनसमुदायाचा पाठिंबा मिळण्यासाठी आपण सदैव कार्यरत राहूया असे नवव्या पर्यावरण संमेलनाच्या विविध वक्त्यांनी केले.
निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळच्या नवव्या पर्यावरण संमेलनाचे उद्घाटन संमेलन अध्यक्ष पद्मश्री शब्बीर (मामू) सय्यद (बीड) यांच्याहस्ते झाले. त्यांनी उपस्थितांना इमानदारीने जगण्याचे आवाहन केले. सय्यद यांचे प्रतिनिधी नवनाथ येवले आणि मुलगा युसुफ सय्यद यांनी मनोगत व्यक्त केले. तहसिलदार अभिजित जगताप यांनी पर्यावरण चळवळ ही सामान्यांशी जोडण्याचा संमेलन उपक्रम स्तुत्य असल्याचे म्हटले. संमेलनाच्या सुरुवातीला प्रास्ताविकातून कोकणातील लेखक आणि पर्यावरण-पर्यटन चळवळीतील कार्यकर्ते धीरज वाटेकर यांनी पर्यावरण मंडळाचे काम, माहूर मधील पर्यावरण आदी विषयाची विस्तृत आणि अभ्यासपूर्ण केली. वन खात्याचे अधिकारी चव्हाण आणि स्वागताध्यक्ष उद्योजक गोपाळसिंह चौहान यांनी संमेलनाला शुभेच्छा दिल्या. मंडळाचे अध्यक्ष प्रमोद मोरे यांनी पर्यावरण मंडळाच्या कामाची आवश्यकता आणि जबाबदारी याबाबत मार्गदर्शन केले.
संमेलनात पाणी समस्या (‘जलपुरूष’ बाबुरावजी केंद्रे – लोहा नांदेड), विषमुक्त शेती व देशी गोसंवर्धन (अॅड. उदय संगारेड्डीकर – नांदेड), वन्यजीव संरक्षण, संवर्धन वास्तव व भ्रम (प्रा. डॉ. रमजान विराणी पांढरकवडा), पर्यावरण पूरक ऊर्जा निर्मिती नवीन देशी व विदेशी तंत्रज्ञान (अविनाश पोळ), जागतिक तापमान वाढ बदलते वातावरण व मानवी आरोग्य (दीपक श्रोते – नागपूर), निवृत्त शिक्षण संचालक डॉ. गोविंद नांदेडे आदींची अभ्यासपूर्ण व्याख्याने संपन्न झाली.
संमेलनाचे स्थानिक आयोजक ज्ञानेश्वर कऱ्हाळे आणि सारनाथ लोणे यांनी संमेलन उभारणीसाठी घेतलेल्या प्रयत्नांचे राज्यभरातून आलेल्या पर्यावरणप्रेमींनी कौतुक केले. संमेलनाला राज्याच्या विविध जिल्ह्यातील दोनशे प्रतिनिधी उपस्थित आहेत.

