MHT-CET 2025 चा निकाल जाहीर! आता पुढे काय? योग्य कॉलेज आणि स्ट्रीमची निवड कशी करावी?
MHT-CET 2025 चा निकाल आज जाहीर झाला असून, राज्यभरात हजारो विद्यार्थी आणि पालक आपल्या भविष्याचा विचार करत आहेत. हा निकाल म्हणजे केवळ एका परीक्षेचा शेवट नाही, तर एक नवीन अध्याय सुरू होण्याची सुरुवात आहे. याच टप्प्यावर विद्यार्थ्यांच्या मनात प्रश्न उपस्थित होतो – “आता पुढे काय?” कोणत्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा? कोणती शाखा निवडायची?
आज इंजिनिअरिंग हे एक विस्तृत क्षेत्र बनले आहे, जिथे प्रत्येक शाखेला स्वतःची ओळख आणि संधी आहेत. मात्र, योग्य निर्णय घेण्यासाठी केवळ मार्क्सच नव्हे तर करिअरच्या दृष्टीने योग्य विचार, ट्रेंड्सचा अभ्यास आणि स्वतःची आवड लक्षात घेणे गरजेचे आहे. अनेक वेळा केवळ मित्रांनी घेतलेली शाखा, सोशल मीडिया वरील ट्रेंड्स किंवा नावाजलेल्या कॉलेजचे आकर्षण यामुळे आपण चुकीचा निर्णय घेतो, जो पुढे जाऊन महागात पडू शकतो.
आजच्या डिजिटल युगात Computer Engineering, AI & Machine Learning, Data Science, Cybersecurity यांसारख्या शाखांना अधिक मागणी आहे. याशिवाय Electronics, Robotics, EV Technology, Biomedical, IT, आणि Mechanical (EV Focus) यांचं देखील चांगलं भविष्य आहे – फक्त त्या शाखेमधील स्किल्स तुमच्याकडे असायला हव्यात. जे विद्यार्थी ‘हाताने काम करायला आवडतं’, ‘इनोव्हेशन करायचं आहे’, किंवा ‘मेडिकल क्षेत्राशी नातं ठेवायचं आहे’, त्यांच्यासाठी Biomedical आणि Instrumentation Engineering सुद्धा उत्तम पर्याय आहेत.
कॉलेज निवडताना केवळ कटऑफ बघू नका, तर त्या कॉलेजचा प्लेसमेंट रेकॉर्ड, infrastructure, faculties, आणि alumni network देखील तपासा. COEP Pune, VJTI Mumbai, WCE Sangli, PICT Pune, VIIT, MIT-WPU, आणि Government Engineering Colleges हे काही महाराष्ट्रातील प्रमुख नामांकित कॉलेजेस आहेत. जर तुमचा स्कोर थोडा कमी असेल, तरीही चांगल्या खाजगी कॉलेजमध्ये योग्य मार्गदर्शन आणि स्कॉलरशिपद्वारे उज्वल करिअर साधता येऊ शकते.
सरकारनेही विद्यार्थ्यांसाठी अनेक फायदे दिले आहेत – जसे TFWS (Tuition Fee Waiver Scheme), EWS 10% आरक्षण, Scholarships for SC/ST/OBC/VJNT students इ. त्यामुळे आर्थिक अडचणीमुळे शिक्षण थांबणार नाही, फक्त माहिती असणं आणि वेळेत अर्ज करणं महत्त्वाचं आहे.
शेवटी एवढंच म्हणावंसं वाटतं की, कॉलेज हे यशाचं अंतिम स्थान नसतं – तुमचं यश ठरतं तुमच्या मेहनतीवर, स्किल्सवर आणि योग्य दिशा निवडण्यावर. यशासाठी फक्त मोठ्या नावाची गरज नाही, तर मोठं व्हायची जिद्द लागते!