मराठानो राजकीय पक्षांच्या चिथावणाला बळी पडू नका. मराठा आरक्षण राजकीय भांडवलाचा विषय नाही. आ.शशिकांत शिंदे.


मी मराठा आहे का? हे मराठा समाजाचे राजकीय भांडवल करणाऱ्या पुढार्यांनी विचारू नये. मराठा हा विचारांशी एकनिष्ठ असतो व मी निष्ठावान मराठा आहे”

काल राष्ट्रवादी पक्ष कार्यालयावर हल्ला झाला, यापूर्वी देखील दोन वेळा हल्ला झाला होता. ज्यावेळी मी पक्ष कार्यालयात गेलो त्यावेळी हा हल्ला भाजपा कार्यकर्त्यांनी केला असं मला समजलं. त्यात काही प्रमाणात तथ्य देखील होते. त्यानंतर हल्लेखोरांची जी नावे मला समजली त्या दोन मुलांच्या घरी जाऊन मी त्यांच्या कुटुंबियांना समजावलं आणि जर ती मुले मला भेटली असती तर त्यांचंही म्हणणं मी एकूण घेतलं असत व भावना समजावून घेतल्या असत्या. निषेध करण्याचा अधिकार सर्वांना आहे परंतु ज्या व्यक्तीने मराठा आरक्षणविरोधी याचिका दाखल केली तो सदावर्ते आणि जयश्री पाटील हे दोघे आदरणीय पवार साहेबांवर टीका करत आहेत म्हणून तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाची तोडफोड करून ह्या गोष्टीला राष्ट्रवादी जबाबदार आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करत आहात का? असा प्रश्न विचारून समजवल्यानंतर तोडफोड करणाऱ्या युवकांच्या घरातील व्यक्तींच्या हे राजकारण लक्षात आले.

पण हा व्हिडिओ न दाखवता ज्यावेळी मी दुसऱ्या घरी गेलो व तिथं सुद्धा हेच समजावून सांगण्याचा प्रयत्न केला असता पुढून काही उलट उत्तर आल्यानंतर मी थोडा रागाने बोललो. पण जी गोष्ट मी सुरवातीच्या घरात सांगितली तीच गोष्ट दुसऱ्या युवकाच्या कुटुंबियांना सांगितली. मात्र काहींनी जाणीवपूर्वक तेथील अर्धाच व्हिडिओ प्रसारीत केला.
त्यावर काही राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या की हे मराठाच आहेत का? त्यांना मला सांगायचं आहे की, होय! मी ९६ कुळी “मराठा” आहे. ज्या ज्या वेळी मराठा समाजाने आंदोलने केली त्या त्या वेळी एक मराठा मावळा म्हणून मराठा समाज बांधवांच्या खांद्याला खांदा लावून मी त्या आंदोलनात सहभागी होतो. त्या आंदोलनांत सहभागी होताना कुठंही आमदार म्हणून बिरुदावली मी लावली नाही. एक मराठा मावळा म्हणून मुंबई, नवी मुंबई, पनवेल, कळंबोली, सातारा आदी ठिकाणी अगदी आझाद मैदानाच्या आंदोलनात अग्रेसर राहणारा शशिकांत शिंदे होता. मी मराठा आहे आणि मला त्याचा अभिमान आहे, त्याबद्दल मला कोणी सांगण्याची आणि शिकवण्याची गरज नाही. मी मराठा असल्याने जशास तसं उत्तर देण्याची ताकद माझ्यात आहे. ज्या वेळी मराठा क्रांती मोर्चा पुन्हा कुठली भूमिका घेईल त्यावेळी मराठा समाजासाठी सर्वात पुढे राहून सहकार्य करण्याची व सहभागी होण्याची भूमिका माझी असेल. त्यावेळी एक सामान्य मराठा म्हणून पडेल ती जबाबदारी मी माझ्या संपूर्ण ताकदीने उचलेल व मराठा समाजासाठी मी काय करू शकतो हे दाखवून देईल. त्यावर मी जास्त भाष्य आत्ताच करणार नाही. मराठा आंदोलनाच्या बरोबर मी होतो, आहे आणि उद्या देखील पक्षाच्या चौकटीबाहेर जाऊन राहीन, एवढा विश्वास मी देतो. त्यामुळे माझा DNA विचारणाऱ्या राजकीय भांडवलदारांना एवढेच सांगू इच्छितो की, मी मराठा असल्याचे राजकीय भांडवल करत नाही, कारण ते करण्याची गरज मला कधीच पडत नाही. जो प्रामाणिक काम करतो त्याला स्वतःची ओळख सांगावी लागत नाही.
माझ्या रक्तात मराठ्यांची आक्रमकता आहे. ज्या ज्या वेळी कुठं मराठी कुटुंबावर अन्याय झाला व अन्याय ग्रस्तांनी माझ्याशी संपर्क केला त्या त्या वेळा मी स्वतः त्यांच्या मदतीला धावून गेलेलो आहे. काल सुद्धा भावनिक होऊन ज्या युवकांनी पक्ष कार्यालयावर हल्ला केला, पोलिसांना सांगून त्यांना सुद्धा मदत करण्याची भूमिका मी करतो आहे. त्यामुळं माझा DNA कुणी तपासण्याची अजिबात गरज नाही.

<

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: लेख Copy Peast करण्यापेक्षा Share करा. News Maharashtra Voice