झाडे लावा पण देशी की विदेशी चर्चा रंगलीय-शंका कुशंका वास्तविकता काय आहे.
environment clarification over indigenous and foreign trees planting
सध्या विदेशी झाडे लावावी की देशी प्रजातीची झाडे यावर वाद सुरु असतात. काही देशी झाडांची बाजू घेतात तर काही विदेशी प्रजातीच्या झाडांची. मात्र या वादाकडे पर्यावरणपूरक की पर्यावरण घातक यादृष्टीकोनातून पाहायला हवे. पर्यावरण दिनानिमित्त प्रा. डॉ. निनाद शहा (सोलापूर) यांचा विशेष लेख
विविध देशात तेथील पोषक हवामान, अधिवास यानुसार विशिष्ट वनस्पती वाढत असतात. या वनस्पती आणि त्यावर अवलंबून असणारे वन्यजीव यांनी मिळून समृद्ध पर्यावरण निर्मिती होत असते. या पर्यावरणात परिसंस्थेच्या बाहेरच्या वनस्पती आल्या तर काय होते, हा सध्याच्या चर्चेचा विषय आहे. खरे तर विदेशी विरुद्ध देशी झाड, असा माझ्या दृष्टीने वाद नाही. तो पर्यावरणघातक विरुद्ध पर्यावरणपूरक, असा असावा. अनेक झुडुपे, वेली, झाडे भारतात रुजलेली आहेत, उपयोगी आहेत, असे काही जणांचे म्हणणे आहे. पण इथे लक्षात घेतले पाहिजे की या सर्व विदेशी वनस्पती (उदा. पेरु, सफरचंद, सीताफळ, द्राक्षे, ऊस, मिरची, बीट) शेती व्यवसायांतर्गत येतात. येथे त्यावर नियंत्रण असते, त्यांची काळजीपूर्वक निगा राखली जाते. या वनस्पती आक्रमकही नसतात.
आपल्या पर्यावरणीय वातावरणाला घातक वृक्षारोपणाला विरोध आहे. इथे विदेशी झाडप्रेमी म्हणतात की देशी झाडाप्रमाणे विदेशी झाडे सावली देतात, प्राणवायूची निर्मिती करताहेत आणि दिसायलाही रंगीबेरंगी फुलांमुळे सुंदर दिसतात. मग विरोध का? एक विदेशी झाड दहा स्थानिक झाडांना वाढू देत नसेल तर दहापट प्राणवायू निर्मिती आणि सावली कमी होते. हा तोटा आहे. आपल्या देशात विदेशी झाडांचे कीड आदी शत्रू नसल्याने त्यांना मोकळे रान मिळते. त्यामुळे ते देशी झाडांना वाढू देत नाहीत.
विदेशी झाडांमुळे आपली जैविक विविधता कमी होऊ लागली आहे. अशा तऱ्हेने देशी प्रजातीय विविधता कमी करून हे जीवशास्त्रीय प्रदूषण (Biological pollution) करतात. या विदेशी झाडांची पाने प्राणी अजिबात खात नाहीत. या झाडांवर काही पक्षी व किटक अधिवास करीत नाहीत. ही विदेशी झाडे ठिसूळ असतात. त्यांचे आयुष्यमान कमी असते. त्यांची पाने लवकर कुजत नाहीत आणि खतही तयार होत नाही. त्यामुळे जमिनीचे प्रदूषण होते. वादळात पहिल्यांदा ही झाडे उन्मळून पडतात आणि वाहतूक कोंडी करतात. काही विदेशी झाडे फुलसंभारामुळे सुंदर दिसतात. उदाहरणार्थ गुलमोहर, नीलमोहर, पीत मोहोर, स्पॅथोडिया इत्यादी. पण दृष्टीसुख सोडले तर पर्यावरणीय मूल्य शून्यच आहे. अपवाद म्हणायला एखाद्या झाडावर दोन चार पक्षी बसतात पण तेथे राहत नाहीत. तसेच पर्याय कमी होत असल्याने कुठेकुठे मधमाशा गुलमोहरासारख्या एखाद्या झाडावर प्रसंगी दिसू शकतात.
कर्नाटक राज्य शासनाने निलगिरी झाडाची लागवड करण्यास बंदी घातलेली आहे. निलगिरीचे झाड जमिनीतील पाणी मोठ्या प्रमाणावर (जवळजवळ 90 लिटर /दिवस) शोषून घेते. त्यामुळे हे झाड पाणी दुर्भिक्ष असलेल्या ठिकाणी लावून चालत नाही. पन्नास वर्षापूर्वी सोलापुरातील पंढरपूर, सांगोला भागातील माळरान जमिनीवर मेक्सिको येथील वेडी बाभूळ लावली. ती वेगाने वाढली आणि देशी बाभळीला तिने जवळजवळ नष्टच केले. आपल्याकडेही कमी कालावधीत वाढणारी देशी झाडे आहेत. उदाहरणार्थ काटेसावर, कांचन, शिरीष, हादगा, शेवगा, कदंब, सीतेचा अशोक, सुरंगी. याशिवाय वड, पिंपळ, कडुलिंब, चिंच, उंबर झाडे तर सदासर्वकाळ उत्कृष्ट होत, अशी देशी झाडे लावावीत.
माळरानावर झाडे लावणे
सर्वसामान्य समज असा की गवताळ व त्यावर विखुरलेली थोडीशीच झाडे, अशा परिसंस्थेपेक्षा भरपूर झाडे असलेल्या प्रदेशाचे महत्त्व अधिक आहे. आजची पर्यावरण चळवळ मुख्यत्वे यावरच अवलंबून आहे. परंतु दिसेल त्याठिकाणी वृक्षारोपण करणे योग्य नाही. शिवाय कोणतीही झाडे कुठेही लावणे चुकीचे असते. जमिनीचा प्रकार, पोत, हवामान पाहूनच झाडे लावावी लागतात. झाडे माळावर लावताना बऱ्यापैकी म्हणजे साधारण वीस मीटर अंतर ठेवावे लागते. झाडं लावायची असतील तर ती मेडशिंगी, बारतोंडी, काळा शिरीष इत्यादी लावावी. महत्त्वाचे म्हणजे ही सर्व झाडे हळूहळू वाढत असतात आणि आपल्याला तर भरकन परिसर हिरवागार झालेला पाहायचा असतो. त्यामुळे संयम हवा. प्रत्येक परिसंस्थेचे जैविक वैशिष्ट्यांमुळे जीवशास्त्रीय स्वरूप (Biological Nature of Ecosystem) ठरलेले असते. माळराने (गवताळ परिसंस्था) वर्षभर हिरवीगार राहूच शकत नाहीत. आपण अट्टाहासाने जर माळावर सदाहरित वृक्षारोपण करु लागलो तर तेथील जैविक विविधतेवर निश्चितच परिणाम होतो. ती हळूहळू कमी होत जाणार हे नक्की. माळढोक पक्ष्याचे उदाहरण आपल्यासमोर आहे. माळरानावर केलेले ग्लिरिसिडियाचे वृक्षारोपण माळढोकचे तेथून जाण्याच्या अनेक कारणांपैकी एक प्रमुख मानले जाते. आता माळढोकच्या वाटेवर येथील धाविक, पखुर्डी, माळटिटवी याबरोबरच इतर प्राणीही कमी होऊ लागलेले आहेत. दुष्काळग्रस्त भागात जीवसृष्टी टिकून राहावी म्हणून माळरान परिसंस्था अस्तित्वात आलेली आहे, ती तशीच आपणाला जपली पाहिजे.
(लेखक ४० वर्षे प्राणिशास्त्र प्राध्यापक होते. सोलापुरातील वालचंद सायन्स आणि मंगळवेढा येथील सायन्स कॉलेजचे प्राचार्य होते. सध्या माजी मानद वन्यजीव रक्षक म्हणून कार्यरत.)
- शेतकऱ्यांना मोठा दिलासा महाराष्ट्र सरकारने अतिवृष्टि पूरग्रस्तांसाठी ३१,६२८ कोटींचे पॅकेज जाहीर..Maharashtra Government Announces Rs 31628 Crore Package for Flood Victims राज्यातील अतिवृष्टीमुळे
- India -Pak Cricket|”मला त्याला मारायचं…”: पाकिस्तानी फिरकीपटू अबरार अहमदचं शिखर धावनवरून वादग्रस्त विधान, भारतीय चाहत्यांचा राग अनावर“I wanted to boxing him…”: Pakistani spinner Abrar Ahmed’s controversial statement on
- आशिया चषक 2025 अंतिम सामना: भारताने पाकिस्तानला हरवून नववा विजेतेपद मिळवला!दुबई, 28 सप्टेंबर 2025: आशिया चषक 2025 (T20I स्वरूप) चा अंतिम सामना
- मराठवाड्यात अतिवृष्टीचे थैमान: नद्यांना महापूर, शेतीचे मोठे नुकसानMarathwada Reels Under Torrential Rains and Floods: Massive Crop Damage Reported मुंबई,
- निसर्ग संवर्धनासाठी माहूरमध्ये होत आहे पर्यावरण संमेलन; अशी करा नाव नोंदणीEnvironment conference organized at Mahur for nature conservation; presence of Padma Shri