मराठ्यांनो आरक्षण अपयशात संविधानाला दोष नको. संविधानात खोट नाही संविधान राबविणारात खोट आहे.

सर्व मराठा बांधवांना विनंती, कृपया संपूर्ण लेख शांत आणि थंड डोक्याने वाचा आणि विचार करा!

आपल्या भावना दुखावल्या गेल्या आहेत मला मान्य आहे! मलाही आपल्या एवढीच चीड येत आहे, राग येत आहे. पण यात वेड्यासारखे भान हरपल्यागत राज्यघटनेच्या उद्देशिकेचे पान काहीजण शेअर करत असून त्याबद्दल आक्षेप नोंदवत आहेत.

युवक क्रांती दल

असे करणे साफ चुकीचे आहे. संविधानावर टीका करून तुम्ही काय मिळवणार? ज्या आरक्षणाची आपण मागणी करत आहोत ते “त्याच” संविधानानुसार करत आहोत याचे भान ठेवणे गरजेचे आहे. आणि आपल्याला ती मागणी करणे, आंदोलने करणे हे सर्व हक्क “तेच” संविधान देते याचा विसर पडता कामा नये, घटनात्मक कायदे, कानून, नियम यांचा अभ्यास करावा. आरक्षण कोणत्या कोट्यातून दिलेगेल्यास टिकेल याचा अभ्यास करावा. स्वतः अभ्यास वाढवावा आणि आजूबाजूला जमेल तसे समाज बांधवांमध्ये या ज्ञानाचा प्रचार करावा.


संविधानाला दोष देऊन काहीही साध्य होणार नाही. संविधान हे दुधारी शस्त्र आहे, ते जसे आपल्या हातात असल्यानंतर आपल्या फायद्यासाठी वापरता येते तसेच विरोधी शक्तिंचे दमन करण्यासाठी सुद्धा त्याचवेळी वापरता येते. आज सवर्णांना EWS कोट्यातून कोणतीही मागणी नसताना आरक्षण “आर्थिक” निकषांवर लागू केले गेले. पण तुमची आमची करोडो लोकांची मागणी असताना देखील आरक्षण दिल्या जात नाही यामागील गणित समजून घ्या. आपले संविधान हे जगातील सर्वोत्तम लिखित संविधान आहे. आपल्याला स्वातंत्र्य मिळून 70 वर्षे झाली तरीदेखील आपण जगातील एक स्थिर राष्ट्र आहोत. प्रशासन आणि राज्यव्यवस्था यांचा विचार करता जगात आपल्या एवढे स्थिर राष्ट्र इतरत्र नाही. अगदी काल परवा म्यानमार मध्ये झालेला तख्तापालट याचे ताजे उदाहरण आहे. आपण स्थिर आहोत त्याचे कारण आहे, आपले मजबूत आणि बऱ्यापैकी परिपूर्ण संविधान! ते आज चुकीच्या हातात पडले आहे हे मात्र आपणा सर्वांना मान्य करावेच लागेल. ते योग्य शक्तींच्या हाती असणे गरजेचे आहे. आपली लढाई संविधाना विरोधात नसून, केवळ शासन व्यवस्थेशी आहे. आपले भांडण राज्यकर्त्यांसोबत आहे, कृपा करून संविधान मध्ये आणू नका! आपल्याला एवढीच जर चीड येत असेल, राग येत असेल तर त्या एनर्जीचा योग्य जागी वापर करून या देशातील “शासनकर्ती जमात” बना. आज जे आपले राजकीय पुढारी आहेत, ते केवळ तमाशात नाचणारे नाचे आहेत. ते आपले खरे प्रतिनिधी नव्हेत. त्यांच्याकडून समाजाचा विकास होणे शक्य नाही. ते केवळ आपल्या तुंबड्या भरत आहेत. त्यांच्या 7 नव्हे तर 70 पिढ्यांचा उद्धार करत आहेत. सर्वसामान्य, शेतकरी, कष्टकरी, गोरगरीब मराठे गाव, खेडे आणि शहरांतून रोज मरत आहेत. गरीबी आणि मागासलेपणात खितपत पडले आहेत. आपण शासन आणि प्रशासनात जाऊन यांचा उद्धार करता येईल अशी धोरणे राबवा. वर सांगितलेला जो गट आहे, केवळ मराठा समाजातील नसून सर्वच समाजात असा गट आहे. त्यांना देखील न्याय द्या. “शिवछत्रपतींचे स्वराज्य” उभे करा. शासनकर्ती जमात बनून 12 बलुतेदार अन् 18 अलुतेदार समाजातील या वर्गाला न्याय द्या. मराठ्यांचे राज्य समतेसाठी प्रसिद्ध आहे. शिवरायांनीही सर्वांचे राज्य निर्माण केले. आपल्याला त्यांचाच वारसा चालवायचा आहे.
आरक्षण नसल्याने आणि त्याची एवढी विशाल स्वरूपात मागणी करून देखील पदरी निराशाच आल्याने सर्वसामान्य मराठा तरुण चिडलेला आहे, तो कष्टी झालाय, आणि त्याची मनस्थिती ही अतिशय उग्र बनलेली आहे. सध्यपरिस्थिती पाहता हे सर्व स्वाभाविक आहे. परंतु आपण आपले संतुलन ढळू देऊ नये. आपल्या भावना आवेगात आपण एखादी चुकीची मागणी करत नाही ना, किंवा दोन समाजात दरी निर्माण करत नाही ना याची दक्षता घेणे आपल्याला दुरापास्त आहे. आरक्षण हा काही काळापुरता विषय आहे, ते भविष्यात एक दिवस आपल्याला नक्की मिळेल. परंतु आपण आज असे वागलो, तरुण पिढी अशी वागली तर मराठा समाज जगाच्या नजरेत कायमचा बदनाम होईल. आपल्याला विविध समाजांसोबत या राष्ट्रात कायम राहायचे आहे. मराठा तरुणांनी आपला आक्रोश मांडण्याच्या नादात इतर समाजाच्या भावना दुखावल्या जातील किंवा मराठा समाजाची प्रतिमा मलिन होईल अशा प्रकारची वक्तव्ये, लिखाण करू नये ही कळकळीची विनंती. आमच्या इतर धर्मीय आणि इतर जातीतील बांधवांना देखील विनंती आहे की, आपण देखील या संवेदनशील विषयावर काहीही लिहू नये. प्रतिक्रिया देणे कटाक्षाने टाळावे.
राज्य सरकार, केंद्र सरकार किंवा शासन व्यवस्था यांच्यावर हवी तशी आणि हवी त्या भाषेत टीका करा पण संविधानासारख्या विषयावर अभ्यास असल्या शिवाय काहीही बोलू नका अथवा लिखाण करू नका. टीका करू नका. त्याला दोष देऊ नका. असे करून आपण आपल्या अल्पबुद्धीचे प्रदर्शन घडवत आहात. आपली वैचारिक दिवाळखोरी बाजारात मांडत आहात. आपण जेवढे जास्त डोक्याने लढू तेवढी कमी ताकद खर्च होऊन हे युद्ध जिंकू! मराठ्यांच्या युद्धकलेची आणि छत्रपती शिवरायांच्या युद्धशैलीची हीच तर खासियत राहिली आहे, की त्यांनी सारी युद्धे तलवार आणि शस्त्रापेक्षा डोक्याने खेळली. आणि म्हणून मराठे अजिंक्य राहिले, शिवाय आपली हीच युद्धकला जगात आपली ओळख बनली. आपणच एकवार नव्हे दहावार विचार करा, आपल्याला स्वतः डोक्याने लढून “शिव-शंभुंचे पाईक” व्हायचे आहे की, केवळ आडमुठी करून स्वतःचा “कारतलबखान उझबैग” करून घ्यायचा आहे! ज्यांना विपरीत बुद्धीने, वाईट वृत्तीने टीका करायची आहे, ज्यांना जी चिखलफेक करायची आहे ती करू द्या आपण त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. “हाथी चले बाजार, कुत्ते भौंके हजार!” केवळ हे ध्यानात ठेवा. लक्ष्यावर(Target) लक्ष (Focus) केंद्रित करा. आपण विचार कराल आणि प्रत्यक्षात आणाल या आशेसह…

कृतज्ञतापूर्वक सस्नेह जय जिजाऊ..! जय शिवराय..!
एक मराठा..! लाख मराठा..!
आरक्षण आपल्या हक्काचं! नाही कुणाच्या बापाचं!

<

Related posts

Leave a Comment