वर्गखोलीत राष्ट्र घडविणारा शिक्षकच खरा राष्ट्रनायक – डॉ गोविंद नांदेडे
माहूर (नांदेड) :- (ज्ञानेश्वर कऱ्हाळे) शिक्षकांनी अतिशय उत्साहाने, आनंदाने वर्गात प्रवेश केला पाहिजे. शिक्षक हा विद्यार्थ्यांची प्रतिमा साकारणारा आरसा असतो. जसे शिक्षक तसे विद्यार्थी, म्हणून शिक्षकांनी नेहमी चैतन्यदायी, प्रेरणादायी असायला हवे. एक शिक्षक हजारो प्रतिभावान आदर्श नागरिक घडवू शकतो. राष्ट्राचे महानायक हे चित्रपटातील पडद्यावर दिसणारे अभिनेते नसून राष्ट्र निर्माणाचे पवित्र कार्य करणारे शिक्षक आहेत, असे प्रतिपादन निवृत्त शिक्षण संचालक डॉ. गोविंद नांदेडे यांनी केले.
निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळच्या नवव्या पर्यावरण संमेलनाच्या समारोप प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून नांदेडे यांनी संत साहित्यातील पर्यावरण विचार या अनुषंगाने आपले विचार व्यक्त केले. यावेळी व्यासपीठावर मंडळाचे अध्यक्ष प्रमोद मोरे, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर कऱ्हाळे, नांदेड जिल्हाध्यक्ष सारनाथ लोणे होते. नांदेडे यांनी आपल्या भाषणातून संत तुकाराम यांच्या अभंगाचे दाखले देत पर्यावरण विषय शालेय विद्यार्थ्यांपर्यंत कसा पोहोचवता येईल याचे उत्तम विवेचन केले. नांदेडे म्हणाले, ऊर्जेचा, उत्साहाचे प्रतीक असणारा निर्झर ज्याप्रमाणे स्वच्छ, खळाळते पाणी घेऊन प्रवाही असतो त्याप्रमाणे शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या विचार शक्तीला, सृजनाला प्रवाही केले पाहिजे. यासाठी स्वतः शिक्षकाने निरंतर अध्ययनशील असले पाहिजे. प्रत्येक विद्यार्थ्याचा आत्मसन्मान जपत त्यांच्या क्षमतांना विकसित करण्याची, त्यांच्या विचार शक्तीला चालना देऊन ज्ञानाची परिक्रमा अखंडित ठेवण्याची क्षमता शिक्षकांनी विकसित करायला हवी.
समारोपपूर्वी सकाळ सत्रात, जागतिक तापमान वाढ बदलते वातावरण व मानवी आरोग्य या विषयावर नागपूरचे अभियंता दीपक श्रोते यांचे व्याख्यान झाले. शुद्ध हवा, शुद्ध पाणी व विषमुक्त अन्न, वसुंधरा स्वच्छता अभियान, जल व मृदुसंधारणाचे काम करणाऱ्या आणि नैसर्गिक शेती व सर्वांसाठी विषमुक्त अन्न चळवळीचे सक्रिय कार्यकर्ते असलेल्या श्रोते उपस्थित पर्यावरणप्रेमींना विषय समजावून सांगतानाच त्यांच्या विविध प्रश्नांनाही उत्तरे दिली.
संमेलनाचे स्थानिक आयोजक ज्ञानेश्वर कऱ्हाळे आणि सारनाथ लोणे यांनी संमेलन उभारणीसाठी घेतलेल्या प्रयत्नांचे राज्यभरातून आलेल्या पर्यावरणप्रेमींनी कौतुक केले. संमेलनाला राज्याच्या विविध जिल्ह्यातील दोनशे प्रतिनिधी उपस्थित आहेत. संमेलनाचे सूत्रसंचालन लेखक आणि कोकणातील पर्यटन-पर्यावरण विषयातील कार्यकर्ते धीरज वाटेकर यांनी केले. आभार राहूल ढवळे यांनी मानले.

