Shivaji Maharaj is not the role model of today; Nitin Gadkari can be your icon
औरंगाबाद: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि वाद एकाच नाण्याच्या दोन बाजू झाल्या आहेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी अधूनमधून काही विधाने करतात आणि त्यावरून वाद निर्माण होतो. त्यानंतर त्यांच्यावर सारवासारव करण्याचीही नामुष्की ओढवते. आता त्यांनी आज पुन्हा एक वादग्रस्त विधान केलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे जुन्या काळातील आदर्श होते. तर नितीन गडकरी हे सध्याचे आदर्श आहेत, असं विधान करून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी वादाला फोडणी दिली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पदवीदान समारंभात राज्यपाल भगत सिंह कोश्यारी बोलत होते. यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि भाजप नेते नितीन गडकरी यांनी डीलिट पदवी देऊन गौरवण्यात आलं. यावेळी भाषण करताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नितीन गडकरी यांची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी केली.
आम्ही जेव्हा शाळेत शिकत होतो. तेव्हा आम्हाला आमचे शिक्षक विचारायचे तुमचा आवडता नेता कोण आहे? तेव्हा ज्यांना सुभाषचंद्र बोस आवडायचे, ज्यांना गांधीजी आवडायचे आणि नेहरू आवडायचे ते त्यांची नावे घ्यायची. मला आता असं वाटतं तुम्हाला कोणी विचारलं तुमचा आयकॉन कोण? तुमचा आवडता नेता कोण? तर तुम्हाला बाहेर जायची गरज नाही. महाराष्ट्रातच तुम्हाला भेटून जातील. शिवाजी महाराज तर जुन्या काळातील आहेत. मी आधुनिक काळाबाबत बोलत आहे. इथेच मिळतील. डॉ. आंबेडकरांपासून ते डॉ. नितीन गडकरींपर्यंत तुम्हाला सर्व इथेच मिळून जातील, असंही वादग्रस्त विधान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलं.
भगतसिंह कोश्यारी यांच्या या विधानाचे पडसाद उमटत आहेत. राज्यपाल हे महाराष्ट्रद्रोही आणि शिवद्रोही देखील आहेत. राज्यपाल महोदय छत्रपती शिवाजी महाराज साडेतीनशे वर्षानंतर देखील महाराष्ट्राच्या आणि देशाच्या प्रत्येक माणसाच्या नसानसात भिनलेले आहेत. आज छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श उभ्या महाराष्ट्राच्या डोळ्यासमोर आहे. तुम्ही एकदा गडकिल्ले फिरा म्हणजे तुम्हाला कळेल, असं संभाजी ब्रिगेडचे संतोष शिंदे यांनी म्हटलं आहे.