कोरोनातून बरे झालेल्यांचं लसीकरण करण्यासंदर्भात केंद्र सरकारने नवी नियमावली जाहीर केली आहे. कोरोनातून बरे झाल्यानंतर 3 महिन्यांनी नागरिकांना लस घेता येणार आहे.
नॅशनल एक्सपर्ट ग्रुप ऑफ व्हॅक्सीन अॅडमिनिस्ट्रेशन फॉर कोव्हिड-19 ने (NEGVAC) देशातील आणि जगातील कोरोना स्थिती यांबाबत अभ्यास केला. या अभ्यासावर आधारित अहवाल स्वीकारल्यानंतर केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने ही नियमावली जाहीर केली आहे.
काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारच्या निती आयोगाचे आरोग्यविषयक सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी याबाबत एक पत्रकार परिषद घेतली होती. पण त्यावेळी त्यांनी कोरोनातून बरे झाल्यानंतर 6 महिन्यांनी लस घेता येईल, असं म्हटलं होतं.
पण त्यापूर्वी कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांना एका महिन्यानंतर लस घेता येईल, असा नियम होता. त्यामुळे गेले काही दिवस कोरोनातून बरे झालेल्या व्यक्तींच्या लसीकरणाबाबत संभ्रमावस्था निर्माण झाली होती.
या सर्व प्रश्नांचं उत्तर आता मिळालं आहे. नव्या नियमानुसार कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांना निगेटिव्ह रिपोर्ट आल्यानंतर 3 महिन्यांनी लस घेता येणार आहे.
काय आहे नवी नियमावली?
1. कोव्हिड-19 ची लक्षणं असलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांनी बरे झाल्यानंतर 3 महिन्यांनी कोरोना प्रतिबंधक लस घ्यावी.
2. कोरोनासंदर्भात प्लाझ्मा अथवा अँटी सार्स-2 मोनोक्लोनल अँटीबॉडीज देण्यात आलेल्या रुग्णांनीही 3 महिन्यांनंतरच लस घ्यावी.
3. कोरोनाचा पहिला डोस घेतल्यानंतर कोरोनाची लागण झाली असेल तर अशा व्यक्तींनीही बरे झाल्यानंतर 3 महिन्यांनीच कोरोना लस घ्यावी.
4. इतर गंभीर व्याधींनी ग्रस्त असलेल्या रुग्णांनीही बरे झाल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने 4 ते 8 आठवड्यांनी लस घ्यावी.
याशिवाय इतर काही माहितीही केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या प्रसिद्धी पत्रकात दिली आहे.
त्यानुसार, कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांना रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर 14 दिवसांनंतर रक्तदान करता येऊ शकतं. आपल्या बाळांना स्तनपान देणाऱ्या सर्व महिलांना कोरोना प्रतिबंधक लस घेता येईल.
लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांना लस घेण्यापूर्वी कोणत्याही प्रकारच्या अँटीजन चाचणीची गरज नाही, असंही पत्रकात म्हटलं आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने यासंदर्भात देशातील राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहिलं आहे. या सूचना लक्षात घेऊन त्यांची प्रभावी पद्धतीने अंमलबजावणी करण्यास मंत्रालयाने सांगितलं आहे.
लसीकरणाबाबतची माहिती सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्याची काळजी सर्वांनी घ्यावी, अशी सूचनाही केंद्राने केली आहे.